आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- एकतर्फी प्रेमातून शिक्षकाने सोबत काम करणाऱ्या विवाहित शिक्षिकेवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार जळगावमध्ये घडला आहे. महिलेवर हल्ला केल्यानंतर शिक्षकाने स्वत:वरही चाकूने वार केले. या घटनेत जखमी दोन्ही शिक्षकांना जळगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे दोन्ही शिक्षक बोदवड तालुक्यातील नाडगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कार्यरत आहेत.
चंदा उमेश गडकळ(वय 32) या नाडगावच्या आयटीआयमध्ये मागील दीड वर्षांपासून शिकवतात. याच महाविद्यालयात के. ई. पाटील हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मागील अनेक महिन्यांपासून के. ई. पाटील हा चंदा गडकळ यांना व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवरून अश्लील मेसेज पाठवत होता. गडकळ यांनी या मॅसेजला कुठलाही प्रतिसाद न देता, महाविद्यालयाच्या वरिष्ठांकडे यासंदर्भात तक्रार केली. पण, संचालक मंडळ आणि प्राचार्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती चंदा गडकळ यांचे पती उमेश गडकळ यांनी दिली.
चंदा गडकळ यांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्याने के. ई. पाटील संतापले. बुधवारी सकाळी चंदा गडकळ यांना वर्गात एकटे पाहून के. ई. पाटील यांनी वर्गाचा दरवाजा बंद केला. त्यानंतर चाकुने चंदा गडकळ यांच्यावर वार केले. के. ई. पाटील यांनी चंदा गडकळ यांच्या पोटावर, चेहऱ्यावर आणि हातावर वार करत त्यांना जखमी केले. त्यानंतर या माथेफिरू शिक्षकाने स्वत:वरही वार केले.
हा संपूर्ण प्रकार महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता चंदा यांना बोदवड येथील रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. के. ई. पाटील यांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.