Magazine / संशयाच्या कुंपणांवर माणुसकीची लक्तरे

याला अपवाद काही महिन्यांपूर्वी येऊन गेलेला ‘हामिद’ हा चित्रपट आणि नुकतीच प्रदर्शित झालेली ‘काफिर’ ही वेब सिरीज...

दिव्य मराठी

Jul 21,2019 12:10:00 AM IST

भारत पाकिस्तान युद्धावर, दहशतवादावर आजवर अनेक चित्रपट आले पण जवळपास सगळेच एकतर्फी. सगळ्यांना नागरिकांच्या राष्ट्रभक्तीचा कमर्शियली फायदा घेऊन आपला बिझनेस करायचा होता. या सर्व चित्रपटांचे मुद्दे, त्यांची बांधणी, त्यांचा जाज्वल्य राष्ट्राभिमान सर्व काही गल्ला सेंट्रिक होतं. याला अपवाद काही महिन्यांपूर्वी येऊन गेलेला ‘हामिद’ हा चित्रपट आणि नुकतीच प्रदर्शित झालेली ‘काफिर’ ही वेब सिरीज...

माणूसपण जपणं म्हणजे असुरक्षित जगणं असं होत नाही. उघड्या डोळ्यांनी जगणं आणि असुरक्षित असण्याच्या भयाने दुसऱ्याच्या हाती आपली सूत्र देणं यांत खूप मोठं अंतर आहे. काफिर काय किंवा हामिद काय दोन्हीही कलाकृती सातत्याने एकच गोष्ट अधोरेखित करत आहेत ती म्हणजे ‘मनातली कुंपणं नष्ट करून समोरच्याला संशयाने पाहण्याऐवजी त्याच्याकडे माणूस म्हणून पाहा.’

‘एक आठ-दहा वर्षाचा काश्मिरी मुलगा 'बर्फाच्छादीत डोंगरावरून पळत येताना दिसतो. त्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या नदीच्या जवळ तो पोहचतो. नदी नेमकी भारत पाकिस्तान सीमेवर दिसते. त्या मुलाला सीमारेषेवर लावलेल्या तारांच्या कुंपणाला रक्ताने माखलेलं फाटकं कापड दिसतं. त्याची नजर नदीकडे जाते.... तिथे छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेले काही मृतदेह पाहून तो पळतच सुटतो.' आणि गोष्ट उलगडायला सुरुवात होते ‘काफिर'ची; ‘झी फाईव' वर उपलब्ध असलेल्या ‘काफिर' वेब सिरीजची.


काश्मीर, सीमारेषा, रक्त, मृतदेह हे शब्द वाचतानाच कथेचा अंदाज आपल्या सुज्ञ डोक्याने लावला असेल. ही नक्कीच दहशतवाद्यांची, भारत-पाक युद्धाची किंवा दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या कुणा काश्मिरी लोकांची कथा असणार. खरोखर आपण सुज्ञ आहोत, आपल्याला "त म्हटल्यावर तपेलं' कळतं. आपल्या भवतालात असणाऱ्या हवेचा तो परिणाम आहे. ती हवा आपल्याला मूर्ख बनवते आणि सुज्ञ असल्याचा भास करून देते. आपल्याला हिंदू-मुस्लीम, भारत-पाक, दहशतवादी-सैनिक असच काहीसं चित्र चटकन डोळ्यासमोर दिसतं कारण तिथे असलेल्या सीमारेषेचं कुंपण दिसताना ते जमिनीवर आहे असंच दिसतं पण त्याचं खरं अस्तित्व आपल्या मनात आहे.
का घालतो आपण असं कुंपण कुठेही? आपल्याला संशय असतो कुणी येऊन आपल्या मालकी हक्काच्या गोष्टी चोरणार तर नाही ना? त्यावर कब्जा तर करणार नाही ना? त्या उध्वस्त तर करणार नाही ना? हा संशयच भाग पाडतो आपल्या भोवती कुंपण तयार करायला. आपण एवढे भेदरलेलो आहोत की प्रत्येक राहचलता आपला शत्रू वाटतो. त्याच्यापासून बचाव म्हणून आपण ही अशी कुंपणं लावून ठेवतो. रस्त्यावरचा माणूस घरात येऊन चोरी करेल की काय याचा आपल्याला संशय म्हणून घराला कुंपण. त्याने भागणार नाही म्हणून ‘कुत्र्यापासून सावधान' असे बोर्ड लावून ‘अतिथी देवो भवः' अशी आपली संस्कृती असल्याचं बेंबीच्या देठापासून सांगतो. तसचं ‘वसुधैव कुटुंबकम' म्हणायचं आणि बाहेरच्या देशातला माणूस आपल्या देशात येऊन काही उध्वस्त करेल याचा संशय म्हणून देशाला बोर्डर ठोकायची. अर्थात, सुरक्षेचा विचार असणं स्वाभाविक आहे. मरणाची, नष्ट होण्याची भीती प्रत्येकालाच आहे. अगदी विषारी फुत्कार करणाऱ्या सापालाही आहे आणि त्या वेगवान चित्त्यालाही आहे परंतु; आपल्या असुरक्षित असल्याच्या भावनेमुळे जेव्हा संशयी वृत्ती बळावते तेव्हा तिच्याद्वारे आपल्यातली माणुसकी चारीमुंड्या चीत होते.


