आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maheshkumar Munjale Writes About Ambedkar Jayanti

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘भीमराव’ अंडरग्राऊंड इन ‘हिंदु’स्थानी मोहल्ला!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज १४ एप्रिल, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. आज नेमका रविवार आल्याने कित्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी एक सुटी वाया गेल्याची हळहळ केली असेल. पण; यातलेच काही लोक  ‘तुमचा सण' आला म्हणून एकमेकांना चिडवून मोकळेही झाले असतील. गौतम बुद्धांची  मूर्ती,  बाबासाहेबांची प्रतिमा, निळ्या रंगाचे कपडे, जय भीमचा उच्चार, अशोक चक्र अशा सर्व गोष्टींचं आपल्याला किती भयंकर वावडं आहे, याचं आत्मपरीक्षण केलंय का कधी? केलंय  का कधी म्हणण्यापेक्षा ते करण्याची गरज वाटलीय का कधी?


आंबेडकरांच्या कर्तृत्वाला सलाम ठोकत, त्यांच्या ‘भीमराव' नावाला संबोधत, ‘जय भीम’ असा जयघोष निर्मिला गेलाय. मग आपण जय भीम म्हणताना आंबेडकरांप्रती आदर व्यक्त करण्याऐवजी ती एखाद्या जातीची परंपरागत नमस्कार करण्याची पद्धत असल्यासारखी का गृहीत धरलीय, याचं उत्तर स्वतःला विचारायला हवं...

फोन उचलल्या उचलल्या समोरून कडक ‘जय भीम' कानावर पडला. तो एवढा कडक होता की, काही क्षणांसाठी मी गोंधळून गेलो. इकडेतिकडे पाहिलं, आपल्याकडे कुणाचे  लक्ष नसल्याचा अंदाज घेतला, आणि दबक्या आवाजात ‘जय भीम' म्हणून बोलायला सुरुवात केली. हे असं माझ्याच काय, आपल्यातील कित्येकांसोबत घडत असतं . ‘जय भीम'ला  ‘राम-राम'चा रिप्लाय देण्याइतके कडवे हिंदुत्ववादी आपण नसलो तरी चार माणसांत ‘जय भीमचा' रिप्लाय ‘जय भीम'नेच देण्यात आपल्याला अवघडल्यासारखं होऊन जातं.


लहान असताना दारावर आलेल्या मूर्ती विक्रेत्याकडून मी स्वतः साठवलेल्या पैशांतून एक सुंदर गौतम बुद्धांची मूर्ती विकत घेतली होती. ती मूर्ती मोजून दोनच दिवस आमच्या घरात टिकली.  कारण; येता जाता प्रत्येक जण त्या मूर्तीमुळे आमच्याकडे संशयाने पाहायचे. घरात आलेले पाहुणे स्वतःची विनोदबुद्धी दाखवत ‘जात बदलली का काय?' म्हणत स्वतःच हसायचे. कुणी कुणी ‘नका ठेवू असलं काही, लोकांचा दृष्टिकोन बदलतो, आपल्याकडे पाहण्याचा' असं म्हणत ‘अतीव आपुलकी’ दाखवत फुकटचा सल्ला देऊन जायचे. शेवटी, समाजाच्या म्हणण्याप्रमाणेच झालं आणि वडिलांनी मूर्ती शेजारच्या ‘साळवे' आजोबांना  देऊन टाकली. आता त्या ‘साळवे' आजोबांनाच का दिली, त्यांनी ती कशी काय स्वीकारली, असे प्रश्न आपल्याला पडणार नाहीत. कारण आपलं जनरल नॉलेज कितीही जनरल असलं, तरी आडनावातून जात काढण्याची हातोटी आपल्याला जन्मजात प्राप्त झाल्यासारखी आहे.

