आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माैन साेडू चला बाेलू, अंधारावर चालून जाणार रातरागिणी; 'दिव्य मराठी'चा आज 'नाइट वाॅक'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरातील याच शिवतीर्थ चाैकापासून रातरागिणींचा 'नाइट वाॅक' सुरू हाेणार आहे. - Divya Marathi
शहरातील याच शिवतीर्थ चाैकापासून रातरागिणींचा 'नाइट वाॅक' सुरू हाेणार आहे.
  • रात्री 9.30 वाजता राहा तयार : पाच महिला मशाल पेटवून करणार उद‌्घाटन; आकाशात रंगीबेरंगी फुगे साेडून हाेईल समाराेप
  • जळगावात शिवतीर्थ ते काव्यरत्नावली चाैकापर्यंत 'नाइट वाॅक'; श्री गणेश वंदनेसह समूहगायन, आदिवासी महिलांचे ढाेलवादन, पथनाट्य, दंड प्रात्यक्षिके हाेणार सादर

​​​​​​जळगाव : 'दिव्य मराठी'च्या ' माैन साेडू चला बाेलू' या अभियानांतर्गत आज (दि.२२) रात्री १० ते १ वाजेदरम्यान शिवतीर्थ ते काव्यरत्नावली चाैक दरम्यान रातरागिणींचा 'नाइट वाॅक' आयाेजित करण्यात आला आहे. त्यात अत्याचाराचे प्रतीक असलेला अंधार भेदण्यासाठी हजाराेंच्या संख्येने महिला सहभागी हाेतील.

'नाइट वाॅक' दरम्यान श्री गणेशवंदना नृत्य, आदिवासी महिलांचे पारंपरिक ढाेलवादन, समूहगान, भारुड, मशाल रॅली, पथनाट्य, दंड प्रात्यक्षिके, कसरती आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचा आनंद घेत महिला आपला स्वाभिमान जागृत करून एकमेकींचा आत्मविश्वास वाढवत मी 'सबला' असल्याचा संदेश समाजाला देणार आहेत. सामाजिक प्रश्नांवर कायमस्वरूपी उत्तर शाेधण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या दैनिक भास्कर समूहाच्या 'दिव्य मराठी'तर्फे आयाेजित करण्यात आलेल्या या 'नाइट वाॅक' आयाेजनाच्या पूर्वतयारीसाठी शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांतील महिला सज्ज झाल्या आहेत.

शिवतीर्थाजवळ जमणार 'स्त्री शक्ती'

'नाइट वाॅक'ला रात्री १० वाजेच्या सुमारास शिवतीर्थ (काेर्ट चाैक) येथून मशाल पेटवून सुरुवात हाेणार आहे. तत्पूर्वी ९.३० वाजता शहरातील ग्लॅडिएटर ग्रुपचे सदस्य श्री गणेश वंदनेने कार्यक्रमास सुरुवात करतील. या ठिकाणी उभारण्यात अालेल्या व्यासपीठावर राष्ट्रसेविका समितीच्या सदस्यांचे समूहगीत व मशाल गीतगायन हाेईल. 'स्वरदा ग्रुप'च्या सदस्या लाेककलेचा बाज असलेले भारुड सादर करतील. उपक्रमात जल्लाेष भरण्यासाठी लाेकसंघर्ष माेर्चाच्या आदिवासी भगिनींच्या पारंपरिक ढाेल व नृत्य पथकाची साथ लाभणार आहे. 'माैन साेडू चला बाेलू' अभियानाचा पुढचा टप्पा असलेल्या 'नाइट वाॅक'च्या आयाेजनाची भूमिका दैनिक 'दिव्य मराठी'चे निवासी संपादक त्र्यंबक कापडे हे मांडतील. त्यानंतर वाॅकमध्ये सहभागी हाेणाऱ्या महिलांचे प्रातिनिधिक मनाेगत हाेईल आणि या नाइट वाॅकला नियाेजित मार्गाने सुरुवात हाेईल.

या रातरागिणी पेटवणार मशाल

1. 'नाइट वाॅक'ची सुरुवात मशाल प्रज्वलनाने हाेईल. वेगवेगळ्या पाच क्षेत्रात कर्तव्य बजावणाऱ्या महिलांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करण्यात येईल. त्यात प्रांताधिकारी दीपमाला चाैरे, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या प्रमुख परिचारिका सुरेखा लष्करे, पाेलिस दल निर्भया पथकाच्या प्रमुख मंजुळा तिवारी, पेट्राेल पंपावरील कर्मचारी आशा भगवान निंबाळकर, हाॅटेलमध्ये स्वयंपाक करणाऱ्या कमलबाई भावसार यांचा समावेश आहे.

तीन ग्रुप सादर करणार पथनाट्य

2. स्टेडियम चाैकात स्वराज्य ग्रुपचे सदस्य पथनाट्य सादर करतील. पाेलिस अधीक्षक कार्यालय व नवीन बसस्थानक दरम्यानच्या चाैकात दिशा बहुउद्देशिय संस्थेचे सदस्य पथनाट्य सादर करतील. तिसरे पथनाट्य जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर अल फैज उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थिनी सादर करतील.राष्ट्रसेविका समितीच्या २५ सदस्या स्वातंत्र्य चाैक व आकाशवाणी चाैकात दंड प्रात्यक्षिक व कसरती करणार आहेत.