यांनी म्हणावं 'हिंदू खतरे में है', त्यानी म्हणावं 'इस्लाम खतरे में है'. मध्येच कुणीतरी उठावं आणि म्हणावं 'देश खतरे में है'. अशी खतऱ्याची भीती एकदा घातली की, आपण साप साप म्हणत दोरी बडवली तरी त्याची जाणीव कुणाला होत नाही, उलट जहरी साप मारल्याचा पुरस्कार दिला जातो. तुमची मुलं असुरक्षित आहेत, पोरधरी मंडळी गावोगाव फिरत आहेत. असे मेसेजेस काय व्हायरल झाले अन् असुरक्षित गावकऱ्यांनी भटक्या जमातीच्या बहुरूपी लोकांना अक्षरशः मरेपर्यंत ठेचून मारलं. ही धुळ्याची घटना आता आपण विसरून सुद्धा गेलो आहोत. असे कित्येक लोक केवळ ‘संशयाच्या' नावाखाली मारले जातात देशभरात, याची आकडेवारी काढणं कठीण आहे.


मानवी भावभावनांचा आरसा असतो म्हणे चित्रपट. आता तोच आरसा संपूर्ण देशाला ‘काफिर' या वेबसिरीज मधून दाखवला गेलाय. कैनाझ अख्तर, पाकिस्तानी महिला. पाकव्याप्त काश्मिरमध्ये असणाऱ्या गावातून अपघाताने अगदी तिच्या नकळत थेट भारतात, सीमेपार येते. तिचं पाकिस्तानी असणंच पुरेसं असतं तिला दहशतवादी ठरवण्यासाठी. तिला तुरुंगात डांबण्यात येतं. तिथेच ती एका मुलीला जन्म देते. सात वर्षे त्या गजांच्या आड स्वतःच्या मुलीला घेऊन नरकयातना भोगणाऱ्या कैनाझची वेदांत राठोड नामक एका भारतीय पत्रकार-वकिलाशी भेट होते. तिथून वेदांतचा प्रवास चालू होतो कैनाझ आणि तिच्या सहा वर्षाच्या मुलीला "सेहेर'ला त्या नरक यातनांतून बाहेर काढून त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी'. तिचं हिंदू नसून मुस्लीम असणं, त्यात पाकिस्तानी असणं तिच्या आयुष्याला किती भयाण अंधकारमय करून गेलं हे पाहण्यासाठी, भारतीय काय किंवा पाकिस्तानी काय; कोत्या मानसिकतेच्या अनुभवांसाठी. निसीम माणुसकीच्या दर्शनासाठी ही सिरीज एकदा पाहायलाच हवी. कैनाझ पाकिस्तानी आहे म्हणजे ती "दहशतवादी' असू शकते ही शंका तिला एवढ्या प्रचंड मोठ्या दुःखाच्या दरीत ढकलून देते की तिच्या त्यावेळच्या दुःखाची कल्पना सुद्धा आपल्याला करवणार नाही. भारत पाक संबंधांवर, सीमारेषेवर किंवा काश्मीर प्रश्नावर काही भाष्य करणं हेच मुळात धाडसाचं आहे. त्यात कथेला एका पाकिस्तानी महिलेच्या भोवती फिरवणं आणि त्या अनुषंगाने भारतीय पोलिस, सैन्य, प्रशासन, न्यायलय आणि बेगडी राष्ट्रवाद्यांना जाब विचारणं म्हणजे आत्मघातच म्हणावा. लेखिका भावनी अय्यर आणि दिग्दर्शिका सोनम नायर यांनी ते आव्हान अतिशय हिमतीने पेलवून दाखवले आहे. कदाचित ही सिरीज अजूनही स्वयंघोषित राष्ट्रभक्तांच्या नजरेसमोर आली नाही नाहीतर गदारोळ नक्कीच झाला असता. ब्लॅक, गुजारीश, लुटेरा आणि आलिया भट अभिनित 'राजी' चित्रपटांसाठी पटकथा लिहिण्याचं काम केलेल्या भावनी अय्यर यांच्या लेखणीचा स्पर्श असल्याने ‘काफिर'ची कथा आपल्याला श्वास घ्यायला सुद्धा जागा देत नाही. आठ एपिसोड आपण सलग पाहू इतकी ती खिळवून ठेवते. काही पात्रांचा ढीला अभिनय, जरासं ढिलं दिग्दर्शन वगळता इतर प्रत्येक तांत्रिक बाजूने ही सिरीज उजवी झाली आहे. तांत्रिक चूकभूलीपेक्षा अशा नाजूक विषयाला हात घालण्याचं धाडस पाहूनच दोघींना सलाम ठोकावा वाटतो.


