आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गंद्या नालीच्या किड्याची आत्मकथा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महेशकुमार मुंजाळे  

डोळ्याला सुखावणाऱ्या फुलपाखराचे, मऊशार रेशीम देणाऱ्या रेशमाच्या किड्यांचे अळीमधले रुपडे आपल्याला किळसवाणे वाटत नाही कारण ते आपल्या सोयीचे आहेत. आपल्याला किळस वाटते त्या नालीतल्या किड्यांची, त्यातल्या अळ्यांची. आपल्या बेडरूमला लकाकी देणारी वीज किती आयुष्यांना पाण्यात बुडवून उभ्या राहिलेल्या धरणातून येतेय याची आपल्याला फिकीर नाही. आपल्या वातानुकूलित सुसाट प्रवासाची सोय करणाऱ्या मेट्रोचं कारशेड जंगलात राहणाऱ्या किती आदिवासींच्या उपजीविकेला उघडं पाडणार आहे, याचं आपल्याला घेणं-देणं नाही. 
 
शहरातल्या सुंदर बागेत एखाद्या फुलाच्या झाडावर, फांदीच्या खाली, कोपऱ्यात छोटासा जीव जन्माला येतो. तो दिवसेंदिवस वाढतो आणि हळूच पंख फुटून त्याचं रंगीबेरंगी नक्षीदार फुलपाखरू बनतं. त्या फुलपाखराच्या हवेतल्या गिरक्यांकडे, नक्षीदार पंखांची हलकेच उघडझाप करत फुलातला मध चुटुचुटू शोषण्याच्या लकबीकडे पाहणं आपल्याला सुखावून जातं. त्याच वेळी त्या बागेला ठोकलेल्या उंचच-उंच पत्र्याच्या कंपाउंडपलीकडे आपल्या घराघरांतून आलेलं मलमूत्र वाहून नेणाऱ्या नालीत आपण खाऊन टाकलेल्या चटकदार कुरकुऱ्यांच्या पाकिटाने, शुद्ध स्वच्छ मिनरल वॉटरच्या रिकाम्या बाटल्यांमुळे पाणी तुंबतं. त्या तुंबलेल्या पाण्यात होतात बारीक बारीक अळ्या, किडे... या अळ्या स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढत एकमेकांच्या बरबटलेल्या लुसलुशीत मांसल अवयवांवर चढत पुढे पुढे जाऊ लागतात.  मिळेल ती "पौष्टिक घाण' खाऊ लागतात. खाता खाता जगण्याचं (रड)गाणंसुद्धा गाऊ लागतात.

डोळ्याला सुखावणाऱ्या फुलपाखराचे, मऊशार रेशीम देणाऱ्या रेशमाच्या किड्यांचे अळीमधले रुपडे आपल्याला किळसवाणे वाटत नाही कारण ते आपल्या सोयीचे आहेत. आपल्याला किळस वाटते त्या नालीतल्या किड्यांची, त्यातल्या अळ्यांची. म्हणूनच तर आपलं बॉलीवूड चित्रपटातील गरीब कॅरेक्टरला "गंदी नाली के कीडे' असं म्हणत हिणवत आलंय. या गंद्या नालीच्या किड्यांचं अस्तित्वच आपल्याला मान्य नाही. आपल्या बेडरूमला लकाकी देणारी वीज किती आयुष्यांना पाण्यात बुडवून उभ्या राहिलेल्या धरणातून येतेय याची आपल्याला फिकीर नाही. आपल्या वातानुकूलित सुसाट प्रवासाची सोय करणाऱ्या मेट्रोचं कारशेड जंगलात राहणाऱ्या किती आदिवासींच्या उपजीविकेला उघडं पाडणार आहे, याचं आपल्याला घेणं-देणं नाही. आपण अालिशान बंगल्यात राहतोय, ज्याचा केर आपण झाडूने एका कोपऱ्यात ढकलून झाकून ठेवलाय. फक्त त्या केरात किती जीव गुदमरत आहेत याकडे आपलं लक्ष जाण्याचा संबंधच नाहीये.

