Magazine / "ऑफेंड' होणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे!

अभिव्यक्तीचे, जगण्याचे, धर्माचे स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिले आहे, पण त्यावर वेगवेगळ्या गटांकडून, संस्थांकडून आणि काही वेळा सरकारकडून दबाव आणला जातोय.

महेशकुमार मुंजाळे

Jul 07,2019 12:08:00 AM IST

अभिव्यक्तीचे, जगण्याचे, धर्माचे स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिले आहे, पण त्यावर वेगवेगळ्या गटांकडून, संस्थांकडून आणि काही वेळा सरकारकडून दबाव आणला जातोय. प्रत्येक वेळी आमच्या भावना दुखावल्या, अस्मिता दुखावल्या असं म्हणत गटागटाने हल्ले होत आहेत, अशांतता पसरवली जात आहे. हे हेतू सांगण्याचे, माफीनामे जाहीर करण्याचे, निवेदन, सूचना किंवा विनंत्या करण्याचे काम आता हळूहळू एवढे वाढू लागले आहे की मुख्य मनोगतापेक्षा ‘डिस्क्लेमर' मोठा अशी परिस्थिती आलीय.

विनोदातून देशाच्या सद्य:स्थितीवर भाष्य करत करत भाडिपाच्या पेजवर असणाऱ्या ‘आपल्या बापाची’ हा व्हिडिओ शेवटी चांगलीच उंची गाठतोय. म्हणूनच समाजहिताचा विचार करणाऱ्या अनेक मंडळींनी हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटचा वापर केलाय.

"हमे अपने भगवान की रक्षा करनी आती है...""तुम करेगा रक्षा भगवान का? तुम? अरे इत्तासा है ई गोला. इससे बडा बडा लाखो-करोडो गोला घूम रहा है अंतरीक्षमा. तुम इस छोटासा गोला का, छोटासा सेहेर का, छोटासा गली में बैठकर बोलता है वो की रक्षा करेगा जो ये सारा जहान बनाया. उसे तोहार रक्षा की जरुरत नाही. वो अपनी रक्षा खुदई कर सकता है. आज कौनो अपना खुदा की रक्षा करने का कोशिश किया और हमरा दोस्त चला गया. बस ये रेहगवा उका जुता. भगवान की रक्षा करना बंद करो नही तो ये गोला पे इन्सान नही सिर्फ जुता रह जायेगा.'' कुणा तरी धार्मिक गटाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या म्हणून चित्रपटातील नायकाने त्याचा जवळचा मित्र गमावला. त्या उद्विग्न अवस्थेतून निघालेलं आमीर खानच्या "पिके' चित्रपटातील हे मनोगत.


मागच्या आठवड्यात 'आर्टिकल १५' नावाचा सिनेमा रिलीज झाला. त्याची गोष्ट काय आहे, संदेश काय आहे या गोष्टींपेक्षा त्या चित्रपटाने कुठल्या तरी ब्राह्मण संघटनेच्या, हिंदू संघटनेच्या भावना दुखावल्या म्हणे. बिहार मधल्या गांधी मैदानाजवळच्या एका चित्रपटगृहाला "ऑल बिहार ब्राह्मण फेडरेशन' नावाच्या संघटनेने "आर्टिकल १५' दाखवायचा नाही अशी सक्त ताकीद दिली आणि तो शो बंद केला. हे बिहार मध्येच नाही तर बऱ्याच राज्यांत असच झालं. सिनेमागृहात थेट पोलिसच पोहचल्याच्या घटना काही ठिकाणी झाल्या. पण, या पटणाच्या सिनेमागृहाची पुन्हा काही दिवसांनी लगेच बातमी आली की भीम आर्मीने बळाचा वापर करत 'भारत' आणि 'कबीर सिंग' या चित्रपटांना आलेल्या प्रेक्षकांना बाहेर काढले आणि त्या चित्रपटगृहाच्या प्रशासनाला हे दोन्ही चित्रपट बंद करा पण 'आर्टिकल १५' दाखवायलाच हवा असा सज्जड दम भरला. कारण काय तर त्या ब्राह्मण संघटनेच्या कृत्यामुळे त्यांच्याही भावना दुखावल्या होत्या.