भारत पाकिस्तान युद्धावर, दहशतवादावर आजवर अनेक चित्रपट आले पण जवळपास सगळेच एकतर्फी. सगळ्यांना नागरिकांच्या राष्ट्रभक्तीचा कमर्शियली फायदा घेऊन आपला बिझनेस करायचा होता. या सर्व चित्रपटांचे मुद्दे, त्यांची बांधणी, त्यांचा जाज्वल्य राष्ट्राभिमान सर्व काही गल्ला सेंट्रिक होतं. याला अपवाद शाहीद, मुल्क, काही प्रमाणात राझी आणि काही महिन्यांपूर्वी येऊन गेलेला "हामिद' हे चित्रपट होते. काश्मीर प्रश्नावर एका छोट्या शाळकरी मुलाच्या दृष्टीने बोलू पाहणारा "हामिद' कलाकृती म्हणून, विचार म्हणून अतिशय सुंदर होता पण त्याची कमर्शियल व्हॅल्यू पाहून तो अतिशय कमी चित्रपट गृहांमध्ये आला आणि गेलाही.


काश्मीर खोऱ्यात राहणाऱ्या लहानग्या हामिदच्या वडिलांना दहशतवादी असण्याच्या संशयावरून भारतीय सैन्याने मारून टाकलंय. हामिदला त्याच्या आईने "अब्बू अल्लाह के पास चले गये है' एवढच सांगितलंय. त्या निरागस जीवाला कुठूनतरी कळतं की ७८६ हा अल्लाहचा नंबर आहे तर त्यो त्या आकड्यांची जुळवाजुळव करून फोन लावू लागतो. एक दिवस फोन लागतो तो भारतीय सैन्यातील एका सैनिकाला. हामिद आणि त्याचा अल्लाह म्हणजे तो भारतीय सैनिक एकमेकांशी बोलू लागतात आणि दोघांच्याही आयुष्यात काही आश्वासक बदल घडू लागतात. या कथेसोबत तिथल्या एकूण परिस्थितीवर दिग्दर्शक ऐजाज खान अतिशय सरळ पद्धतीने भाष्य करत आहेत. त्यामुळे काश्मिरातील जनता, सैनिक, दहशतवादी किंवा त्यांना मदत करणारे काश्मिरी यांची झलक पाहण्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा. मोठ्या पडद्यावर तो नेटकेपणाने पोहचू शकला नाही, पण आता नेटफ्लिक्समुळे तो अगदी आपल्यापर्यंत पोहचलाय.


माणूसपण जपणं म्हणजे असुरक्षित जगणं असं होत नाही. उघड्या डोळ्यांनी जगणं आणि असुरक्षित असण्याच्या भयाने दुसऱ्याच्या हाती आपली सूत्र देणं यांत खूप मोठं अंतर आहे. काफिर काय किंवा हामिद काय दोन्हीही कलाकृती सातत्याने एकच गोष्ट अधोरेखित करत आहेत ती म्हणजे "मनातली कुंपणं नष्ट करून समोरच्याला संशयाने पाहण्याऐवजी त्याच्याकडे माणूस म्हणून पहा.' दुष्कृत्याला सजा देणं वेगळं आणि प्रत्येक व्यक्ती आपला शत्रू आहे या विचाराने जगणं वेगळं. प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीकडे आपण संशयी नजरेने पाहू लागलो आणि तो संशय आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला हरवून आपल्या डोक्यावर चढू लागला तर अवघ्या काही वर्षात ही पृथ्वी निर्मनुष्य होईल. मग कुणाचे झेंडे नी कुणाच्या अस्मिता? केवळ कुंपणा कुंपणांवर माणसाच्या माणूसपणाची रक्तबंबाळ लक्तरे उरतील.


लेखकाचा संपर्क : ८३०८६३९३७७

X