आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपचेच काम करतो, खरगे यांची टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सांस्कृतिक तसेच तटस्थ संघटन असल्याचा दावा करत असले तरी ही वस्तुस्थिती नाही. संघ हा भाजपसाठीच काम करत आहे. लोकसभेच्या निवडणुका तीन महिन्यांवर आल्या असताना आता राममंदिराचा विषय मुद्दाम उकरून काढला जात असल्याची टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी तसेच ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी केली. 

नागपुरात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने खरगे आले होते. या वेळी प्रसार माध्यमांशी बोलताना खरगे यांनी सांगितले की, राममंदिराचा विषय न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे न्यायालय जो निर्णय देईल तो साऱ्यांनाच मान्य करावा लागणार आहे. त्यामुळे या विषयावर बाहेर टिप्पणी करणे योग्य ठरणार नाही. भाजप मात्र हा विषय मुद्दाम उकरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या तीन महिन्यांनंतर लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे राममंदिराचा विषय उपस्थित करून मते मागण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मागील साडेचार वर्षांपासून हे लोक सत्तेत आहेत, याकडे खरगे यांनी लक्ष वेधले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर भाजपसोबतच आहे. ते कितीही तटस्थ असल्याचा दावा करीत असले तरी ही वस्तुस्थिती नाही. ते स्वत:ला सांस्कृतिक संघटना असल्याचेदेखील भासवतात. प्रत्यक्षात ते भाजपला पूर्ण मदत करीत आहेत, असे ते म्हणाले. 

अागामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षातील गटबाजीवर विचारले असता पक्षांतर्गत हा विषय हाताळला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या वेळी काँग्रेसचे राज्यभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

अल्पसंख्याकांनी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहावे :चव्हाण 
नागपूर | सध्याच्या सरकारच्या विभाजनकारी धोरणांमुळे अल्पसंख्याकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण असून त्यांच्यावर अधिकार मागण्याची वेळ आली आहे. या समाजांनी एकत्र येऊन काँग्रेसच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शनिवारी नागपुरात बोलताना केले. नागपुरात ख्रिश्चन को-ऑर्डिनेशन कमिटीच्या वतीने आयोजित मसीहा अधिकार संमेलनात चव्हाण बोलत होते. काँग्रेसचे प्रभारी व ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसच्या ख्रिश्चन आघाडीचे नेते अनिल थॉमस, माजी आमदार आशिष देशमुख उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, देशातील एकता व अखंडता कायम ठेवण्याचे काम काँग्रेसच्या काळात झाले. मात्र, सध्या देश एकाच विचाराच्या आधारे चालवला जात आहे. सरकार जाती-धर्मांमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे देशापुढे अतिशय कठीण आव्हान उभे ठाकले आहे. ख्रिश्चन समाजाचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान नसल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून होतो. प्रत्यक्षात स्वातंत्र्यलढ्यात भाजप आणि संघाचे काय योगदान आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित होते. 

 

बातम्या आणखी आहेत...