आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियतीचे ऋण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ममता राऊत

काही नाती रक्ताची नसतात. पण प्रसंगी अशी नाती रक्ताच्या नात्यापेक्षाही काकणभर सरस ठरतात. अशाच नात्याची एक आठवण...
 
माझ्या लग्नाची फायनल बोलणी सासरी होणार होती. नातेवाईक, मोजक्या मंडळींसह बोलणी पार पडून शिक्कामोर्तब होण्याची वेळ आली. मला भाऊ नसल्यामुळे मुलाचे पाय कुणी धुवावेत हा प्रश्न निर्माण झाला. माझ्या गावाकडचे यांचे मित्र आमच्यापेक्षा लहान होते.  त्यांनी हा विधी पार पाडला. आणि अशा रीतीनं हा मानलेला भाऊ माझ्या जीवनात आला. लग्नातले सर्व विधी माझ्या याच लहान भावाच्या हाताने झाले. माझे पती आणि भाऊ एकाच महाविद्यालयात नोकरीला होते. आमचे राहणेही एकाच ठिकाणी असल्यामुळे प्रत्येक सण आम्ही मिळून साजरा करायचो.  

दोन वर्षांनी माझ्या भावाचे लग्न झाले. प्रत्येक विधीमध्ये मी त्यांची बहीण म्हणून सहभागी झाले. भावजय अमरावतीला नोकरीला असल्याने ते अमरावतीला शिफ्ट झाले. काही वर्षांनंतर माझ्याही नोकरीचा योग अमरावतीला आला आणि आम्हीही तिकडेच शिफ्ट झालाे. राहण्याचे ठिकाण दूर-दूर असले तरी आम्ही परस्परांमधली नाती, बंध टिकवून ठेवले आहेत. माझ्या मुलालाही मामा मिळाला. त्याच्याही संसारवेलीवर एक गोड फुल उमललं. पण नियतीने जसा मला भाऊ दिला होता तसाच तो माझ्याकडून हिरावूनही घेतला. अवघ्या २२ वर्षांचा भावा-बहिणीच्या नात्याचा हा प्रवास. पण त्याला नजर लागली. कर्करोगामुळे वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी काळाने त्याला आमच्यापासून कायमचं दूर नेलं.   सारं काही संपलं एका क्षणात. आता त्याच्या घरी, त्याच्या लेकरासमोर कसं जायचं हा प्रश्न पडतो. ‘येतो ताई’ हे भावाचे शब्द समोर उभे राहतात. अखेरीस एकदा मन घट्ट करून जाऊन आले. इथून पुढे येणंजाणं चालूच राहील. कारण भावामुळे जे नातं निर्माण झालं ते बहीण या नात्याने मी शेवटपर्यंत निभावेनच.  प्रत्येक कामात तत्पर, खूप बोलकं, देखणं व्यक्तिमत्त्व, उत्तम खेळाडू, उत्तम शिक्षक, मनमिळावू  असं व्यक्तिमत्त्व लाभलेला भाऊ. मात्र काळाने हिरावून नेले त्याला. पुन्हा तीच कोरी भाऊबीज या बहिणीच्या वाट्याला  पूर्वीप्रमाणे. पण बहीण-भावाच्या हळव्या नात्याची ओळख करून देणाऱ्या नियतीचे ऋण विसरता येणार नाही. तिच्यामुळेच अल्पकाळ का होईना, पण मनात कायम घर करून गेलेला भाऊ मिळाला. जिथे कुठे असेल तिथे तो सुखी राहावा याच आशीर्वादासह पाणावलेल्या डोळ्यांनी त्याची आठवण सदैव होत राहील. 


लेखिकेचा संपर्क :  ९८५०३१५
४७७