आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील कामाठीपुरा पाहून व्ही.एस.नायपाॅल तडक निघून गेले, नंतर मागितली माफी, नामदेव ढसाळांना आवडले नव्हते वागणे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘नायपाॅल यांना नामदेव कामाठीपुरातल्या बैठकीला घेऊन गेला होता. तिथल्या वेश्या, त्यांची सलगी, गराडा, दाटीवाटीच्या गल्ल्या, कोंदट खोल्या पाहून नायपाॅल वैतागले. बैठकीतून मधूनच निघून गेले. नंतर त्यांना पश्चात्ताप झाला. दुसऱ्या दिवशी त्यांनी कबुली दिली. चुकल्यावर माफी मागण्याचा मोठेपणा त्यांच्याकडे होता,’ अशी आठवण नुकतेच निधन झालेले नाेबेल विजेते लेखक व्ही.एस. नायपाॅल यांच्या मुंबई भेटीची आठवण दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक नामदेव ढसाळ यांच्या पत्नी व कवयित्री मल्लिका अमरशेख यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितली.


‘मिलियन म्युनिटीज नाऊ’ या पुस्तकाचे संदर्भ गोळा करायला नायपाॅल मुंबई भेटीवर आले हाेते. ते १९८५ साल असावे. नामदेवची दलित पँथर ऐन भरात होती. नामदेवची मुलाखत घ्या.. असे त्यांना कुणीतरी सुचवले. ते आमच्या ‘सातरस्ता’च्या घरी आले. नामदेव घरी नव्हताच. मग त्यांनी माझी मुलाखत घेतली. निरीक्षण हे लेखकाचे वैशिष्ट्य असतं. नायपाॅलांची नजर एक्सरेसारखी होती. सतत काहीतरी ते शोधतायत असे वाटे. आमचं घर, भिंती, दारे-खिडक्या, घराचा रंग, घरातली माणसं, त्यांची देहबोली यांचं ते निरीक्षण करत होते. घरातल्या बारीकसारीक गोष्टीही नजरेने ते टिपत होते. माझी मुलाखत घेत घेत ते मला वाचत आहेत, असे वाटत होते.   


दुसऱ्या दिवशी नामदेव त्यांना घेऊन मुंबईतला वेश्याव्यवसाय जिथे चालतो त्या कामाठीपुऱ्यात गेला. नामदेव कामाठीपुऱ्यात मोठा झालेला. त्या वेळी तो कवी होता, सामाजिक कार्यकर्ताही होता. नायपाॅल परदेशी माणूस म्हटल्यावर वेश्यांनी त्यांना गराडाच घातला. नायपाॅलमध्ये लेखकीय अॅरोगन्सी होती. ते व्हिक्टोरियन शिस्तीत वाढलेले होते. साहजिकच कामाठीपुरा त्यांना पचनी पडला नाही. त्यांना ते बिल्कुलच आवडले नाही. त्यांच्यासाठी खास ठेवलेल्या बैठकीला ते न बसताच निघून गेले. दुसऱ्या दिवशी नायपाॅलना पश्चात्ताप झाला. वेश्याव्यवसाय शहराचा एक अपरिहार्य भाग आहे, त्याला आपण टाळू शकत नाही, असे त्यांना वाटले असावे. ते स्वत: आले. नामदेवची त्यांनी माफी मागितली. दोन-तीन दिवस नामदेवने त्यांना मुंबईत हिंडवले.    


‘मिलियन म्युनिटीज नाऊ’तील मुलाखतीचा विपर्यास
अमरशेख म्हणाल्या, ‘मिलियन म्युनिटीज नाऊ पुस्तकात’ आम्ही दिलेल्या मुलाखतीचा विपर्यास झाला. आमच्या मुलाखती त्यांच्यासाठी कच्चा माल होता. नामदेवला तर नायपाॅल बिल्कुल आवडले नाहीत. त्याला फारच संवेदनाहीन वाटले. त्यांची जगभरची भटकंती नामदेवला पंचतारांकित अशीच वाटली. जग पाहिलेल्या या माणसाला समाज तपासायचा होता. आपली सनातन मुळं शोधायची होती. माणसाविषयी त्यांना कमालीची उत्सुकता व मोठं कुतूहल होतं. पण इतक्या मोठ्या लेखकाला नामदेव काही पकडता आला नाही. नामदेवच्या अस्पृश्यतेच्या जाणिवांना त्यांना स्पर्श करता आला नाही. नामदेवची शोकांतिका नायपाॅलना उमजली नाही. इतके मात्र खरे…

 

बातम्या आणखी आहेत...