आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेकअप फ्रॉम मेकअप

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महेशकुमार मुंजाळे  

एका सर्व्हेनुसार चंदेरी पडद्यावर झळकण्यासाठी, फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्यासाठी मुंबईमध्ये रोज तब्बल दोन ते तीन हजार इच्छुक कलाकार येत आहेत. त्यातील केवळ ५% लोकांना काही ना काही काम मिळत आहे. बाकी लोक मुंबईमध्ये राहण्याचा, ऑडिशनवर ऑडिशन देण्याचा भार कसेबसे उचलत आहेत. या परिस्थितीमध्ये त्यांचे वय, उंची, जाडी, रंग या अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या त्यांच्या करिअरच्या आड येतायत. अशा वेळी उत्तम अभिनयकौशल्य असूनही त्यांना निराश होऊन परत फिरावे लागत आहे. अशा वेळी  जर त्यांच्या हक्काचे रोलसुद्धा बिझनेसच्या नावाखाली "सेलिब्रिटीज'ना देऊ केले तर या एवढ्या मोठ्या संख्येने कुणाकडे पाहावे?
"लाइफ बना दूंगा…. जिंदगी बदल दूंगा….' असले डायलॉग मारून मारून आम्ही फिल्ममेकर एवढे स्वतःला "भगवान' समजू लागलोय की मेकअपच्या (डिजिटली सुद्धा) जोरावर कुणालाही काहीही बनवू शकतो असा अनाठायी कॉन्फिडन्सच आमच्यात घुसलाय. हे मर्यादित अर्थाने खरंसुद्धा आहेच, पण हे करताना आपल्या हातून काही चुकतंय की काय याचं भानसुद्धा राहिलं नाहीये. कुणी म्हणेल की काय एवढा हा त्रागा चालूये? कसला एवढा संताप आलाय? सांगतो...

आता एवढ्यात दोन हिंदी चित्रपट रिलीज झाले. एक "बाला' आणि दुसरा "सांड की आंख'. झालं असं की "बाला' आणि "सांड की आंख' या दोन्ही सिनेमांत एक गोष्ट कॉमनली खटकलीय, "मेकअप'! "बाला' मध्ये बालमुकुंदच्या टकलाचा न्यूनगंड दूर करण्यासाठी लतिकाच्या काळेपणाचा वापर केला गेलाय. तो कसा वगैरे सांगत बसलो तर चित्रपटावर अन्याय होईल. …आणि तो या विषयाचा मुद्दासुद्धा नाही. मुद्दा असा आहे की कथेचा रोख खूप चांगला आहे. मेसेजसुद्धा क्लिअरकट आहे. मग खटकलं काय? तर मेकअप. लतिका हे पात्र जर कृष्णवर्णीय असणं ही कथेची गरज होती तर तसा मूलतः वर्ण असणारी चांगली कलाकार मिळणे अशक्य होते का? भूमी पेडणेकरसारख्या गौरवर्णीय नटीला घेऊन तिच्या सर्वांगाला काळे करून, काळे म्हणजे एवढे काळे की चकाकणारा ग्रीस सगळ्या अंगाला लावलाय एवढा विचित्र मेकअप करून दिग्दर्शकाने काय साधलं हे मला पामराला उमगलं नाही. 

हेच "सांड की आंख' बद्दल... यूपीमधील बाघपतसारख्या ठिकाणी राहणाऱ्या, "रांधा-वाढा-उष्टी काढा' मध्येच सगळं आयुष्य घालवलेल्या, "घुंगट' पद्धतीत राहणाऱ्या दोन म्हाताऱ्या वयाच्या साठीत नेमबाजी शिकू पाहतात आणि सर्व अडचणींना धीराने तोंड देत इतर महिलांसमोर आदर्श प्रस्थापित करतात, अशा चन्द्रो आणि प्रकाशी तोमरची ही गोष्ट. कथा सुंदर, अभिनय लाजवाब, दिग्दर्शनसुद्धा उत्तम पण त्यातही हीच गोष्ट खटकते, ती म्हणजे मेकअप. प्रोस्थेटिक मेकअप करून भूमी पेडणेकर, तापसी पन्नू या तरुण अभिनेत्रींना म्हातारे बनवले आहे. हे मेकअपद्वारे म्हातारं भासवणं प्रेक्षकांना काही रुचलं नाही, कारण ते तितकं विश्वासार्ह दिसत नाही. कलाकारी एवढी बेमालूम असायला हवी की वास्तवात असं काही घडू शकतं एवढा विश्वास सहज बसायला हवा. पण त्यासाठी त्यातील पात्रं किमान वास्तविक वाटायला हवीत ना? या प्रोस्थेटिक मेकअपच्या म्हाताऱ्या पाहून फिल्म इंडस्ट्रीतून अनेक दबके आवाजसुद्धा ऐकू आले होते. त्यातील नीना गुप्ता या अभिनेत्रीचे ट्वीट चांगलेच व्हायरल झाले. त्या ट्वीटमध्ये त्यांनी असे म्हटले होते की ‘हमारे उमर के रोल तो कम से कम हमसे करलो भाई'. प्रातिनिधिक स्वरूपात जरी हे ट्वीट असलं तरी ही परिस्थिती सर्रास पाहायला मिळते आहे. कथेच्या गरजेनुसार तेवढ्या किंबहुना त्याहून चांगल्या दर्जाचे कलाकार उपलब्ध असताना मेकअपच्या भरवशावर असे निर्णय का घेत असतील हे कोडेच आहे.

