Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | Malegaon case; Sadhvi pradnya present in court, but give denial to seet of criminals seat

मालेगाव खटला : कोर्टाने फटकारल्यानंतर साध्वी सुनावणीस हजर; काेर्टात आरोपींच्या बाकावर साध्वीचा बसण्यास नकार

प्रतिनिधी, | Update - Jun 08, 2019, 10:04 AM IST

तपास अधिकारी अधिकारी एका दिवशी फक्त एकच साक्षीदार उभे करत असल्यामुळे त्यांना कामाची गती वाढवण्याच्या सूचना दिल्या

 • Malegaon case; Sadhvi pradnya present in court, but give denial to seet of criminals seat

  नाशिक - वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने सुनावल्यानंतर भाजपच्या नवनिर्वाचित खासदार व मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी क्रमांक १ साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर अखेर शुक्रवारी मुंबईतील विशेष ‘एनआयए’ कोर्टात हजर राहिल्या. ‘या खटल्यात आजवर किती साक्षी झाल्या?’ असा प्रश्न कोर्टाने विचारल्यावर त्यांनी नकारार्थी मान हलवली. इतकेच नव्हे, तर सुनावणीचे कामकाज ऐकू येत नसल्याचे कारण देऊन आरोपींच्या बाकड्यावर बसण्यासही नकार दिला.


  प्रकृतीचे कारण देऊन प्रज्ञासिंह यांनी दरराेजच्या सुनावणीस गैरहजर राहण्याची मुभा मागून घेतली हाेती. मात्र, आठवड्यातून किमान एकदा तरी हजर राहावे, या अटीवर न्यायालयाने त्यांची ही विनंती मान्य केली हाेती. परंतु, सुनावणी सुरू झाल्यापासून त्या एकदाही हजर राहिल्या नसल्याने कोर्टाने त्यांना फटकारले होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर संसदीय कामकाजासाठी दिल्लीत जावे लागणार असल्याचे कारण देत सुनावणीस हजर राहता येणार नसल्याचा अर्ज साध्वीच्या वकिलांनी दिला. मात्र, ताे फेटाळण्यात आला. ‘भोपाळमध्ये विविध जाहीर कार्यक्रमांमध्ये त्या उपस्थित राहत असताना काेर्टात येण्यास काय अडचण आहे,’ असे सांगत कोर्टाने त्यांना आठवड्यात एका सुनावणीत हजर राहण्याचे सुनावले हाेते. शुक्रवारी दुपारी १२:५० ला साध्वी न्यायालयापुढे उपस्थित राहिल्या. या वेळी या खटल्यातील आरोपी समीर कुलकर्णी हादेखील कोर्टात उपस्थित होता. सायंकाळी सव्वापाचपर्यंत कोर्टाने साक्षीदारांना तपासले.


  २९ सप्टेंबर २००८ राेजी मालेगावातील भिख्खू चौकात झालेल्या बॉम्बस्फोटात ७ जणांचा बळी गेला होता, तर १०६ जण जखमी झाले होते. यात साध्वी प्रज्ञासिंह हिच्यासह १२ आरोपींना महाराष्ट्र एटीएसने अटक केली होती. पुढे राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे हा तपास सुपूर्द करण्यात आला होता. एनआयएच्या विशेष न्यायालयात सध्या याचे कामकाज सुरू आहे.

  साक्षीदारांबाबतही नाराजी
  या खटल्यात ११६ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. सतत गैरहजर राहणारे निवृत्त विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्याविरोधात अटक वाॅरंट काढण्यात आले आहे. ते पुढील आठवड्यात न्यायालयासमोर हजर राहण्याची शक्यता आहे. तपास अधिकारी अधिकारी एका दिवशी फक्त एकच साक्षीदार उभे करत आहेत, यावरही आक्षेप घेत न्यायालयाने त्यांना कामाची गती वाढवण्याच्या सूचना दिल्या.

Trending