आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
भारतीयांना स्मृतिभ्रंशाचा मोठा रोग आहे. दर निवडणुकांच्या काळात आपण मागची पाच वर्षे विसरून जातो. त्या काळात सत्तेने आपला कसा कसा खेळ केलाय, हे आपल्या ध्यानातही राहात नाही. मग नव्या आश्वासनांना बळी पडत, हातचलाखीने केलेल्या प्रोपागंडाला भुलत आपण पुन्हा एकदा ‘चुनाव'च्या महिन्याला सामोरे जातो आणि पुन्हा तेच सरकार स्वतःच्या डोक्यावर बसवून घेतो. म्हणूनच आपली ‘मेमरी रिफ्रेश’ करण्यासाठी ‘ऐसी तैसी डेमोक्रसी ‘ सारखे शोज गरजेचे आहेत. जे आठवण करून देतात राफेल डीलची, मेक इन इंडियाची आणि पंधरा लाखांचीही...
कुठलंही हत्यार जसं दुधारी असतं, तशीच असते कला. कुणी स्वतःचा प्रोपागंडा पुढे रेटण्यासाठी ‘द अॅक्सीडेन्टल प्राईम मिनिस्टर' किंवा ‘पी एम नरेंद्र मोदी' सारखे सिनेमे करतात तर कुणी ‘मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर'सारखे आशयघन सिनेमे बनवून, ‘सिस्टिम'ला काही जाब विचारू पाहतो...
चुनाव का महिना, मच गया शोर
फिर आया है टाइम, टु चुज हू विल स्क्र्यू अस मोर ।
ऐसा गया है डिस्कोर्स नीचे,
गोत्र-जनेयु वर्सेस हेट की स्पिचे ।
कोई बोले पप्पू, कोई चौकीदार चोर ।
फिर आया है टाइम...
ममता, माया, पवार सबका है सपना,
पीएम की कुर्सी पे नाम हो अपना ।
सोनिया-मुलायम का भी तो है सपना
पीएम की कुर्सी पे मुन्ना हो अपना ।
और, अडवाणीजी रोए इन अ कॉर्नर अलोन ।
फिर आया है टाइम...
‘सावन का महिना, पवन करे शोर’ या गाण्याचं आजच्या घडीला एवढं भन्नाट विडंबन कुणी केलं असेल का? ‘इंडियन ओशन बँड’चे गायक-संगीतकार राहुल राम, लेखक, स्टॅन्डअप कॉमेडियन वरूण ग्रोवर आणि संजय राजौरा या तिघांनी मिळून या भन्नाट गाण्याला जन्म दिलाय. ‘द आझादी टूर २०१९'च्या अंतर्गत नुकत्याच झालेल्या ‘ऐसी तैसी डेमोक्रेसी' या राजकीय विडंबनाच्या कार्यक्रमात हे गाणं त्यांनी सादर केलं होतं.
‘इन्कलाब जिंदाबाद' म्हटलं तरी अगदी मरतुकड्या शरीरयष्टीच्या माणसातसुद्धा वीरश्री संचारल्या शिवाय राहात नाही. ‘हर हर महादेव', ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा', ‘मेरी झाँसी नही दुंगी' या अशा काही वाक्यांमध्येसुद्धा करारीपणा ठासून भरलाय. शब्दरचना फार काही वेगळी नाही, तरी हे शब्द ऐकल्यावर आपले बाहू आपोआप स्फुरायला लागतात, हात शिवशिवतात. क्रांती करण्यासाठी ब्रिटिशांची कमतरता जाणवू लागते. कित्येकदा असं वाटू लागतं की, ‘काश... हम अंग्रेजोंके जमाने मे पैदा हुए होते, तो हम भी क्रांतिकारी बन जाते।'
आपल्या घरात आपण काहीही रूढी-परंपरा विरोधी वर्तणूक करण्याचा विचार केला, अगदी बुद्धिप्रामाण्यवादाचा पुरस्कार करत, चालीरीतींना प्रश्न विचारू लागलो, तर "तू स्वतःला कोण समजतो? शाहू-फुले-आंबेडकर-गांधी ही सर्व खूप मोठी माणसं होती, त्यांच्या नखाचीसुद्धा सर आपल्याला येणार नाही’ असं बोलून मोकळे होतात. शिवाजी पुन्हा जन्माला येऊ शकत नाही, असं म्हणत, तो आला तरी, शेजाऱ्याच्या घरात यावा, असा विचार करणारे आपले जन्मदाते आपली विद्रोहाची खुमखुमी जागीच शांत करतात. ‘आपण सर्वसामान्य आहोत, ते लोक असामान्य होते, म्हणून त्यांना शक्य झालं' असं काहीबाही बिंबवलं जातं. फुले किंवा गांधी जन्मजात ‘महात्मा' नव्हते; त्या लोकांनी ‘असामान्य' गोष्टी केल्या म्हणून, ते ‘महान' म्हणवले जातात हे आपल्या लक्षात यायला हवं. नाहीतर आपल्यासारखे कित्येक ‘सर्वसामान्य' म्हणून जन्माला येतात आणि सर्वसामान्य म्हणून मरूनही जातात.