ही परिस्थिती केवळ हिंदी चित्रपटांचीच आहे असे नाही. मराठीमध्येसुद्धा या प्रकारच्या गोष्टी घडल्या आहेत. बिझनेसच्या दृष्टीने विचार करून स्टार व्हॅल्यू असणारे कलाकार घेऊन त्यांच्यावर मेकअपची कलाकारी झाली आहेच. याची दोन उदाहरणे द्यायची झाली तर "अजिंठा' आणि आताच येऊन गेलेला "हिरकणी' चित्रपट. वास्तवात प्रचंड गोऱ्या कांतीच्या सोनाली कुलकर्णीला मेकअप करून काळं केलं गेलंय. या सर्वात कलाकाराच्या अभिनय कौशल्यावर, कथेच्या उद्दिष्टावर हे आक्षेप नाही. आक्षेप आहे दिग्दर्शकाच्या मेकअपवरील श्रद्धेवर. कथेला लागणाऱ्या योग्य वर्णाच्या चांगल्या कलाकारावर अनाहूतपणे होणाऱ्या अन्यायावर. या फेऱ्यातून मालिका तरी कशा वाचतील? स्टार प्रवाह वाहिनीवर नुकतीच "रंग माझा वेगळा' नावाची मालिका सुरू झालीये. त्यातही वर्णभेदावर, गोऱ्या रंगाच्या नाहक मोठेपणावर बोट ठेवलं गेलं आहे. सामाजिकदृष्ट्या बोध म्हणून या मालिकेचा विषय खरोखरीच खूप चांगला आहे, पण यातही परिस्थिती तीच. सावळी किंवा काळी व्यक्तिरेखा दर्शवताना गोऱ्या रंगाच्या अभिनेत्रीला रंगरंगोटी करून बळेच काळवंडून टाकलेय.

एका सर्व्हेनुसार चंदेरी पडद्यावर झळकण्यासाठी, फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्यासाठी मुंबईमध्ये रोज तब्बल दोन ते तीन हजार इच्छुक कलाकार येत आहेत. त्यातील केवळ ५% लोकांना काही ना काही काम मिळत आहे. बाकी लोक मुंबईमध्ये राहण्याचा, ऑडिशनवर ऑडिशन देण्याचा भार कसेबसे उचलत आहेत. ज्यांची आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची आहे ते काही दिवसांत हताश होऊन गाशा गुंडाळून माघारी जात आहेत तर काही जमेल तसे नेटाने झगडत आहेत. या परिस्थितीमध्ये त्यांचे वय, उंची, जाडी, रंग या अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या त्यांच्या करिअरच्या आड येतायेत. अशा वेळी उत्तम अभिनयकौशल्य असूनही त्यांना निराश होऊन परत फिरावे लागत आहे. अशा वेळी जर त्यांच्या हक्काचे रोलसुद्धा बिझनेसच्या नावाखाली "सेलिब्रिटीज'ना देऊ केले तर या एवढ्या मोठ्या संख्येने कुणाकडे पाहावे?

हे जर आपण त्या ठराविक दिग्दर्शकांना विचाराल तर मार्केटिंग टेक्निक्स, बिझनेस याव्यतिरिक्त "अपेक्षित दर्जाचा अभिनय आम्हाला मिळणार नाही' वगैरे कारणे देऊ लागतील. अशा वेळी काही उदाहरणे प्रकर्षाने द्यावी वाटतात की, तथाकथित बॉडी-फिगर आणि कलरच्या रकान्यांत परफेक्ट न बसणाऱ्या तरीही अभिनयकौशल्य खणखणीत असणाऱ्या अनेक अभिनेत्यांना जेव्हा केव्हा संधी मिळाली आहे तेव्हा त्यांनी त्या त्या संधीचे सोने केले आहे. या यादीत अगदी ओम पुरी यांच्यापासून आजच्या काळातील नवाजुद्दीन सिद्दिकी, पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, श्वेता त्रिपाठी, स्वरा भास्कर, राजकुमार राव, अंजली पाटील अशी कित्येक नावे घेता येतील. यांतील कुणाच्याच पाठीशी वंशपरंपरागत फिल्म इंडस्ट्रीचा वारसा नव्हता, ना तथाकथित देखणेपण.

