आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण कोर्टात टिकू दे, महसूलमंत्र्यांचे विठ्ठलास साकडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - बा विठ्ठला… राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाला बळ दे आणि मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात टिकू दे, असे साकडे श्री विठ्ठलाच्या चरणी घातल्याची माहिती महसूल, कृषी, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. महसूलमंत्री पाटील यांच्या हस्ते सोमवारी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने सोमवारी पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर सभामंडपात झालेल्या कार्यक्रमात पाटील यांच्या हस्ते मानाचे वारकरी बाळासाहेब हरिभाऊ मेंगाणे आणि आनंदी मेंगाणे (रा. मळगे बुद्रुक, ता. कागल, जि. कोल्हापूर) यांचा सत्कार करण्यात आला.   

 

या वेळी महसूलमंत्री पाटील म्हणाले, ‘विठ्ठल मंदिराच्या समितीची रचना करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप विचार केला आहे. त्यामुळे मंदिर समितीचे कामकाज सुरळीत सुरू आहे. या ठिकाणी आता भक्त निवासाची सुरुवात करा. वारीच्या निमित्ताने वारकरी येतात. त्यांच्या निवासाची व्यवस्था होईल. राज्यात यंदा खूपच तीव्र दुष्काळ पडला आहे. या दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. पण फेब्रुवारीनंतर पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.

 

आता एक पाऊस झाला तर या समस्येवर उपाय निघू शकेल, असेही ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीची आवश्यक कायदेशीर कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल. हे आरक्षण न्यायालयात टिकेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सर्व मागण्यांवर शासन सकारात्मक विचार करेल. वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी शासन निधी देईल, असेही त्यांनी सांगितले.   डॉ. अतुल भोसले यांनी प्रास्ताविकात मंदिर समितीने गेल्या दोन वर्षांत केलेल्या विविध कामांची माहिती दिली.

 

मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधाला शासनाने मंजुरी द्यावी. याबाबतचा कोणताही आर्थिक बोजा शासनावर पडणार नाही, असे त्यांनी सांगितले. या वेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांचा महसूलमंत्री पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.  पंढरपुरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सोलापुरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अंजली पाटील, दीपाली भोसले, माजी मंत्री बबनराव पाचपुते, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, शकुंतला नडगिरे, रामचंद्र कदम, शिवाजीराव महाराज मोरे, संभाजी शिंदे, अतुलशास्त्री भगरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले या वेळी   उपस्थित होते.   


खारीक उधळण्याच्या परंपरेने वेधले लक्ष
कार्तिकी एकादशीनिमित्त परंपरेप्रमाणे श्री विठ्ठलाची शहरातील नगरप्रदक्षिणा रस्त्यावरून मोठ्या उत्साहात रथयात्रा काढण्यात आली. माहेश्वरी (पूर्वीची खासगीवाले) धर्मशाळेपासून सोमवारी दुपारी या रथयात्रेस सुरुवात झाली. त्या अगोदर माहेश्वरी धर्मशाळेमध्ये श्रीविठ्ठल, राही आणि रखुमाईंच्या मूर्तीवर सकाळी अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली. नातू, रानडे आणि देवधर या रथावरील मानकऱ्यांनी विठ्ठल, राहि आणि रखुमाईंच्या मूर्ती रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी सजवलेल्या लाकडी रथावर नेऊन ठेवल्या. त्या नंतर या रथयात्रेस सुरुवात करण्यात आली.  


 रथयात्रेवर खारीक, बत्तासे आणि सुट्टे पैसे उधळण्याची परंपरा आहे. त्यामुळे बत्तासे आणि खारकांची विक्री करणारे बरेच विक्रेते या नगरप्रदक्षिणा रस्त्यावर रथ येण्याअगोदर विक्री करण्यासाठी फिरताना दिसत होते. रथजवळ आल्यानंतर दर्शन घेऊन भाविकांनी त्यावर खारकांचा वर्षाव केला. अनेक भाविक, स्थानिक नागरिक नगरप्रदक्षिणा रस्त्यावरील असलेल्या मठ, धर्मशाळा तसेच घरांच्या गच्चीवरुन रथयात्रेचा हा सोहळा याचि देहि याचि डोळा पाहून श्री विठ्ठलाच्या दर्शनाने मनोमनी त्रुप्त होताना दिसत होते.

 

दादांचा बाबांना मोलाचा सल्ला     

विठ्ठलाच्या शासकीय महापूजेनंतर सत्कार समारंभात बोलताना महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंदिर समितीचे अध्यक्ष डाॅ.अतुल भोसले ऊर्फ अतुलबाबांना एक मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, बाबा, तुमचे राजकीय, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात काम चांगले आहे. पण असले तरी विठ्ठलाचे सेवक म्हणून मंदिर समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत असताना वारकऱ्यांचा व महाराज मंडळींचा दृष्टिकोन बदलण्यासाठी  तुम्हाला आता आध्यात्मिक व्हावे लागेल.  

 

मानाचे मेंगाणे वारकरी    
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मळगे बुद्रुक येथील मेंगाणे गेली पंचवीस वर्षे पंढरीची वारी करतात. शेती करणाऱ्या मेंगाणे यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांना विठ्ठल-रुक्मिणीची चांदीची मूर्ती आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून वर्षभरासाठीचा मोफत एसटी प्रवासाचा पासही या वेळी देण्यात आला. 

बातम्या आणखी आहेत...