आपण ज्या जागी, ज्या पेशात, ज्या क्षेत्रात आहोत, त्यातच राहून आपापल्या परीने काहीतरी असामान्य कर्तृत्व करूच शकतो. क्रांती करण्यासाठी ब्रिटिशांची गरज नाही, आपली अहितदक्ष व्यवस्था आपल्या विद्रोहाला जागवण्यासाठी नक्कीच पुरेशी आहे. ‘पत्रकारांनी सदासर्वकाळ विरोधी पक्षाच्या भूमिकेत असायला हवं' असं म्हटलं जातं. याच ‘आचार संहितेला' पुढे नेत, पत्रकारांनीच नव्हे, तर प्रत्येक कलाकाराने, जगासमोर या ना त्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्याने, जनमानस तयार करण्याची क्षमता असणाऱ्याने विरोधी पक्षाच्या भूमिकेत असायला हवं. ही ‘आचार संहिता’ आचरणात आणताना ‘विरोधी पक्षाची भूमिका' म्हणजे ‘प्रत्येक' गोष्टीला विरोध नव्हे, तर जनतेच्या अहिताच्या गोष्टींना, निर्णयांना विरोध, हे जाणून घ्यायला हवं. एखाद्या गोष्टीबद्दल, घटनेबद्दल आपली भूमिका जनतेसमोर मांडणे, त्यांचं प्रबोधन करणे किंवा त्यांच्यात वैचारिक बदल करणे, वगैरे सोपं काम नाही. त्यांनी आपलं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आपल्याकडे अशी कोणती गोष्ट आहे, यावर आधी विचार करावा लागतो. उंटावरून शेळ्याही हाकता येत नाही, तर आपण जगाकडे वर उभे राहून कसे पाहून जमेल? त्यासाठी जनमानसात पोहचेल, त्यांना पटेल, रुचेल अशा एखाद्या साधनाला माध्यम बनवावं लागेल. जसं कलाकारांकडे कला आहे, वक्त्यांकडे वक्तृत्व आहे, तसं प्रत्येकाकडे काही ना काही माध्यम असतंच असतं. केवळ हे माध्यम किती सर्वसमावेशक आहे याचा थोडा विचार करून कृती करायला हवी.
आमिर खान, नसिरुद्दीन शहा, स्वरा भास्कर, यांसारख्या काही कलाकारांनी आपली राजकीय-सामाजिक भूमिका वेळोवेळी व्यक्त केलीय हे सर्वश्रुत आहे. याच कलाकारांच्या मांदियाळीत आणखी काही नावं जोडता येतील. वरूण ग्रोवर, संजय राजौरा, कुणाल कामरा, राहुल सुब्रमण्यम, सौरभ पंत, केनी सबॅस्टियन, तन्मय भट आणि विपुल गोयल ही काही स्टँडअप कॉमेडियन मंडळी. यांनी आपल्या शोमधून बऱ्याचदा आपली व्यवस्थाविरोधी भूमिका मांडली आहे. सामान्यपणे लोकांना फारसे वास्तववादी,धीर-गंभीर पहायला-ऐकायला आवडत नाही हे त्यांनी ओळखलं आणि विनोदाचा वापर करत स्वतःला व्यक्त करत राहिले. शाब्दिक कोट्या, कमरेखालचे संवाद अशा सर्वाचा भडिमार करून हशा मिळवणे म्हणजे विनोद! असं काहीसं तथाकथित चित्र असणाऱ्या जगात व्यवस्थेच्या विरोधात समाजातील अहितकारक रूढी-परंपरा कृतींच्या विरोधात उपहासात्मक वक्तव्य करून आपापल्या परीने प्रबोधन करण्याचा विडा उचलला आहे.