अशा वेळी मर्यादित अर्थाने का होईना मराठी चित्रपटसृष्टीचा अभिमान वाटायला लागतो. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, अगदी दादा कोंडके हे काही हिरॉइक नव्हते, तरीही त्यांच्या कलेला प्रेक्षकांकडून न भूतो न भविष्यति दाद मिळाली. नागराज मंजुळे, भाऊराव कऱ्हाडे या मंडळींनी तर सगळी समीकरणेच बदलून टाकली. सौंदर्याची, अभिनयाची सगळे मापदंड बदलून स्वतःच्या दिग्दर्शकीय ताकदीने प्रेक्षकांना आपलंसं केलं. सैराटमधलं एकुणेक पात्र शोधून आणण्याचं आणि त्यावर मेहनत करवून घेण्याचं दिव्य त्यांनी 'सैराटच्या नावानं चांगभलं' या मेकिंग सिरीजमध्ये दाखवून दिलं. कथेला, दिग्दर्शकाला हवं असलेलं हुबेहूब पात्र शोधणं आणि मग त्याच्यात अभिनयकौशल्य रुजवणं हे नागराजने केलं आहे. हिंदीमध्ये बॉलीवूडच्या तथाकथित सौंदर्याच्या फुटपट्टीने पडताळून न पाहता अनेक तगड्या अभिनयकौशल्याच्या कलाकारांना अनुराग कश्यपने "गँग्ज ऑफ वासेपूर' मध्ये घेऊन स्वतःला आणि त्या फिल्ममेकिंगला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवल्याचं आपण जाणतोच. गरज असेल तिथे योग्य त्या वर्णाचा, वयाचा अभिनेता घ्यायला हवा किंवा स्टारडमचा, बिझनेसचा विचार करायचा असेल तर किमान त्या अभिनेत्याकडून त्या पद्धतीने गरज असेल तेवढी मेहनत करून घ्यायला हवी. जसे की कथानकानुसार शरीरयष्टीची गरज. "थ्री इडियट्स' मध्ये आमिर खानने कॉलेज स्टुडंट दिसावं म्हणून वजन कमी करून घेतलं होतं, गजनीमध्ये बॉडीला कट्स मिळावेत म्हणून मेहनत घेतली होती, "दंगल'मध्ये वय आणि पहिलवानाची शरीरयष्टी दिसावी म्हणून वजन वाढवलं होतं. अगदी सलमाननेसुद्धा "सुलतान'साठी चांगलीच मेहनत केली होती. "दम लागा के हैशा' साठी भूमी पेडणेकरने तब्बल ४० किलो वजन वाढवलं होतं. "नटरंग'साठी अतुल कुलकर्णी यांनी १४ किलो वाढवलेसुद्धा होते आणि जवळपास १७ किलो कमीसुद्धा केले होते. 

मेहनत घेणारे कलाकार असतील तर तिथे कुठल्या प्रोस्थेटिक मेकअपची, व्हीएफएक्सची गरजच नाही. याहून अधिक विश्वासार्ह ते काय असेल? ज्या ज्या ठिकाणी अशा मेकअपची गरज आहे आणि त्या ठिकाणी तेवढ्या उंचीच्या सेलिब्रिटी अभिनेत्याचीही गरज आहे. अशा वेळी त्यावर केलेला मेकअप एवढा वास्तविक हवा की त्याखाली झाकलेला कलाकार कोण हे चटकन लक्षात येऊ नये, किंवा तो कलाकार कोण असेल हे शोधण्याची गरजही भासू नये. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे 'पा' चित्रपटातील अमिताभ बच्चन. प्रेक्षक वर्गाने वेगवेगळ्या माध्यमांतून फिल्म मेकर्सकडे या अशा गोष्टीचा सातत्याने आग्रह धरायला हवा. अदरवाइज दे आर नॉट गोइंग टू "वेकअप' फ्रॉम देअर ब्लाइंड लव्ह ऑफ"मेकअप'.

लेखकाचा संपर्क : ८३०८६३९३७७

बातम्या आणखी आहेत...