आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृतसर अपघात :रावणदहन बघणाऱ्या 63 जणांना पाच सेकंदांत दोन रेल्वेंनी चिरडले, तर 142 हून अधिक जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर | पंजाबच्या अमृतसरमध्ये शुक्रवारी दसऱ्याला स्टेशनपासून दोन किमी अंतरावर जोडा फाटकाजवळ रुळांवर उभे राहून रावणदहन पाहणाऱ्या लोकांना पठाणकोट-अमृतसर रेल्वेने, तर दुसऱ्या ट्रॅकवर आलेल्या हावडा एक्स्प्रेसने चिरडले. यात रात्री उशिरापर्यंत ६३ जणांचा मृत्यू झाल्याला पुष्टी मिळाली आहे. १४२ हून अधिक जखमी आहेत. मृतांची संख्या वाढू शकते.

 

पंजाबच्या अमृतसरमध्ये रावणदहनादरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताने प्रत्येकाला हादरवून टाकले आहे. लोक घरातून दसरा पर्व पाहण्यासाठी बाहेर पडले होते. लहान मुलांना खेळणी मिळेल अशी आशा होती. रावणदहनानंतर मिठाई, जिलेबीचा आस्वादही घेता येईल, असे त्यांना वाटले. पण दोन रेल्वेगाड्या वादळासारख्या आल्या आणि लोकांना चिरडत निघून गेल्या. या घटनेत प्रशासन, स्थानिक नेते, रेल्वे व रामलीला आयोजक हे सर्व आरोपीच्या पिंजऱ्यात उभे दिसतात. घटनास्थळी लोकांच्या तोंडून हे तर 'कत्ले आम' असे उद‌्गार निघाले. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, येथे दरवर्षी असाच मेळा आयोजित केला जातो. रेल्वे क्रॉसिंगजवळ अलार्मची व्यवस्था प्रशासनाने करायला हवी होती. रेेल्वेला थांबवणे किंवा गती कमी करण्याची व्यवस्था व्हायला हवी. मी आमच्या छतावरून रामलीला पाहत होतो. पहिल्यांदा तर गर्दी जमवण्यासाठी गीत-संगीताचा कार्यक्रम झाला. आत जागा कमी होती म्हणून लोक बाहेर रेल्वे रुळावर गर्दी करून होते, असे प्रत्यक्षदर्शी मनप्रीत यांनी सांगितले. मेळ्याला नवज्योतकौर सिद्धू यांची उपस्थिती होती. त्यांचे भाषण झाले. या दरम्यान सायंकाळी ६.५० च्या सुमारास रावणदहन सुरू झाले. आतषबाजी सुरू झाली. त्या आवाजात रेल्वेचा आवाज, हॉर्नदेखील ऐकू येत नव्हता. रुळावर उभे असलेल्या काहींनी रेल्वे बघून पाय मागे घेतले. पण दुसऱ्या बाजूने अमृतसरहून येणाऱ्या गाडीने त्यांना चिरडले. 

 

मोहनसिंग, अपघाताचा प्रत्यक्षदर्शी 
सायंकाळी लोक रावणदहनाची प्रतीक्षा करत होती. दरवर्षी सायंकाळी ५ पूर्वीच रावणदहन होत होते. कारण, ६.४५ नंतर येथून दोन रेल्वे जातात. यंदा मात्र याकडे कुणीच लक्ष दिले नाही. गर्दी प्रचंड होती. दसरा मैदान आणि रेल्वे रुळांदरम्यान सुमारे १० फूट उंच भिंत आहे. मैदानात जागा कमी पडल्यामुळे अनेक लोक भिंतीवर, रुळांवर उभे होते. मंत्री नवज्योत सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर प्रमुख पाहुण्या होत्या. मात्र, त्या खूप उशिरा आल्या. अगोदर त्यांची वाट पाहण्यात वेळ गेला. नंतर त्या आल्या तर भाषण करत राहिल्या. रेल्वेची वेळ झाली हे लोकांच्या लक्षात आले नाही. ६.५० वाजता रावणाच्या पुतळ्याला आग लावण्यात आली. पुतळा पेटला आणि इकडे दोन्ही रेल्वे आल्या. आतषबाजीच्या आवाजात रेल्वेंचा अावाजच आला नाही. मलाही काही कळले नाही. परंतु, मी रुळांपासून दूर होतो. माझ्यासमाेरून अचानक एक रेल्वे वेगात निघून गेली. ताेवर इतका भीषण अपघात झाला असेल याची कुणालाच कल्पना नव्हती. आतषबाजी सुरूच होती. थोड्या वेळाने किंचाळ्या ऐकू आल्या. रुळाजवळ दूर अंतरापर्यंत शरीराचे अवयव विखुरले होते. तोवर नवज्योत कौर तेथून निघाल्या होत्या. यानंतर लोक आपल्या आप्तेष्टांना शाेधू लागले. 

