आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ममता बॅनर्जींनी ईदच्या दिवशी भाजपच्या ‘जय श्रीराम’ला दिले उत्तर; म्हणाल्या - कोणी घाबरून जाऊ नका, लवकरच भाजपवाले पळ काढतील

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता  - पश्चिम बंगालमध्ये ईदच्या दिवशीही भाजप व तृणमूलच्या नेत्यांत जुगलबंदी सुरू होती. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी ईदच्या दिवशी “जय श्रीराम’ च्या घोषणेवरून भाजपला उत्तर दिले. 


ममता म्हणाल्या, बंगालमध्ये कोणालाही घाबरण्याची गरज नाही. आम्ही हिंदू-मुस्लिम, शीख व ख्रिश्चन धर्मीयांचे संरक्षण करण्यास समर्थ आहोत. कधी-कधी सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे कठोर असतात. परंतु नंतर ती दूर होतात. घाबरू नका. त्यांनी ईव्हीएमवर जेवढ्या गतीने ताबा मिळवला होता, तेवढ्या गतीने ते पलायनदेखील करतील. दुसरीकडे ममतांचे भाचे अभिषेक यांनीही टीका केली. भाजप आता जय श्रीरामऐवजी जय महाकाली म्हणू लागलेय. बहुधा त्यांचा टीआरपी घटला असावा. भाजपचे लोक राजकारणात धर्माला आणू पाहताहेत, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे पश्चिम बंगालमधील राजकारण चांगलेच तापू लागले आहे. 
 

ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे ईदच्या दिवशी सभा घेऊन लोकांना शुभेच्छा दिल्या. त्यागाचे नाव हिंदू, प्रामाणिकपणा म्हणजे मुस्लिम, प्रेमाचे नाव ख्रिस्ती बांधव होत. शीख बलिदानाचे नाव आहे, असे त्यांनी सांगितले. 
 

२०२१ च्या तयारीला लागलो : कैलाश 
ममता बॅनर्जी २०२१ च्या विधानसभेपर्यंत सरकार चालवू शकतील, असे मला तरी वाटत नाही. कारण त्या अपरिपक्व असल्यासारख्या बोलतात, असे भाजपचे सरचिटणीस व बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटले आहे. आम्ही तर २०२१ च्या तयारीला लागलो आहोत. परंतु त्याआधीच ममता सरकार स्वत:हून कोसळेल. 
 

 

उत्तर देऊन ममता कबर खोदू लागल्या : अपर्णा सेन 
भाजपच्या जय श्रीरामला उत्तर देऊन ममता स्वत: आपली कबर खोदू लागल्या आहेत, असे पद्मश्रीने सन्मानित चित्रपट निर्मात्या अपर्णा सेन यांनी म्हटले आहे. मला ही गोष्ट मुळीच आवडलेली नाही. धर्म व राजकारण या दोन्ही गोष्टी स्वतंत्र असल्या पाहिजेत. राजकारणात अशा कोणत्याही घोषणा देण्यास बंदी आणली गेली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. 

 

तृणमूलच्या कार्यकर्त्याची गोळी घालून हत्या
बंगालमध्ये मंगळवारी रात्री दुचाकीवरील अज्ञात हल्लेखोरांनी तृणमूलच्या कार्यकर्त्याची गोळी मारून हत्या केली. ही घटना डमडम भागात घडली. निर्मल कुंडू हे तृणमूलचे वॉर्ड अध्यक्ष होते. भाजपच्या समर्थकांवर हत्येचा आरोप लावण्यात आला. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. 
 

जय बंगाल लिहिलेली १० लाख पत्रे पाठवली 
तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मोदींना १० लाख पत्रे पाठवली. ही पत्र डमडम पोस्टातून दिल्लीच्या ७ लोककल्याण मार्गावरील पंतप्रधान निवासस्थानाच्या पत्त्यावर पाठवण्यात आली आहेत. भाजपनेही ममता बॅनर्जींना जय श्रीराम लिहिलेली १० लाख पत्रे पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...