हे माझे वैयक्तिक अनुभव असले तरी समाज म्हणून साधारणपणे आपण प्रत्येक जण अशा कुठल्या ना कुठल्या प्रसंगातून नक्कीच गेलेलो असणार. आता निवडणुकांमुळे वातावरण तापलेलं आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येकाच्या तोंडी राजकीय गप्पा आहेत. परवा, चहाच्या टपरीवर चहा पिताना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांच्या गप्पा कानावर पडल्या. "...पण काहीही म्हणा, प्रकाश आंबेडकर सेन्सिबल माणूस आहे. त्यांच्याकडं वैचारिक बैठक आहे.’ त्याचं  बोलणं संपतं न संपतं, तेच बाकी तिघांनी एकमेकांना इशारे करत हसत टाळ्या द्यायला सुरुवात केली. अशी ही अचानक ‘हुर्ये’ झालेली पाहून तो मुलगा स्वतःहूनच सारवासारव करू लागला, "च्यायला पाटील आहे मी, जस्ट तारीफ केली म्हणजे लगेच ‘जय भीम’ नाय झालो.' आता दोन मिनिटांपूर्वी प्रकाश आंबेडकरांची सेन्सिबिलिटी सांगणारा मुलगा उच्चवर्णीय कम्पूशाहीच्या भयाने पाटीलकीची नॉन्सेन्स सारवासारव करू लागला होता. माझ्या ओळखीतले एक कला शिक्षक, मधुकर सर स्वतःचा अनुभव सांगत होते. किराणा दुकानात गेले, तेव्हा तिथे असणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीने गाडीवर निळे चक्र पाहून त्यांना खोचक प्रश्न विचारला, "तुम्ही लोक हे असलं चक्र का लावता हो जिथं तिथं?’ सर हसले, "आम्ही लोक?’ असं मनाशीच पुटपुटले आणि त्या व्यक्तीला प्रश्न विचारला, "तुम्हाला माहितीय का, हे चक्र काय आहे?’ "हो, ‘जय भीम’ लोकांचं चिन्ह आहे ते’ तो उत्तरला. यांनी हसून उत्तर दिलं, "जय भीम असे काही लोक नसतात. चक्र हे प्रगतीचं लक्षण आहे. हे अशोक स्तंभावरचं चक्र आहे. हेच चक्र आपल्या तिरंग्यातसुद्धा आहे, हे माहितीय का तुम्हाला?’ तो माणूस जरा गांगरला. "होय होय माहितीय की, तिरंग्यात आहे.’ "मग हे फक्त जय भीम लोकांचं कसं काय झालं चक्र?’ तो जरा ओशाळला आणि सॉरी म्हणून स्वतःच्या सामानाची पिशवी उचलून निघून गेला...


