आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेच्या धडकेत युवकाचा मृत्यू; मृतदेह ७ तास रुळांजवळ पडून

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'दिव्य मराठी' प्रतिनिधीने स्टेशन मास्तरांना दिली माहिती

जळगाव- शहरातील हरिविठ्ठलनगरात युवकाचा रेल्वेची धडक लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मात्र, रेल्वे व पोलिस प्रशासनाच्या संवेदनाशून्य कारभारामुळे मृतदेह सात तासांपेक्षा अधिक वेळ रेल्वेरुळालगत पडून होता. अखेर सायंकाळी ५ वाजता मृतदेह उचलून शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला.


गजानन दलपत पाटील (वय २६, रा. हरिविठ्ठलनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याचा हरिविठ्ठलनगरातील खांब क्रमांक ४१६ जवळ रेल्वेची धडक लागल्याने मृत्यू झाला आहे. सकाळी १० वाजेच्या सुमारास रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास मृतदेह आला. त्यांनी त्याबाबत रेल्वे प्रशासनाला कळवले; परंतु दुपारचे ३ वाजले तरी मृतदेह घटनास्थळावरच पडून होता. 'दिव्य मराठी' प्रतिनिधीने स्टेशन मास्तर अरुण पांडे यांना याबाबत कळवले. त्यांनी अपघाताबाबत माहिती नसल्याचे सांगितले. हरिविठ्ठलनगरातील नागरिकांनी रामानंदनगर पोलिसांशीही संपर्क साधला. त्यांनी रेल्वे प्रशासनाकडून मेमो प्राप्त झालेला नसल्याचे सांगितले. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. अखेर दुपारी साडेचार वाजता पोलिस घनास्थळी आले.

मजुरीतून करायचा कुटुंबाचा उदरनिर्वाह

गजानन हा शाैचास गेलेला असताना रेल्वेचे रूळ ओलाडताना रेल्वेची धडक लागून त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता हरिविठ्ठलनगरातील नागरिकांनी घटनास्थळी व्यक्त केली आहे. गजानन हा वृद्ध आईसोबत हरिविठ्ठलनगरात राहत होता. मजुरी करून तो दोघांचा उदरनिर्वाह करीत होता. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.