आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात प्रथमच चंद्रपूर जिल्ह्यात 'माझं गावच माझं तीर्थ' स्पर्धा, 1400 गावांत लोकसहभागातून साधणार विकास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - स्वच्छ भारत मिशन, चंद्रपूर जिल्हा परिषदेअंतर्गत शाश्वत स्वच्छतेकरिता अभिनव उपक्रम म्हणून 'माझं गावच माझं तीर्थ' स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात राबवली जात आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकरांनी दिली. 

जिल्ह्यातील गावागावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची संकल्पना रुजावी, या दृष्टीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'माझं गावच माझं तीर्थ' स्पर्धा मोठ्या स्वरूपात राबवणारा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. ८२७ ग्रामपंचायतींमधील १४०० गावांत उपक्रम राबवण्यात येत असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पापळकर यांनी सांगितले. या स्पर्धेची सुरुवात चंद्रपूर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वढा येथून केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर व जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व गावांत शाश्वत स्वच्छतेकरिता श्रमदान, लोकसहभागाची चालना देण्याचे काम केले जात आहे. या स्पर्धेत लोकसहभागावर भर देण्यात आला आहे. स्पर्धेत तालुका स्तर व जिल्हा स्तरावर भरघोस बक्षीस स्पर्धेत उत्कृष्ट काम करणाऱ्या गावाला दिले जाणार आहे. 

 

सोयीसुविधांचा अभ्यास करून निर्णय : तालुकास्तरीय तपासणी १ जानेवारी २०१९ ते १० जानेवारी २०१९ या कालावधीत तर जिल्हास्तरीय तपासणी १५ ते २५ जानेवारी २०१९ दरम्यान होणार आहे. गाव तपासणी करताना तपासणी चमू नादुरुस्त शौचालय दुरुस्ती व वापर, वाढीव कुटुंबाकडे शौचालय उपलब्धता व वापर, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या उपाययोजना, शोषखड्डे, प्लास्टिक निर्मूलन, विद्यार्थ्यांत जागृती, सार्वजनिक स्थळांची व गावात शाश्वत स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने गावकऱ्यांनी राबवलेले नावीन्यपूर्ण उपक्रम या बाबींवर भर दिला जाणार आहे. 

 

जिल्हास्तरावर प्रथम येणाऱ्या गावास १ लाख रुपये, द्वितियला ७५ हजारांचे पुरस्कार 
तालुका स्तरावर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला प्रथम २० हजार, द्वितीय १५ हजार व तृतीय येणाऱ्या ग्रामपंचायतीला १० हजार रुपयांचे रोख बक्षीस व सन्मानपत्र तर, जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या ग्रामपंचायतीला अनुक्रमे रुपये १ लाख, ७५ हजार व ५० हजार रुपयाचे रोख बक्षीस व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर विशेष बाब म्हणून नावीन्यपूर्ण प्रोत्साहन म्हणून ४० हजार रोख व सन्मानपत्र असे चौथे बक्षीस आहे. परीक्षणाकरिता तालुका पातळीवर गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हास्तरीय तपासणीकरिता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे. 

बातम्या आणखी आहेत...