काव्यरत्नावली चाैकात जल्लाेष

3. अंधारावर मात करत रातरागिणी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील काव्यरत्नावली चाैकात पाेहाेचतील. या ठिकाणी ड्रॅगन्स डान्स फिटनेस ग्रुपचे सदस्य ' फ्लॅश माॅब' करतील. अंधार भेदण्याच्या या उपक्रमाबद्दल प्रातिनिधिक स्वरूपात मनाेगत व्यक्त करण्यात येईल. आकाशात फुगे साेडून या उपक्रमाची सांगता हाेईल. यानंतर सहभागी झालेल्या महिलांना पुन्हा शिवतीर्थ मैदानावर आणण्यासाठी माेफत बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

रातरागिणींवर हाेणार पुष्पवृष्टी

4. अंधारावर मात करणाऱ्या रातरागिणींच्या नाइट वाॅकवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात येणार आहे. यात डाॅ. गाेविंद मंत्री यांच्यातर्फे डाॅ. जी. डी. बेंडाळे महाविद्यालयासमाेरील चाैकात तर फिनिक्स यूथ फाउंडेशनतर्फे स्वातंत्र्य चाैकात पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. दरम्यान, या मार्गावर जिल्हा पाेलिस दलासह जिल्हापेठ पाेलिस ठाणे व रामानंद पाेलिस ठाण्याच्या पाेलिसांचा बंदाेबस्त तैनात असेल.

येथे करता येईल पार्किंग

रातरागिणींना शिवतीर्थ मैदान, काेर्ट चाैक ते चित्रा चाैकादरम्यानच्या रस्त्यालगत मैदानाच्या भिंतीला लागून पार्किंग करता येईल. पुढे जिल्हा क्रीडा संकुलाच्या पार्किंगमध्ये वाहने पार्क करता येतील. जिल्हा पाेलिस अधीक्षक कार्यालयालगतच्या शहर वाहतूक शाखेसमाेरील माेकळ्या जागेवर दुचाकी वाहने लावू शकता. स्वातंत्र्य चाैकात नाइट वाॅकमध्ये सहभागी हाेऊ इच्छिणाऱ्या भगिनी स्वातंत्र्य चाैकातून नेरीनाक्याकडे जाणाऱ्या मार्गावर महात्मा गांधी उद्यानाच्या भिंतीजवळ वाहन लावू शकतील. पुढे अाकाशवाणी कार्यालयाकडून सिंधी काॅलनीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहने लावता येतील.

सहकार्यासाठी यांनी घेतला पुढाकार

'दिव्य मराठी'च्या या उपक्रमासाठी शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था व व्यक्तींचे सहकार्य लाभत आहे. यात डाॅ. गाेविंद मंत्री यांच्यातर्फे नाइट वाॅकवर पुष्पृष्टी करण्यात येईल. त्यांच्याचतर्फे पाणी व प्रकाश व्यवस्था करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य चाैकात मनाेज माेहिते यांच्यातर्फे प्रकाश याेजना व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला मच्छिंद्र पाटील यांच्यातर्फे निवासस्थानासमाेर चहा-पानाची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राष्ट्रवादी कांॅग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांच्याकडून आकाशवाणी चाैकात चहा-पानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. युवा शक्ती फाउंडेशनतर्फे काव्यरत्नावली चाैकात प्रकाश याेजना आणि पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. चाैकाचाैकात नाइट वाॅकच्या मार्गदर्शनासाठी स्वयंसेवक तैनात असतील.

अशी आहे व्यवस्था

वैद्यकीय पथक : 'नाइट वाॅक'मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकासह रुग्णवाहिका रात्री ९ ते १ वाजेपर्यंत तैनात असणार आहे. तसेच आर्या फाउंडेशन व जी. एम. फाउंडेशनतर्फे डाॅक्टरांसह रुग्णवाहिका असतील.

माेबाइल टाॅयलेट : नाइट वाॅकच्या मार्गावर महिलांसाठी दाेन माेबाइल टाॅयलेट व्हॅनची व्यवस्था महापालिकेतर्फे करण्यात आली आहे. मार्गावर एकाच ठिकाणी गर्दी हाेऊ नये म्हणून दक्षता घेण्यात आली आहे.

परतीसाठी बसेस : रातरागिणी परत शिवतीर्थावर येतील. त्यासाठी विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे ४, शेलाेनी एज्युकेशन संस्थेचे चेअरमन आर. जी. पाटील यांच्यातर्फे २ स्कूल बसेस तर अरुण चांगरे यांच्यातर्फे १ लक्झरीची व्यवस्था करण्यात आली आहे.

येथे करा संपर्क : दैनिक दिव्य मराठीने रविवारी आयाेजित केलेल्या 'नाइट वाॅक' उपक्रमात सहभागी हाेण्यासाठी महिलांनी ९३४००६१७१६ व ९३४००६१७०८ या माेबाइल क्रमांकावर संपर्क साधावा.