हे सतत दुर्लक्ष करणं आपल्याला जमू शकतं, पण काही वेडे लोक असतात जे सातत्याने त्या अस्तित्वहीनांची दखल घेतात आणि जगासमोर सत्य मांडू पाहतात. सिरियातून लिबियात अवैधरीत्या स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील कुणी झेन नावाचा बारा वर्षाचा मुलगा त्याच्या अक्षरशः नालीतल्या किड्याचं जिणं बदलून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करू लागतो तेव्हा त्याची चिकाटी, त्यावर होत असलेले चहूबाजूचे आघात, त्या कोवळ्या जीवाची होत असणारी परवड चंदेरी पडद्यावर साकारली जाते आणि कान्ससारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तब्बल पंधरा मिनिटं प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट अनुभवायला मिळतो. लेबनीज दिग्दर्शिका नदीन लॅबाकी यांनी दिग्दर्शित केलेला "कॅपरनॉम' नावाचा चित्रपट २०१८ मध्ये जगभरात प्रदर्शित झाला. नुकताच काही दिवसांपूर्वी तो नेटफ्लिक्सवर आल्याने आता आपल्यासारख्या भारतीयालासुद्धा तो पाहणं शक्य आहे.

बारा वर्षांच्या झेनची ही गोष्ट आहे. या गोष्टीत त्याच्या नजरेतून आपल्याला कित्येक अशा गोष्टी पाहायला मिळतात की, ज्यातून त्याचं ते वास्तव थेट आपल्या अंगावर येऊ पाहतं. अवैध स्थलांतर केल्याने संपूर्ण कुटुंबालाच त्या देशात अस्तित्व नाही. त्यांच्या नावाचे कुठलेच दस्तऐवज नाहीत, त्यामुळे त्यांना अगदी दवाखान्यात जाऊन स्वतःवर उपचार करून घेणंसुद्धा अशक्य आहे. गरिबी आणि अशिक्षितपणामधून भरमसाट अपत्यांची पैदास होते हे समजायला लिबियामध्ये जायची आवश्यकता नाही... आपल्या इथे बीडमध्ये तब्बल २१ पोरांना जन्म दिलेल्या बाईची बातमी वाचली तरी समजून येईल. आधीचेच अठराविश्वे दारिद्र्य, त्यात ही बेलगाम पैदास याने जगण्याचा स्तर कसा सुधारेल हे साधं गणित या लोकांना समजत नाही. पण या चिमुकल्या झेनला कळतंय, म्हणूनच त्याचे त्याच्या आईबापावर आणि इतर वाढत जाणाऱ्या भावंडांवर अजिबात प्रेम नाही. झेनचे केवळ त्याच्या बहिणीवर, सेहेरवर निस्सीम प्रेम आहे. ती वयात येण्याचा उशीर, की आईबाप तिचं लग्न थोराड माणसाशी करून देणार आहेत याची झेनला जाणीव आहे. ज्या दिवशी सेहेरला पहिली पाळी आली हे बिछान्यावर रक्त पाहून झेनला समजते तेव्हा, ते आईला समजू नये म्हणून तो स्वतः दुकानातून पॅड्सचे पाकीट चोरून आणतो, तोवर स्वतःच्या अंगातील बनियन तिच्या अंतर्वस्त्रात ठेवायला सांगतो, जेणेकरून आईला रक्तस्राव दिसणार नाही. ही अशी त्याची प्रचंड समजदारी पाहून आपण अगदी चक्रावून जातो.

