आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्गावरील खड्ड्यात दुचाकी घसरली अन पाठीमागून येणाऱ्या वाहनाने तरुणाला चिरडले

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • लग्न आटोपून पत्नीस घेण्यासाठी निघाला होता तरुण

जळगाव- महामार्गावरील खड्ड्यात दुचाकी घसरल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले. त्यात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. बांभोरीजवळ हॉटेल साईनाथसमोर रविवारी दुपारी २.३० वाजता हा अपघात झाला.

भाऊसाहेब प्रभाकर कोळी (वय ३०, रा.चांदसर, ता.धरणगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. कोळी यांना धडक देणारे वाहनचालक न थांबता पळून गेला आहे. कोळी हे माहेरी गेलेल्या पत्नीस घेण्यासाठी दुचाकीने (एमएच- १९, एजी- ८०४४) निघाले होते. त्यांच्या पत्नी मुलांसह साकेगाव (ता.भुसावळ) येथे माहेरी गेल्या होत्या. कोळी हे दुचाकीने निघाल्यानंतर महामार्गावरील एका खड्ड्यातून त्यांची दुचाकी घसरली. यामुळे तोल जाऊन ते दुचाकीसह रस्त्यावर कोसळले. नेकमे याच वेळी मागून येणाऱ्या एका वाहनाने कोळी यांना चिरडले. 
यानंतर वाहनचालक वाहनासह पळून गेला. अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली. नागरिकांनी कोळी यांचा मोबाइल ताब्यात घेऊन त्यामधील काही क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती दिली. यानंतर चांदसर गावातील तरुणदेखील घटनास्थळी पोहोचेले. जैन इरिगेशन कंपनीच्या रुग्णवाहिकेने कोळी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून कोळी यांना मृत घोषित केले. अपघाताच्या या घटनेनंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली.

लग्न आटोपून पत्नीस घेण्यासाठी निघाला होता तरुण

रविवारी चांदसर गावात एक लग्न समांरभ होता. कोळी यांनी या लग्नसमारंभात हजेरी लावली. यानंतर ते साकेगाव येथे जाण्यासाठी निघाले होते. पत्नी व मुलांना घेऊन रात्रीच पुन्हा चांदसर येण्याचे त्यांचे नियोजन होते. तत्पूर्वीच या दुर्देवी अपघातात त्यांचा मृत्यू झाला. महामार्गावर गेल्या महिनाभरापासून अपघातांची मालिका सुरू आहे. एक ते दोन दिवसाआड अपघात होऊन त्यात निष्पाप बळी जात असल्याने रोष वाढला आहे.

वृद्ध आई-वडील, मुलांचे छत्र हरपल्याने आक्रोश

कोळी हे शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. वडिलोपार्जित शेती नसल्यामुळे मेहनत करणे ऐवढेच त्यांचे काम होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, एक विवाहित बहिण, पत्नी मनीषा, मुले वैशाली (वय ९), काजल (७) व प्रेम (४) असा परिवार आहे. या अपघातामुळे त्यांच्या कुटंुबातील कर्ता पुरूष गेल्याने नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला.
मृत भाऊसाहेब कोळी