आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जळगाव - मोबाइल रिचार्ज बॅलेन्स देण्यासाठी बेकायदेशीरपणे ऑनलाइन मोबाइल अॅप्लिकेशन्स तयार करून लोकांकडून लाखो रुपये घेऊन पळून गेलेल्या भामट्यास १० महिन्यांनंतर सायबर पोलिसांनी भाेपाळ येथून अटक केली.
समीर शेख उर्फ राजा भाई उर्फ मोहम्मद कलीमोद्दीन खान (रा. मेहरुण ) असे अटक केलेल्या भामट्याचे नाव आहे. खान याने गतवर्षी बिग किंग व्हॅलेट व अतीया पे वर्ल्ड हे दोन बेकायदेशीर अप्लिकेशन तयार केले. या वेबसाईटवर अनेक लोकांना लिंक केले. या माध्यमातून त्याने रिचार्ज बॅलेन्स देण्यासाठी जास्त कमिशन देण्याचे आमिष नागरिकांना दिले होते. त्यानुसार अमान इरफान अन्सारी (रा. फातीमानगर, एमआयडीसी) यांना १७ लाख ४५ हजार ३२४ रुपयांमध्ये गंडवले. तसेच भाविक रमेशचंद वेद, मोहम्मद नासिर अन्वर हुसेन, रिजवान अहमद शेख रमजानी, अश्फाक खान अयुब खान, डॉ. शेख फिरोज, अहमद इबने मोहम्मद युसूफ, शेख जहीर अहमद कासम, अल्ताफ खान अयुब खान, अल्ताफ मुनाफ खाटीक या लोकांकडून त्याने लाखो रुपये घेतले होते; पण लोकांना मोबदल्यात बॅलेन्स दिला नव्हता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर लोकांनी त्यांच्याकडे पैसे परत मागण्यासाठी तकादा लावला होता. त्यामुळे खान हा कुटुंबीयांसह जळगावातून पळून गेला होता. अमान अन्सारी यांनी या प्रकरणी फिर्याद दिली हाेती. भामट्याला भोपाळ शहरातील शामला हिल भागातून पाेलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर १४ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पाेलिस त्याच्याकडे अधिक चौकशी करणार आहेत. तसेच त्याने याआधी कुणाला गंडा घातला का याचाही पोलिस तपास करत आहेत.
दहशतवादी असल्याची पोस्ट केली, फिर्यादीवर कारवाई
गुन्ह्यातील फिर्यादी अमान अन्सारी यांनी बेकायदेशीरपणे जानेवारी २०१९ मध्ये बेपत्ता असलेल्या खान याचे फेसबुक अकाऊंट ऑपरेट केले होते. खान हा दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असून लवकरच भारतात मोठा बॉम्बस्फोट घडवून आणणार आहे. अशा आशयाची पोस्ट खानच्या फेसबुक अकाउंटवर टाकली होती. त्यामुळे जिल्ह्यासह देशभरात खळबळ उडाली होती. सायबर पोलिसांनी या अनुषंगाने तपास केला. या वेळी अमान अन्सारी यानेच ही पोस्ट टाकल्याचे उघडकीस आले होते. पोलिसांनी खान याला लवकर अटक करावी, त्याचा शोध घ्यावा यासाठी आपण अशी खळबळजनक पोस्ट टाकल्याचे अमान याने पोलिस चौकशीत सांगितले. या कृत्यामुळे अमान अन्सारी याच्यावर देखील पोलिसांनी कारवाई केली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.