मालेगाव ब्लास्ट प्रकरण / मालेगाव ब्लास्ट प्रकरण : न्यायालयाने दीड तास पाहिला स्फोटाचा व्हिडिओ, आरोपींची ‘इन कॅमेरा’ मागणी फेटाळली

तत्कालीन ठाणे अंमलदार, व्हिडिओग्राफरची घेतली साक्ष तसेच उलटतपासणी
 

विशेष प्रतिनिधी

Jun 11,2019 06:58:00 AM IST

नाशिक - छिन्नविच्छिन्न झालेले दुचाकीचे अवशेष, जखमी आणि मृतांच्या रक्ताचा चिखल, दोन मजले उडालेले छर्रे आणि स्फोटकांचे नमुने घेणारे न्यायवैद्यक अधिकारी.... १० वर्षांपूर्वीची ती थरारक दृश्ये मुंबईतील एनआयएच्या विशेष कोर्ट रूममध्ये पुन्हा दिसली. २००८ मध्ये मालेगावमधील भिक्खू चौकात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर काही तासांतच पोलिसांच्या व्हिडिओग्राफरने केलेले ते शूटिंग होते. हा व्हिडिओ इन कॅमेरा पाहण्याची आरोपींची मागणी फेटाळून कोर्टाने तब्बल दीड तास कोर्ट रूममध्ये घटनास्थळाचे हे चित्रण पाहिले.


२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावातील भिक्खू चौकात झालेल्या बॉम्बस्फोच्या खटल्याचे कामकाज राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयात सुरू आहे. हा स्फोट झाला त्या वेळचे आझादनगर पोलिस स्टेशनचे तत्कालीन ठाणे अंमलदार आणि घटनास्थळाच्या पंचनाम्याचे चित्रण करणाऱ्या पोलिसांच्या व्हिडिओग्राफरची सोमवारी विशेष न्यायालयापुढे साक्ष झाली. घटनास्थळाच्या संपूर्ण चित्रणाच्या दोन सीडीज या वेळी मुद्देमालातून काढण्यात आल्या. यातील चित्रण संबंधित साक्षीदाराने केले आहे की नाही, यासाठी त्या न्यायाधीशांसमोर दाखवणे अभिप्रेत होते, त्यामुळे त्यांना सुनावणीवेळी ते दाखवण्यात आले.


चित्रण बनावट असल्याचा उपाध्येंच्या वकिलांचा आरोप
उच्च न्यायालयातील खटल्याचा दाखला देऊन आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वकिलाने आक्षेप घेत सीडी इन कॅमेरा पाहण्याची मागणी केली. मात्र, त्यात काही आक्षेपार्ह नसल्याचे नियम दाखवून न्यायाधीश विनोद पडळकर यांनी मागणी फेटाळली. दरम्यान, हे चित्रण बनावट असल्याचा आरोप आरोपी निवृत्त मेजर रमेश उपाध्ये यांच्या वकिलांनी या वेळी केला. मालेगावहून आलेल्या व्हिडिओग्राफरची त्यांनी उलटतपासणी घेतली. या वेळी या खटल्यातील संशयित आरोपी समीर कुलकर्णी, सुधाकर द्विवेदी आणि रमेश उपाध्ये न्यायालयात हजर होते.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा सुनावणीवेळी थयथयाट
बॉम्बस्फोटाच्या खटल्याचे कामकाज मंुंबई येथील विशेष न्यायालयात सुरू आहे. खटल्याच्या कामकाजासाठी आठवड्यातून किमान एकदा तरी उपस्थित राहावे, या अटीवर यातील आरोपींना जामीन देण्यात आला आहे. मात्र, भाजपच्या नवनिर्वाचित खासदार प्रज्ञासिंह ठाकूर सातत्याने सुनावणीवेळी गैरहजर होत्या. परंतु, मागच्याच महिन्यात न्यायालयाने त्यांना खडसावल्यानंतर त्या शुक्रवारी सुनावणीस हजर झाल्या. दरम्यान, आरोपीच्या बाकावर बसण्याऐवजी पूर्णवेळ उभ्याच राहिल्या होत्या.

स्फोटानंतर घटनास्थळाचे संपूर्ण चित्रण कॅमेऱ्यात कैद
स्फोटानंतर घटनास्थळाच्या स्थितीचे सीडीत चित्रण होते. स्फोटात वापरलेली प्रज्ञासिंहांच्या दुचाकीचा चेसिस नंबर, खोटी नंबरप्लेट, रक्ताचे थारोळे, पादत्राणे, स्फोटात उद्ध्वस्त शकील ट्रान्स्पोर्टच्या दुकानाचा फलक, सायकलींचा चुरा व स्फोटामुळे बंद पडलेले चहाच्या दुकानातील ९.३५ वाजेची वेळ दाखवणारे घड्याळ तसेच तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील, छगन भुजबळांनी घटनास्थळाला दिलेली भेट, लोकांचा रोष हे सर्व चित्रण न्यायालयाने पाहिले.

न्यायाधीशांचा संताप, अखेर कोर्टातील धूळ झाली साफ
खटल्याचे कामकाज सुरू झाल्यावर पहिल्यांदाच न्यायालयात उपस्थित झालेल्या भाजप खासदार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या नाराजीनंतर मुंबईतील विशेष न्यायालयातील धूळ साफ करण्यात आली. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या न्यायालयासाठी एसी नाही, परंतु किमान एक्झॉस्ट फॅनची व्यवस्था का केली जात नाही, याबद्दल संताप व्यक्त करून अप्पर सत्र न्यायाधीश विनोद पडळकर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

X
COMMENT