गँग ऑफ वासेपुर, मसान, सेक्रेड गेम्स या काही कलाकृतीचा लेखक वरूण ग्रोवर, कथा-पटकथा-संवादलेखक तर आहेच, तो एक उत्तम स्टँडअप कॉमेडियनसुद्धा आहे. इतर स्टॅण्डअप कॉमेडियन वर्णावर, वर्गावर, इतरांच्या दिसण्यावर आणि वागण्यावर विनोद करण्यात मशगुल असताना; हा माणूस राफेल डील, मोदींचे कॅनडातील ‘टु एबी’वरील विधान, ‘पद्मावत’ सिनेमाच्या वेळी करणी सेनेने मांडलेल्या उच्छादावर आणि यांसारख्या अनेक राजकीय-सामाजिक घडामोडींवर धारदारपणे व्यक्त झालाय. तसेच सत्याग्रह, गुलाल, ब्लॅक फ्रायडे, पिपली लाइव्ह, मसान यांसारख्या काही नामांकित सिनेमांना गाणी देणारे ‘इंडियन ओशन’सारख्या नामांकित बँडला जोडले गेलेले राहुल राम, त्यांच्या सिनेमा निवडण्याच्या पद्धती वरूनच एक वेगळ्या प्रकारचे राजकीय-सामाजिक स्टेटमेंट देऊ पाहतात. ‘महंगाई डायन खाए जात है', ‘आरंभ है प्रचंड’, ‘मन कस्तुरी रे' अशी काही लोकप्रिय गाणी देणारे राहुल राम स्वतःच्या संगीत कौशल्यासोबत लेखक, स्टॅन्ड अप कॉमेडियन वरूण ग्रोवर आणि संजय राजौरा या द्वईंशी जोडले जातात, तेव्हा निर्मिती होते, ‘ऐसी तैसी डेमोक्रेसी' सारख्या वेगळ्या धाटणीच्या शो ची.
देशातील वेगवेगळ्या शहरात होणाऱ्या या त्रयींच्या ‘ऐसी तैसी डेमोक्रेसी'ला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पण; अशा शोजने व्यवस्थेमध्ये असा काय फरक पडणार? काय प्रबोधन होणार? भारतीय राजकारणात अशा मूठभर लोकांमुळे असा काय विशेष बदल होईल? असा सूर आळवणारे लोक देव-धर्म रक्षण करताना रामायणातील ‘खारीच्या वाट्याची' गोष्ट विसरून गेले, कदाचित. ‘बुंद बुंद से सागर भरता है।' असं म्हटलं जातं, म्हणजे अनेक बुंद एकत्र आले की सागर भरणं मुश्किल नाही. गरज आहे आपण स्वतः एक बुंद होण्याची. उघड्या डोळ्यांनी पाहिलं की, आपल्यातील क्रांतिकारकाला आजच्या घडीचे देशी ब्रिटिश आपोआप दिसतील. मग ‘क्रांतिवीर’मधली ‘कलमवाली बाईच' कशाला, आपण सुद्धा ‘क्रांती' आणण्याची इच्छा व्यक्त करू शकू.
(लेखक पुणेस्थित नव्या पिढीतले पटकथाकार - दिग्दर्शक आहेत.)
महेशकुमार मुंजाळे
maheshmunjale@gmail.com
संपर्क : ८३०८६३९३७७
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.