Home | Divya Marathi Special | Makarand Anaspure share his thoughts with divya marathi

दिल्लीत गोंधळ, गल्लीत धुरळा; डोक्याचा कप्पा खुला अन् डोळं उघडं ठेवा: मकरंद अनासपुरे  

मकरंद अनासपुरे | Update - Jan 28, 2019, 10:54 AM IST

कशाला करायचं मतदान? असं म्हणतात आणि मग जो खासदार निवडून आला, जे सरकार आलं त्याच्या नावानं खडे फोडतात.

  • Makarand Anaspure share his thoughts with divya marathi

    मुंबई- सालाबादप्रमाणं पुन्हा निवडणुकीचा धुरळा उडू लागलाय. राजकारणी लोकं पावलापावलावर भेटून नमस्कार, रामराम, आदाब, जयभीम करू लागलीयत. काही दिवसांतच तुमच्या मतदारसंघातले उमेदवार जाहीर होतील. ते घरात घुसून, चौकात भेटून, गल्लीत तुम्हाला गाठून काहीच्या काही सांगू लागतील. वोट द्या... तुम्हाला हे देतो... वोट द्या.. तुम्हाला ते देतो... असं सांगतील आणि कमरेलोक उडालेला धुरळा लिंबाच्या-आंब्याच्या टोकापर्यंत पोहोचंल. सारा गाव या धुळवडीत बुडून जाईल. महिनाभरानंतर निकाल लागंल. निवडून आलेला खासदार दिल्लीला निघून जाईल. तो पुढच्या निवडणुकीलाच परत येईल. मधली पाच वर्षं गावात पाणी नाही, वीज नाही, रस्ता नाही म्हणून तुम्ही त्याच्याकडं खेट्या मारत बसाल. पण त्याचा काही उपयोग व्हायचा नाही. कारण तुम्ही लोक डोळं उघडं ठेवून मतदान करीत नाहीत आणि डोक्याचा कप्पाही खुला ठेवीत नाहीत. त्याच्यामुळंच तुमचंच काय, शहरी भागातील लोकांचेही हाल होतात. आता खरं बोललं तर सख्ख्या आईलाही राग येतो. पण तुम्हाला कोणीतरी धाडस करून चार खऱ्या गोष्टी सांगितल्याच पाहिजेत, अशी वेळ येऊन ठेपली आहे. शहरातील शहाणी मंडळीही जरा नीटपणे ऐका... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला मताचा अधिकार देऊन देश घडवण्याची जबाबदारी प्रत्येकाच्या खांद्यावर टाकली आहे. पण ती अनेक जण टाळतात.

    कशाला करायचं मतदान? असं म्हणतात आणि मग जो खासदार निवडून आला, जे सरकार आलं त्याच्या नावानं खडे फोडतात. हे चांगलं नाही गड्या. मताचा योग्य, अचूक वापर करण्याचं आपलं कर्तव्यच आहे. ते बजवायचं नाही आणि नंतर बोंब मारत सुटायचं, याला काही अर्थ आहे काॽ बरं दुसरंही तेवढंच महत्त्वाचं. बरेच लोक मला असेही माहिती आहेत. तुम्हालाही माहिती असतीलच की ते उमेदवार या जातीचा आहे का, त्या धर्माचा आहे का, त्या पंथाचा पुजारी आहे का हे पाहून बटन दाबतेत. तसं नसंल तर अमुक यांचा पाव्हणा आहे का, तमुकचा पाव्हणा आहे का, असं ठरवून मतदान करतेत. हेही नसंल तर मग शेवटचं फारच खतरनाक. ते म्हंजे एखादी दारूची बाटली, गांधी बाबाची नोट घेऊन मतदान होतं. म्हणजे बाबासाहेबांनी जे दिलं ते आपण विकूनच टाकतो नाॽ त्यात आपलं अन् देशाचंही नुकसान करतो. आतापर्यंत केलंच. मंडळी, आतापर्यंत जे झालं ते झालं. आता जमाना वेगानं बदलत चाललाय. नवी पिढी लई हुशार होऊ लागलीय. तसे तुम्हीही व्हा. जात, धर्म, पंथाच्या, पाव्हण्या-रावळ्याच्या पलीकडं पाहा. दारूची बाटली, गांधीबाबाच्या नोटांसाठी मत विकू नका. जो तुमच्या गावात पाणी, रस्ता, वीज देईल व तुमच्या पोरांसाठी चांगल्या शिक्षण, दवाखान्याची, शेतमालाला चांगला भाव देण्याची व्यवस्था करेल त्यालाच निवडा. मतदानाच्या आधी त्याच्याकडून या सगळ्या कामाचा करार करून घ्या. निवडून आला की करार घेऊन त्याच्या मागे हात धुऊन लागा. मग बघा, दहा पंधरा वर्षांत देश कसा प्रगती करतो तेॽ एवढं कराच ताई - माई - अक्का, अण्णा, भाई, भाऊ बप्पा. तुम्हाला आपल्या देशाची शप्पथ आहे. मग कराल ना एवढंॽ आपल्या देशासाठी. येणाऱ्या पिढीला चांगलं काही देण्यासाठीॽ

    शब्दांकन : श्रीकांत सराफ

Trending