कपड्यांचा, बोलण्याचा, गाण्यांचा, डायलॉगचा, विशिष्ट हेअरस्टाईलचा वगैरे वगैरे ट्रेंड आल्याचा आपण ऐकला असेल. पण आपल्या देशात आता भावना दुखावण्याचा ट्रेंड आलाय हे माहितीय का आपणांस? आज अमुक अमुक कारणामुळे तमुक तमुक गटाच्या भावना दुखावल्या गेल्या अशी रोज एक तरी बातमी आपल्याला पहायला मिळते. भारतीय मानवी मनाच्या "हळव्या, सुकुमार, कोमल' भावना दुखावल्या जाण्याचं हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. कुणा आयएएस अधिकारी महिलेचे उपरोधिक ट्वीट सहन न झाल्याने कुणा नेत्याच्या भावना दुखावतात आणि तिची तडकाफडकी बदली होते. कुणी नेता, आपल्या नेत्याबद्दल बोलला म्हणून भावना दुखावलेले कार्यकर्ते त्या नेत्याच्या कार्यकर्त्यांना जाऊन बदड बदड बदडतात, त्याच्या ऑफिसची तोडफोड करतात. कुणा एखाद्या चित्रपटात आपल्या देव देवतांच्या कथेशी छेडछाड केली जात आहे असा अंदाज लाऊन दिग्दर्शकाला काळं फासलं जातं, थोबाडीत दिली जाते. लाखो रुपये खर्च करून उभा केलेला सेट जाळला जातो, नट-नट्यांना धमक्या दिल्या जातात त्यांचे पुतळे जाळले जातात. कुणी नटी सोशल मिडीयावर बोलता बोलता आपल्या भाषेचा अपमान करत आहे असे म्हणून तिला भयंकर अश्लाघ्य भाषेत शिव्या देऊन, बलात्काराच्या धमक्या देऊन ट्रोल केले जाते. कुणी नटी निवडणुकीला उभी राहिली म्हणून पुरुषी अस्मितेला धक्का लागलेला उच्चविद्याविभूषित व्यक्ती तिच्या चारित्र्यावर शंका घेत सोशल मिडीयावर राळ उडवून देतो. कुणी उच्चवर्णीय स्वतःच्या धार्मिक अस्मिता जपण्यासाठी "तथाकथित' खालच्या जातीत जन्मलेल्या आठ वर्षाच्या लहानग्याला नागवं करून मंदिराच्या तापत्या फरशीवर त्वचा जळून चट्टे दिसावेत इतपत बसवतो. तर कुणी पेशाने बालरोगतज्ञ असणारा व्यक्ती कुठल्याशा पक्षाचा झेंडा उंचावत या सर्व प्रकारावर फुटकळ विनोद करून 'वंचित' पक्षाला टोमणे मारतो.
लिंग, वर्ण, वर्ग, वय, उंची या संदर्भात आपल्या भारतीयांच्या भावना दुखावल्या जातात पण त्याहून जास्त कोमल हळव्या भावना आपल्या देव, देश आणि धर्माबद्दलच्या आहेत. कुण्या संस्थेच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि धर्माकडे चिकित्सक दृष्टीकोनातून पहायला शिकवणाऱ्या दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश या लोकांना आपले जीव गमवावे लागले. मागे काही वर्षांपूर्वी कुणा नतद्रष्टाने महापुरुषांचे फोटो अश्लील पद्धतीने एडीट करून सोशल मिडीयावर व्हायरल केले आणि अनेक जाज्वल्य हिंदूंच्या भावना दुखावल्या, शहर अशांत झालं, दंगल सदृश्य परिस्थिती तयार झाली आणि काहीही कारण नसताना मोहसीन शेख नावाच्या युवकाला ठार मारलं गेलं. आता मागच्या आठवड्यात कुणा हिंदू टोळक्याच्या भावनांना धार्मिक उकळ्या फुटल्या आणि एका मुस्लीम तरुणाला 'जय श्री राम' म्हण असं म्हणत खांबाला बांधून मारलं गेलं, यात त्याचा जीव गेला. कित्येकांचं गाय प्रेम उफाळून आलं, धार्मिक अस्मिता जाग्या झाल्या आणि मॉब लीन्चींगचे प्रकार घडू लागले. रॉयटर्स रिपोर्ट नुसार २०१० ते २०१७च्या दरम्यान या अशा स्वयंघोषित गोरक्षकांचे देशभरात ६३ हल्ले झाले. यातील सर्वात जास्त हल्ले मोदी सरकारच्या काळात झाले. या हल्ल्यांत २८ लोक मृत्युमुखी पडले तर १२४ जखमी झाले. गेल्या दोन वर्षात हा असा मॉब लीन्चींगचा आकडा प्रचंड वाढलाय हे आपण वर्तमानपत्रात वाचतोच आहोत.


आता काही दिवसांपूर्वी एका वृत्त वाहिनीने एका महापुरुषाच्या नावे ठेवलेल्या कार्यक्रमाच्या शीर्षकावरून विशिष्ट वर्गाच्या भावना दुखावल्या. त्या दुखावण्याचे प्रमाण एवढे तीव्र होते की आजतागायत ती वृत्तवाहिनी बिचारी माफिनामेच सादर करत आहे. आपल्या भावना, अस्मिता दुखावल्यामुळे समोरच्या व्यक्तीला विरोध करायला काहीच हरकत नाही, पण तो विरोध त्याची आर्थिक, मानसिक किंवा जीवित हानी करून दर्शवण्याने काय हाशील होतेय कुणास ठाऊक.


