आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद- मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना सोमवार दुपारी एएस क्लब-लिंकरोड दरम्यान घडली. मिलिंद शेकुजी केदारे (55 रा.बनेवाडी, रेल्वे स्टेशन परिसर) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अपघात घडताच ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
मिलींद केदारे हे मोलमजुरी करून कुटुंब चालवत होते. नेहमीप्रमाणे ते कामानिमित्त वाळूज परिसरात गेले होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दुचाकीवरून (एमएच 20 ईडी-2822) परत येत असताना पैठण रस्त्यापासून साधारणत: एक किलोमीटर अंतरावर असताना रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या नादात त्यांची दुचाकी हेलकावली. तेवढ्यात मागून आलेल्या ट्रकने (सीजी04 एचवाय-3049) त्यांच्या दुचाकीला ठोकरले. यात त्यांचा चेंदामेंदा झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने ट्रक घटनास्थळी सोडून पळ काढला.
दरम्यान वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक शेषराव उदार, सातारा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शंकर शिरसाठ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मयत दुचाकीस्वाराच्या खिशात आधार कार्ड सापडले, त्यावर मिलींद शेकुजी केदारे असे नाव होते. त्याआधारे केदारे यांच्या कुटुंबियांशी पोलिसांनी संपर्क केला. याप्रकरणी केदारे यांचा मुलगा नितीन केदारे याच्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.