...आपण माणूस म्हणूनच नकली असल्यामुळे दर्शक म्हणून आपल्याला चेटकीण, डायन, रात्रीचे खेळ, दिवसाचं ग्रहण अशा सिरियल्स जास्त आवडू लागतात.  बाळू मामा, खंडोबा, विठ्ठल, गणपती या पुराणातल्या वानग्यांची भरीतं सिरियल्समधून जास्त रुचकर वाटतात. मग अशी अभिरुची असणाऱ्या प्रेक्षकांसमोर एखाद्या महापुरुषाचा जीवनपट ठेवणं निर्माते म्हणून किती धाडसाचं असेल? त्यातही जातीच्या कोंदणात बसवलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यावर सिरियल करणं हे सर्वात धाडसाचं म्हणायला हवं. टीआरपीच्या गणितात न बसणाऱ्या बाबासाहेबांवर अशी काही कलाकृती एखादा चॅनेल करू पाहतोय, एखादा निर्माता त्यासाठी आपला पैसा  लावतोय, हे एकीकडे धाडसाचं वाटतं, तर एकीकडे आशादायीसुद्धा. आशादायी यासाठी की आंबेडकर आणि गांधी या दोन अशा व्यक्ती आहेत की ज्यांच्याबद्दल फारशी माहिती नसतानाही त्यांच्या बाजूने आणि त्यांच्या विरोधात टोकाची मतं व्यक्त करणारे लोक सर्वात जास्त आहेत. विरोध करा किंवा अनुयायी बना, पण त्या माणसाला नीटनेटकं जाणून घेऊन मग आपलं मत बनवा, हे जे सभ्यतेचं  लक्षण आहे, ते निर्माण होण्याची अपेक्षा ही सिरियल पूर्ण करू शकेल.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची गौरवगाथा' या नावाने ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर पुढच्या महिन्याच्या अठरा तारखेपासून म्हणजे बुद्ध जयंतीचे औचित्य साधून ही मालिका येत आहे. दशमी क्रिएशन निर्मिती संस्था असून, अजय मयेकर दिग्दर्शन करणार आहेत. नुकत्याच येऊन गेलेल्या ‘भाई-व्यक्ती की वल्ली’ चित्रपटामध्ये पु.ल.देशपांडेची भूमिका करणारे सागर देशमुख या मालिकेत बाबासाहेबांची भूमिका साकारणार आहेत. कुठलाही बिझनेसमन वारं येईल तसं धान्य उफणणाऱ्या मानसिकतेचा असतो, पण वाऱ्याच्या उलट उभं राहून उफणणारे विरळाच, ठार वेडेच. पण हे वेडेच बऱ्याचदा काही तरी भरीव करून जातात. एकंदर महाराष्ट्राचा सूर पाहता बाबासाहेबांवर मालिका करण्याचा निर्णय घेणं, हे याच वेडेपणाचं  लक्षण म्हणावं लागेल. हा निर्णय घेण्यात मोठा वाटा असणारे स्टार प्रवाह वाहिनीचे कंटेंट हेड आणि सिने दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचं स्पष्ट मत आहे की, ‘एक स्टोरी टेलर म्हणून मला वैयक्तिकरीत्या असं वाटतंय की, ज्या एका व्यक्तीच्या कृतज्ञतेपायी दादर चैत्यभूमी, नागपूरच्या दीक्षाभूमी यांसारख्या ठिकाणी देशभरातून लाखो लोक येतात. आमच्या भाकरीवर, आमच्या जगण्यावर केवळ बाबासाहेबांचा अधिकार आहे, असं लोक म्हणतात, तेव्हा त्या व्यक्तीचं सामर्थ्य किती मोठं असेल विचार करा. आजही कुणा सामान्याला विचारलं, तर संविधान लिहिणारा माणूस या पलीकडे कित्येकांना बाबासाहेबांबद्दल फारशी माहिती नाही. त्यांचा संघर्ष, त्यांच्या आयुष्यातले चढउतार, त्यांचा त्याग आणि त्यांचं संपूर्ण देशासाठी असलेलं कार्य, एवढं उत्तुंग आहे की, त्यांचा जीवनपट सर्वांपर्यंत पोहचवायलाच हवा, असा आमचा ध्यास आहे. त्याच ध्यासापायी, हे सर्व चालू आहे. बाबासाहेब सर्वाना कळावेत, हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे.'

‘बाबासाहेब म्हटलं की केवळ आरक्षण देणारे, असा गैरसमज समाजात आहे. त्यांना केवळ मागासवर्गीयांचा कैवारी म्हटलं जातं, हे आपलं अज्ञान आहे. गरोदर स्त्रीला तीन महिन्यांची अधिकृत सुटी, कामगारांना आठ तासांची शिफ्ट, द्विभार्या प्रतिबंधक कायदा अशा विविध स्त्री हक्काच्या, कामगार हक्काच्या निर्णयांत त्याचे मोठे योगदान होते, हे जोवर सर्वांपर्यंत पोहोचत नाही, तोवर परिस्थिती बदलणे अवघड आहे. एक स्त्री म्हणून माझ्यावर त्यांचे खूप थोर उपकार आहेत, असं मी मानते. याच उपकरांतून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न,’ असं दशमी क्रिएशनच्या प्रतिनिधी म्हणून अपर्णा पाडगावकर बोलत होत्या.

