राजकीय / मी राजीनाम्याची कल्पना कालच दिली, 24 तासानंतरही नेत्यांचा प्रतिसाद नाही म्हणजे राजीनाम्याला मूकसंमती

माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांची खंत, राजीनाम्यावर आतापर्यंत ठाम असल्याची माहिती
 

विशेष प्रतिनिधी

Dec 31,2019 01:34:00 PM IST

अनंत वैद्य

बीड - आपण आताच्या राजकारणासाठी योग्य नसल्याचे चित्र आहे. काल सकाळी आपण पक्षाचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आपल्या राजीनाम्याची कल्पना दिलेली आहे. आता २४ तास उलटले तरी नेत्यांचा प्रतिसाद नसल्याने त्यांची माझ्या राजीनाम्याला एकप्रकारे मूकसंमतीच आहे, असे मी मानतो. राजकारणाचा आता वीट आला असून आपण राजीनामा देऊन पुढील आयुष्य शांतपणे जगणार आहोत, अशी भावना माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंनी व्यक्त केली.


उध्दव ठाकरे यांच्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार सोमवारी (ता.३० डिसेंबर) पार पडला. या विस्तारामध्ये प्रकाश सोळंके यांना ज्येष्ठतेनुसार मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना होती. यापूर्वी सोळंके यांनी राज्यमंत्रीपद भूषवलेले आहे. मात्र, पक्षाने मंत्रीपदासाठी त्यांना डावलले. या नाराजीतून प्रकाश सोळंके यांनी आताच्या काळातील राजकारणासाठी आपण योग्य नसल्याचे सांगत आपण राजीनामा देणार असल्याची भूमिका मांडली आहे. ‘दिव्य मराठी’शी बोलताना प्रकाश सोळंके म्हणाले, माझा कोणावरही रोष नाही. शिवाय मी नाराजही नाही. मात्र, आताच्या काळात होणाऱ्या राजकारणामुळे मी व्यथित झालाे आहे. शिवाय यापुढे राजकारणात काम करण्याची आपली मानसिकता नाही. आपण गावी शेती व इतर कामांत मन रमवणार आहोत.


सोमवारी मंत्रीमंडळ विस्तारापूर्वी आपले पक्षश्रेष्ठींशी बोलणे झाले होते. त्यांना मी राजीनाम्याची कल्पना दिली होती. परंतु, आता २४ तास उलटले तरीही नेत्यांची माझ्याबाबत काहीही प्रतिक्रिया नाही. याचा अर्थ त्यांची मूकसंमती आहे, असे मी मानतो. मी माझ्या राजीनाम्यावर आतापर्यंत तरी ठाम आहे, असाही पुनरुच्चार सोळंकेंनी केला. दरम्यान, सोळंके हे माजलगाव मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांसह मुंबईत असून ते विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन राजीनामा सुपूर्द करणार आहेत. यादरम्यान, जर वरिष्ठ नेत्यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला तरच ते निर्णय बदलू शकतील, अशी शक्यता सोळंके यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तर प्रकाश सोळंकेंनी मात्र आता वेळ निघून गेल्याचे सांगत आपला निर्णय पक्का असल्याचे सांगितले.


पक्ष कार्यालयात पोहोचले

प्रकाश सोळंके आता मुंबईतील पक्ष कार्यालयात पोहोचले आहेत. या ठिकाणी ते नेत्यांशी चर्चा करत असल्याची माहिती आहे.

X