पुण्याच्या काही तरुण मंडळीनी सुरू केलेल्या 'भारतीय डिजिटल पार्टी' नावाच्या युट्युब चॅनलने आजवर विविध प्रकारचे शोज प्रदर्शित केले आहेत. त्यांचा 'कास्टिंग काउच विथ अमेय अँड निपुण' हा शो चांगलाच गाजला. त्यानंतर त्यांनी विविध प्रकारच्या सिरीज आणि व्हिडीओ ब्लॉग्ज प्रेक्षकांसमोर आणले. याच सिरीजमध्ये 'आपल्या बापाची...' नावाची एक भन्नाट विनोदी, उपरोधाने खच्चून भरलेली सिरीज त्यांनी आणली. या सिरीज मध्ये 'आपल्या बापाचा रस्ता', 'आपल्या बापाची सोसायटी', 'आपल्या बापाचं हाटेल' असे विविध व्हिडीओज त्यात होते. मागच्या आठवड्यापासून या भाडीपाच्या पेजवर असणाऱ्या 'आपल्या बापाची...' सिरीज मधला नवा एपिसोड अपलोड झालाय आणि तो चांगलाच व्हायरल होतोय, चर्चिला जातोय. त्याचं नाव आहे 'आपल्या बापाची कॉमेडी'
एक वर्गखोली आहे, त्यात गुरुजी फळ्यावर काहीतरी लिहित आहेत. त्या फळ्यावर लिहिलंय, 'नॅशनल ऑफेन्स अकॅडमी'. म्हणजे ही आहे दुखऱ्या भावनांना योग्य(?) पद्धतीने वाट करून देणारी शाळा. वर्गात बसलेल्या लोकांना गुरुजी उभे राहण्याचा आदेश देतात आणि प्रतिज्ञा म्हणवून घेतात. प्रतिज्ञा आहे 'ऑफेंड होणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी ऑफेंड होणारच.' या अशा गमतीदार उपरोधिक सुरात चालू झालेला हा एपिसोड आपण कोणकोणत्या गोष्टींवर कोण कोणत्या प्रभावी पद्धतींनी स्वतःच्या भावना दुखावून घेऊ शकतो आणि त्या दुखावल्याचे व्यक्त करू शकतो हे दाखवून देतोय. अभिनेते सागर देशमुख यांनी गुरुजीची भूमिका फार सुंदर केलीय. तेरा मिनिटाच्या या व्हिडीओत आपण अनेक ताज्या घटना रिलेट करू शकतो. विनोदातून देशाच्या सद्यस्थितीवर भाष्य करत करत हा व्हिडीओ शेवटी चांगलीच उंची गाठतोय. म्हणूनच समाजहिताचा विचार करणाऱ्या अनेक मंडळींनी हा व्हिडीओ सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी स्वतःच्या सोशल मिडीया अकाऊंटचा वापर केलाय.


अभिव्यक्तीचे, जगण्याचे, धर्माचे स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिले आहे पण त्यावर वेगवेगळ्या गटांकडून, संस्थांकडून आणि काही वेळा सरकारकडून दबाव आणला जातोय. प्रत्येकवेळी आमच्या भावना दुखावल्या, अस्मिता दुखावल्या असं म्हणत गटागटाने हल्ले होत आहेत, अशांतता पसरवली जात आहे. म्हणूनच कुणा सामान्य व्यक्तीला फेसबुकवर व्यक्त व्हायचं म्हटलं तरी तळटीप देऊन पोस्ट टाकण्यामागचा हेतू स्पष्ट करावा लागत आहे. हे हेतू सांगण्याचे, माफीनामे जाहीर करण्याचे, निवेदन, सूचना किंवा विनंत्या करण्याचे काम आता हळूहळू एवढे वाढू लागले आहे की मुख्य मनोगतापेक्षा 'डिस्क्लेमर' मोठा अशी परिस्थिती आलीय. हे असं प्रत्येक गोष्टीवर डिस्क्लेमर देण्याची वेळ येणं म्हणजे आपण वैचारिकदृष्ट्या मागास होत चालल्याचं लक्षण आहे. हा मागासपणा आणि इथलं गढूळ वातावरण पाहून प्रत्येक आईने स्वतःच्या पोटात असणाऱ्या बाळालाच डिस्क्लेमर द्यायला हवा 'बाळा, तू भारतात जन्म घेत आहेस. तुझ्यावर कुणाच्या भावना-अस्मिता दुखावल्या जाण्याचा आरोप वयाच्या कोणत्याही वर्षी होऊ शकतो त्यामुळे तुला जन्माला यायचे असेल तर स्वतःच्या जबाबदारीवर येणे. यास आईबाप जबाबदार राहणार नाहीत. ती जबाबदारी घेण्याची वेळ येईपर्यंत आम्हीच कोणत्या लीन्चींगमध्ये कधी मारले जाऊ याची आम्हास खात्री नाही. कारण ''ऑफेन्ड' होणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे' असं म्हणणाऱ्या दुखऱ्या भावनांच्या (इन)सेन्सेटिव्ह लोकांनी हा देश व्यापून टाकलाय."

लेखकाचा संपर्क : ८३०८६३९३७७

X
COMMENT