आपलं वैचारिक अधःपतन एवढं जबरदस्त झालेलं आहे की, या अशा उदात्त हेतूने काम करणाऱ्या धाडसी कलाकारांचं कौतुक आपल्याच्याने होणार नाही. कलाकृती किती उत्तम आहे त्यापेक्षा ती साकारणारा कोण आहे, त्याची जात काय आहे, यावरच आपली रुची ठरते. मागे एका वाहिनीला मुलाखत देताना, दिग्दर्शक महेश मांजरेकर नामदेव ढसाळ यांचा जीवनपट करण्याचा मानस असल्याचं म्हणाले. त्यावर सोशल मीडियात त्यांच्यावर प्रचंड शेरेबाजी झाली होती. मांजरेकरांसारख्या उच्चवर्गीयाने दलित पँथरवर काम करू नये, तो त्यांचा प्रांत नव्हे. त्यासाठी कुणी ‘दलित' दिग्दर्शकच हवेत, असा सूरही कित्येकांनी लावला होता. अर्थात ‘भाई-व्यक्ती की वल्ली' मध्ये पु.ल. देशपांडे यांचा जीवनपट पाहणाऱ्या दर्शकांच्या बऱ्याच संमिश्र प्रतिक्रियासुद्धा या ट्रोलिंगला कारणीभूत होत्याच. पण कलाकाराची सामाजिक जाणीव न पाहता त्याची जात पाहून विरोध होण्याची ही पहिलीच घटना नव्हती. डॉ. जब्बार पटेलांनी बाबासाहेबांचा जीवनपट चित्रपटातून मांडण्याचा निर्णय घेतला तेव्हाही असाच विरोध झाला होता. जब्बार पटेलांऐवजी श्याम बेनेगल यांनी हा चित्रपट करावा, अशी मागणी त्या वेळी बाबासाहेबांच्या कुटुंबाकडून केली जात होती. शेवटी त्यावर तोडगा म्हणून बेनेगलांना सल्लागार दिग्दर्शक म्हणून पाचारण करण्यात आले. या नव्याने चालू होणाऱ्या मालिकेमागचा उदात्त हेतू लक्षात घेतला तर ठीक, नाही तर या वेळीही स्वतःला दलितांचे कैवारी समजणाऱ्या कंपूकडून मेकर्सची जात काढली जाण्याचा धोका, तर आहेच. जातीच्या नावाने राजकारणाची पोळी भाजणाऱ्या राजकीय वावटळीत आपली माणूसपणाची  नौका हेलकावे खाऊ लागली आहे. त्यामुळे ‘भीमराव' सारखा दीपस्तंभ प्रत्येकाला स्पष्ट दिसावा आणि त्याच्या जीवन नौकेला नेटकी दिशा मिळावी. हा दीपस्तंभ भक्कमपणे उभा ठेवण्यासाठी स्वतःला मानवतावादी, पुरोगामी समजणाऱ्या लोकांनी आपले हात द्यायला हवेत. कारण; क्रियाशील निर्बुद्धांपेक्षा निष्क्रिय बुद्धिवादी देशासाठी, समाजासाठी जास्त घातक आहेत. आपण तुकोबांच्या मूळ गाथेला बुडताना वाचवू शकलो नाहीच, ना त्यांच्या वैकुंठगमनाच्या कथेला जोरदार प्रश्न विचारले. झालं ते झालं, आता या 


‘भीमरावाच्या गौरवगाथेला' आपल्याला तरतं ठेवायचंय...


लेखकाचा संपर्क : ८३०८६३९३७७

महेशकुमार मुंजाळे
maheshmunjale@gmail.com