आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजलगाव - पत्नी आणि मुलाचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील मोगरा ग्रामपंचायतीअंतर्गत रामनगर तांड्यावर बुधवारी घडली होती. विमा पॉलिसीच्या पैशाच्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, बंडू जाधव याने दाेन दिवसांपूर्वीच मुलाला विजेचा शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, असेही समोर आले आहे. गुरुवारी मृत गंगा जाधव व करण जाधव यांच्यावर पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाच जणांविरोधात या प्रकरणी दिंद्रूड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
माजलगाव तालुक्यातील मोगरा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या रामनगर तांड्यावर बंडू उत्तम जाधव यांचे कुटुंब आहे. जदीद जवळा ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या देविसिंग तांड्यावरील गोपीचंद राठोड यांची मुलगी गंगा हिच्याशी त्यांचा विवाह १२ वर्षांपूर्वी झाला होता. दरम्यान, गोपीचंद यांनी गंगा यांच्या विवाहापूर्वी तिच्या नावे शेअर मार्केटची ८० हजारांची एक जीवन विमा पॉलिसी सुरू केली होती. ८ वर्षे या पॉलिसीचे सर्व हप्तेही गोपीचंद यांनीच भरले होते. वर्षभरापूर्वी या पॉलिसीची मुदत संपल्याने त्यांनी या पॉलिसीचे मिळालेले पैसे गंगा यांच्या नावे माजलगावातील राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून त्यात टाकले होते. त्यानंतर वर्षभरापासून दुसरी एक विमा पॉलिसी त्यांनी गंगा यांच्या नावे सुरू केली होती. त्याचेही हप्ते गोपीचंद भरत होते.
दरम्यान, उचललेल्या पॉलिसीचे पैसे आम्हाला का देत नाही म्हणून गंगा यांचा वर्षभरापासून पती व सासरच्या इतर मंडळींकडून छळ केला जात होता. यातूनच त्यांच्यात सातत्याने वाद होत होते. दरम्यान, बंडू जाधव याने ११ नोव्हेंंबर रोजीच याच कारणावरून पत्नी गंगाला रात्रभर मारहाण केली होती. तर मुलगा करण यालाही वायरने विजेचे झटके देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. १२ नोव्हेंबर रोजी सकाळीच ही बाब गंगाने फोन करून आपल्या माहेरच्या नातेवाइकांना सांगितली होती. यानंतर आई, वडील व इतर मंडळींनी रामनगरमध्ये येऊन हा वाद मिटवला होता. मात्र, बुधवारी बंडू याने शेतात कापूस वेचण्यासाठी गेल्यावर पत्नी गंगाचा गळा आवळून तर मुलगा करणचा पोटात चाकूने वार करून खून केला आणि स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला.
पाच जणांविरोधात गुन्हा
दरम्यान,या प्रकरणी गोपीचंद राठोड यांनी दिंद्रूड ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन बंडू उत्तम जाधव, उत्तम लालू जाधव, योगीनाथ लालू जाधव, कोंडाबाई उत्तम जाधव, कौसाबाई योगीनाथ जाधव या पाच जणांविरोधात दिंद्रूड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
माय, लेकावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार
शवविच्छेदन, गुन्हा नोंद या प्रक्रिया होऊन गुरुवारी गंगा व करण यांच्यावर एकाच चितेवर रामनगर तांड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या वेळी दोन गटांत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.