लाचारीच्या, स्तरहीन जगण्याला कंटाळलेला, आईबापाने आपल्याला जन्म देऊन गुन्हा केलाय असे म्हणून त्यांच्यावर खटला भरलेला झेन जेव्हा घर सोडून पळून जातो तेव्हा तिथे त्याची भेट होते एका इथिओपियन तरुणीशी, राहिलशी. हिचेही साधारण तेच रडगाणे आहे. इथिओपियामधून लिबियात कामाच्या शोधात अवैधरीत्या स्थलांतरित झाली आहे. ती बनावट कागदपत्रांच्या आधारे लिबियात नोकरी करतेय, पण तिच्या छोट्या बाळाला कागदोपत्री अस्तित्व नसल्याने ते बाळ जगासमोर न आणता तिचं आयुष्य ती रेटत आहे. झेन, राहिल आणि तिच्या बाळासोबत घडलेल्या प्रसंगांत एक चटका लावणारा प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा राहिलला "डिटेन्शन कॅम्प' मध्ये डांबलं जातं तेव्हा बाळापासून आपली कायमची ताटातूट होऊ नये म्हणून ती आपण अविवाहित आणि अपत्यहीन आहोत, अशीच नोंद करते. अशा वेळी त्या तुरुंगात जगताना घरी एकट्या पडलेल्या लेकराच्या आठवणीने, काळजीने, ममतेने तिचे स्तन भरून येतात. अशा वेळी डोळ्यातली आसवं गाळत सर्वांपासून स्वतःला लपवत ती स्तन पिळून त्यातलं दूध वाहून टाकते. या अशा काळीज चिरणाऱ्या प्रसंगांची शृंखला बांधत बनवलेला हा "कॅपरनॉम' पाहताना आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या कैक पटीने सुलभ आयुष्याची किंमत कळू लागते.

चित्रपटाची भाषा आपल्याला समजणार नाही, त्याचे सबटायटल्स इंग्रजीत आहेत, पण त्यांचीही गरज पडणार नाही कारण वेदनेला भाषेची गरज नाही, सहानुभूती निर्माण व्हायला देहबोली पुरेशी असते. हा चित्रपट पाहताना आपल्याला क्षणभरसुद्धा वाटणार नाही की हा "चित्रपट' आहे. यात एकूण एक प्रसंग सत्य घडत आहे आणि तो छुप्या कॅमेऱ्याने चित्रित केलाय एवढं ते वास्तववादी आहे. वास्तवाचा इतका अट्टहास यात आहे की झेन हे नावसुद्धा त्या बालकलाकाराचेच खरे नाव आहे. आणि तो खरोखर स्थलांतरित कुटुंबातील आहे. हा चित्रपट जेव्हा जगासमोर आला, झेनला प्रसिद्धी मिळाली तेव्हा झेनच्या कुटुंबाला नॉर्वेचं नागरिकत्व मिळालं. तो अनेक मुलाखतींमध्ये सांगतो की, या नॉर्वेतल्या घरात आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा पलंगावर झोपता आलं. कारण लिबियामध्ये पलंग बसेल एवढं मोठं घरच नव्हतं. वर उल्लेख केलेल्या विविध प्रसंगांना वाचून कदाचित आपल्याला असा भ्रम होऊ शकतो की सगळी गोष्टच इथे कळली, आता चित्रपट का पहावा? हे असं आहे की "सैराट' प्रदर्शित झाल्यानंतर दोन दिवसांतच आपल्यापर्यंत त्याच्या रक्ताळलेल्या शेवटाची गोष्ट पोहोचलीसुद्धा होती. तरीही आपण त्या शेवटापर्यंतचा प्रवास पाहायला गेलो आणि सैराट अक्षरशः जगूनही आलो. हे असंच आहे, उल्लेख केलेले प्रसंग संपूर्ण चित्रपटातील अगदी थेंबभर प्रसंग आहेत, सगळा समुद्र पाहायला आपल्याला आपले डोळे आणि काळीज विस्फारून बसावं लागेल एवढं ते भव्य आहे. नालीतले किडे आपल्याच चंगळवादी, भोगवादी जगण्याचे बायप्रॉडक्ट आहेत. त्यांना तिथून बाहेर काढून घरात स्थान देण्याची आपली हिंमत आणि मनाचा मोठेपणा आपल्यात आणणं तर अशक्य आहे. पण किमान संवेदनशील मनाने त्या जगण्याकडे पाहिलं तरी आपल्या परीने 'आपण काय न केल्यास' ही अशी स्तरहीन जिंदगानी कुणाला बहाल होणार नाही याची जाणीव आपल्यात निर्माण होऊ शकते.

लेखकाचा संपर्क : ८३०८६३९३७७

बातम्या आणखी आहेत...