 

आतषबाजीचा गोंगाट ५ मिनिटांनंतर थांबला तेव्हा रेल्वेने लोकांना चिरडल्याचे लक्षात आले 
प्रत्यक्षदर्शी मनीषकुमार म्हणाला, फटाक्यांचा आवाज ५ मिनिटांनंतर बंंद झाला तेव्हा मोठी दुर्घटना घडल्याचे लक्षात आले. रुळावर सर्वत्र मृतदेह विखुरले होते. लोक रुळावर स्वकीयांना शोधत होते. मदत पथक पोहोचेपर्यंत अर्ध्याअधिक लोकांना रुग्णालयात दाखल केले होते. 

 

घटनेसाठी चौघे जबाबदार 


1 आयोजक: छोट्या मैदानात रावणदहनाचे आयोजन करण्यात आले होते. ते पाहण्यासाठी हजारो लोक आले होते. काँग्रेस नेत्यांनी प्रशासनाची परवानगी न घेताच कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 
2 जिल्हा प्रशासन : दसरा आयोजकांसाठी नियम केलेले आहेत. बसण्याची व्यवस्था, पार्किंगसह फायर ब्रिगेड व रुग्णवाहिका आवश्यक आहे. गर्दी असूनही प्रशासनाने काहीच केले नाही. 
3 पोलिस : आयोजनस्थळी सुरक्षेचे उपाय पाहिल्यानंतर पोलिस परवानगी देतात. मात्र येथे पाेलिसांनी नियम-सुरक्षेकडे साफ दुर्लक्ष केले. 
4 नवजोत कौर : नवजोत कौरने पीएला गर्दी पाहण्यासाठी पाठवले. नंतर ६ वाजता त्या आल्या. ६.४० पर्यंत त्यांनी भाषण दिले. ६.६० ला रावणाचा पुतळा जाळला. इतक्यात रेल्वे आल्या. नंतर लोकच जबाबदार असल्याचे कौर म्हणत राहिल्या. घटनेनंतर त्या तेथून निघून गेल्या. अडीच तासांनी ९:२० वाजता रुग्णालयात गेल्या. म्हणाल्या, तेथे खुर्च्या रिकाम्या होत्या. उंचावरून व्हिडिओ काढण्यासाठी लोक रुळावर गेल्याचे कारण दिले. 

 

रेल्वे रुळाजवळ आयोजनाची मंजुरी नव्हती, पोलिस आयुक्तांनी प्रश्नांना बगल दिली 
एका अन्य प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, आयोजकांनी रुळाच्या जवळ एक एलईडी स्क्रीन लावलेला होता. त्यामुळे गर्दी वाढली होती. आयोजनाची परवानगी कशी दिली, या प्रश्नावर पोलिस आयुक्त एस.एस. श्रीवास्तव यांनी काहीही बोलणे टाळले. 

 

मुख्यमंत्र्यांनी इस्रायल दौरा रद्द केला, अमेरिका दौरा रद्द करून परतले रेल्वेमंत्री 
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी घटनेदरम्यान इस्रायलचा दौरा रद्द केला. शनिवारी सकाळी दिल्लीहून अमृतसरला जातील. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा व रेल्वे मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी लोहानी विशेष विमानाने अमृतसरला रवाना झाल्या. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिका दौरा मधेच रद्द करून ते मायदेशी रवाना झालेे आहेत. 

 

मंत्री आले तेव्हा जमाव नियंत्रणाबाहेर झाला, सुरक्षा रक्षकाने वाचवले 
घटनास्थळी पंजाबच्या शिक्षणमंत्र्यांना जनक्षोभाला सामोरे जावे लागले. लोकांनी एकामागोमाग एक थपडा लगावल्या. स्थिती नियंत्रणाबाहेर असल्याचे दिसताच सुरक्षा रक्षकाने हवेत गोळीबार केला. गोळीचा आवाज ऐकताच सर्व बाजूला झाले व मंत्र्यांना बाहेर काढले. याशिवाय तिथे उपस्थित पोलिसांसोबतही बाचाबाची झाली.

 

रायपूरसारखी व्यवस्था केली असती तर दुर्घटना टळली असती 
रायपूर । छत्तीसगडच्या रायपूरसारखी व्यवस्था केली असती तर घटना टळली असती. रायपूरच्या वॅगन रिपेअर शॉप कॉलनीमध्येही रावणाचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. 

 

घटनास्थळी मदतीसाठी आलेल्या रेल्वेला लोकांनी लावली आग 
अपघातात जखमी लोकांना रुग्णालयात नेण्यासाठी मदत रेल्वे पोहोचली. मात्र, लोकांनी घटनास्थळापर्यंत रेल्वे जाऊ दिली नाही. लोकांनी रेल्वेवर दगडफेक केली. दगडफेकीमुळे इंजिनाला लावलेल्या काचा तुटल्या. रेल्वेत आग लावण्याचेही प्रयत्न झाले. यामुळे चालकास परत येण्याचे आदेश देण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...