Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Malganga Goddess temple thieves arrested In 12 hours

मळगंगादेवी मंदिरात चोरी करणारे १२ तासांत गजाआड

प्रतिनिधी | Update - Sep 03, 2018, 11:15 AM IST

पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगादेवी मंदिरातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तब्बल ४ लाख ९० हजारांचा ऐवज लांबवणारी

 • Malganga Goddess temple thieves arrested In 12 hours

  नगर- पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगादेवी मंदिरातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तब्बल ४ लाख ९० हजारांचा ऐवज लांबवणारी टोळी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत गजाआड केली. चोरट्यांकडून सोने घेणाऱ्या सराफालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. स्थानिक गुन्हे शाखा व पारनेर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केल्याची माहिती पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.


  सखाराम नंदू गावडे (१९, वडगाव मावळ, जि. पुणे), रमेश ऊर्फ राहुल बाळू पडवळ (२२, निमगाव दाभाडे, ता. खेड, जि. पुणे), भास्कर खेमा पथवे (४०, नांदूर दुमाला, ता. संगमनेर) व राहुल ऊर्फ भाऊसाहेब निळे (२७, मिर्झापूर, ता. संगमनेर) अशी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांच्याकडून स्वस्तात सोने घेणाऱ्या सराफाचे नाव प्रशांत कृष्णनाथ मुजबंद (कळस, ता. अकोले) आहे. मळगंगादेवी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी देवीचे सोन्या-चांदीचे दागिने व दानपेटीतील रोख रक्कम असा सुमारे ४ लाख ९० हजारांचा ऐवज लांबवला होता. ही घटना शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास उघडकीस आली. देवीच्या मंदिरातच चोरी झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. चोरीचा तपास तत्काळ न लागल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.


  या गुन्ह्यातील आरोपी पुणे जिल्ह्यातील खेड, नांदूर दुमाला व संगमनेर तालुक्यातील मिर्झापूर येथे असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. दोन्ही ठिकाणी वेगवेगळी पथके पाठवून चारही आरोपींना अटक करण्यात आली. चोरीचे दागिने अकोले तालुक्यातील कळस येथील सराफ भुजबंद यास विकले असल्याची कबुली आरोपींनी दिली.


  पोलिसांनी सराफालाही अटक केली. पवार यांच्यासह पारनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हनुमंतराव गाडे, पोलिस उपनिरीक्षक राेहन खंडागळे, ज्ञानेश फडतरे, सचिन खामगड, भाऊसाहेब काळे, दत्ता हिंगडे, मन्सूर सय्यद, जाकिर शेख, विजयकुमार वेठेकर, रवींद्र कर्डीले, भागिनाथ पंचमुख, संदीप घोडके, संतोष लोढे, मनोज गोसावी, संदीप पवार, राहुल सोळुंके, मच्छिंद्र बर्डे, मेघराज कोल्हे, विजय ठोंबरे, सचिन आडबल आदींनी ही कारवाई केली.


  दागिने हस्तगत
  आरोपींकडून दानपेटीतील ३४ हजार ८८९ रुपयांची रोकड, कुलूप तोडण्यासाठी वापरलेली कटावणी व हातोडा हस्तगत करण्यात आला. सोने घेणाऱ्या सराफाकडून एक लाख पाच हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, त्यात दोन िकलो वजनाचे चांदीचे मुखवटे, सोन्याचे डोरले, कर्णफुले, सोन्याची साखळी, नथाची तार, दहा सोन्याचे मणी असा ऐवज हस्तगत करण्यात आला. आरोपींनी यापूर्वी संगमनेर तालुक्यातील डोळासणे येथील काळभैरवनाथाच्या मंदिरातही चोरी केली होती.


  धार्मिक स्थळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे हवे
  मळगंगादेवी मंदिरात चोरी झाल्याने ग्रामस्थांची भावना तीव्र होती. मात्र, पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपींना अटक केली. शहर व जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची आवश्यकता आहे. धार्मिकस्थळांच्या ट्रस्टींनी ही खबरदारी घेतली, तर असे प्रकार यापुढील काळात घडणार नाहीत. कॅमेऱ्यांसह सुरक्षारक्षक, तसेच अलार्म असेल, तर चोऱ्या होणार नाहीत.
  - रंजनकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक.


  आरोपींवर १९ गुन्हे
  पोलिसांनी अटक केलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुध्द घारगाव, वडगाव मावळ, दळेगाव दाभाडे, शिरुर, संगमनेर तालुका, अकोले, येवला, पारनेर पोलिस ठाण्यात तब्बल १९ गुन्हे दाखल आहेत. आरोपी सराफ भुजबंद याने यापूर्वीदेखील चोरीचे सोने स्वस्तात खरेदी केले होते. पाचही आरोपींची कसून चौकशी सूरू असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्याची उकल होणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकारांना दिली.

Trending