आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्यूटीवर दाेन तारखेला गेले, दहा दिवसांत देशासाठी प्राणांची आहुती; मेजर शशिधरन यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- काश्मिरात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर शशिधरन विजय नायर यांच्यावर रविवारी (ता. १३) पुण्यात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. २ जानेवारीला शशिधरन कुटुंबीय आणि मित्रपरिवाराचा निरोप घेऊन कर्तव्य बजावण्यासाठी सेवेत हजर झाले होते. त्यानंतर अवघ्या दहाच दिवसांत शुक्रवारी (ता. ११) संध्याकाळी काश्मिरातील राजौरी येथे गस्त घालत असताना त्यांना मृत्यूने गाठले होते. 

 

काश्मिरात दहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडीच्या स्फोटात मेजर नायर शहीद झाले. हल्ल्याच्या दिवशी सकाळीच दूरध्वनीवरून त्यांनी घरच्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांच्या वीरमरणाची बातमी येणे हा मेजर नायर यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवारासाठी जबरदस्त धक्का ठरला. केरळातून आलेला त्यांचा बारा वर्षांचा मावसभाऊ आश्वत नायर याने मेजर शशिधरन यांच्या पार्थिवास अग्नी दिला. अखेरच्या क्षणापर्यंत सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानाला मानवंदना देण्यासाठी शेकडो पुणेकरांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. 'शशिधरन नायर अमर रहे', 'भारतमाता की जय', 'हिंदुस्थान झिंदाबाद', 'पाकिस्तान मुर्दाबाद' अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. 

 

नायर कुटुंबीय गेल्या ३५ वर्षांपासून पुण्याच्या खडकवासला येथे राहतात. शनिवारी रात्रीच मेजर नायर यांचे पार्थिव विशेष विमानाने पुण्यात आणले गेले. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील राष्ट्रीय युद्ध स्मारकात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अनेक आजी-माजी सेनाधिकाऱ्यांनी पुष्पचक्र वाहून मेजर नायर यांना आदरांजली वाहिली. रविवारी सकाळी खडकवासल्याच्या घरी त्यांचे पार्थिव नेण्यात आले. शशिधरन यांची आजी, आई लता, पत्नी तृप्ती आणि बहीण सीना या कुटुंबीयांना या वेळी अश्रू अनावर झाले होते. त्यांच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले. निवासस्थानापासून सजवलेल्या लष्करी वाहनातून त्यांची अंत्ययात्रा सुरू झाली. पुणेकर स्वयंस्फूर्तीने त्यात सहभागी झाले होते. सकाळी पावणेअकराच्या सुमारास अंत्ययात्रा वैकुंठ स्मशानभूमीत पोहोचली. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, आमदार भीमराव तापकीर, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह शेकडो पुणेकर अखेरची मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते. मेजर नायर यांना लष्कराच्या जवानांनी बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. मूळचे केरळचे नायर कुटुंब खडकवासल्यात स्थायिक झाले आहे. शशिधरन यांचा जन्म ३० जुलै १९८५ चा. केंद्रीय विद्यालयात शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून विज्ञानाची पदवी घेतली. महाविद्यालयात असताना 'एनसीसी'चे ते उत्कृष्ट स्नातक ठरले होते. 'एनडीए'तले तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून २००७ मध्ये ते लष्करात दाखल झाले. ११ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला. 

 

मला काहीही हाेणार नाही 
शशिधरन घर ते महाविद्यालय हा रोजचा ३० किमी प्रवास सायकलने करायचे. दहावीनंतरच त्यांनी सैन्यात दाखल होण्याचा निर्धार केला होता. दहा दिवसांपूर्वी घरून सीमेवर जात असतानाही त्यांनी शेजाऱ्यांना काकू, तुम्ही घाबरू नका. मला काहीही होणार नाही,alt148 असा विश्वास दिला होता. हसत्या-खेळत्या स्वभावामुळे ते लोकप्रिय होते. चार वर्षांपूर्वीच संगणक अभियंता असलेल्या महाविद्यालयीन दिव्यांग मैत्रीण तृप्ती यांच्याशी शशिधरन यांनी विवाह केला होता.
 

बातम्या आणखी आहेत...