Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | man jumped from hospital for commit suicide

'संदर्भ'च्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या

प्रतिनिधी | Update - Jan 13, 2019, 11:30 AM IST

दाेन वर्षांतील तिसरी घटना; सुरक्षिततेवर प्रश्न 

 • man jumped from hospital for commit suicide

  नाशिक - विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. १२) घडली. गेल्या दोन वर्षांच्या काळात रुग्णालयामध्ये अशाप्रकारे उडी मारून आत्महत्या करण्याची तिसरी घटना घडली आहे. गंभीर रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययाेजना करण्यात दिरंगाई झाल्याने आणखी एका रुग्णाचे प्राण गेल्याची संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे.


  मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त असलेले रहीमखान नबीखान पठाण (५२, रा. गुलशननगर, मालेगाव) उपचारासाठी शुक्रवारी (दि. ११) रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांनी तिसऱ्या मजल्यावरील कक्षाची काच फोडून खाली उडी मारत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. शुक्रवारी त्यांचे एक डायलिसीस पूर्ण करण्यात आले हाेते. त्यानंतर पुढील उपचारासाठी शनिवारी चार तासाचे डायलिसीस करण्यासाठी त्यांना अतिदक्षता विभागातून तिसऱ्या मजल्यावरील डायलिसीस कक्षात दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हलविण्यात आले.

  डायलिसीसची प्रक्रिया सुरू होऊन एक तास उलटल्यानंतर अचानक रहीमखान यांनी संतापून डायलिसीसमध्ये बाधा आणली. तसेच, जवळील रुग्णाच्या खाटेवर पाय ठेवून खिडकीवर चढत डोक्याने जोराची धडक मारून खिडकीची काच फोडली. यावेळी वार्डमध्ये उपस्थित वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व टेक्निशियन त्यांना राेखण्यासाठी धावेपर्यंत पठाण यांनी खिडकीतून खाली उडी मारली. यानंतर लगेचच रुग्णालयातील इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी व परिसरातील सुरक्षारक्षकांनी खाली धाव घेत रहीमखान यांना जखमी अवस्थेत उचलून तत्काळ अतिदक्षता विभागात दाखल केले. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यास सुरुवात झाली. मात्र, तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.


  घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी रुग्णालयातील याच मजल्यावरून किशन पाटोळे या रुग्णाने उडी मारून आत्महत्या केली होती.


  जाळ्या बसविण्याच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष
  संदर्भ रुग्णालयात रुग्णांकडून होणाऱ्या आत्महत्यांच्या प्रकरणानंतर रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयातील धोकेदायक क्षेत्रात व खिडक्या असलेल्या ठिकाणी जाळ्या लावण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविला होता. त्यानंतर ९ लाख ५० हजारांच्या खर्चाची तरतूददेखील करण्यात आली. मात्र, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुन्हा याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने जाळ्यांचा प्रश्न प्रलंबितच राहिला. ताे लवकर मार्गी लावण्याची मागणी हाेत आहे.


  काही ठिकाणी जाळ्या लावल्या..
  रहीमखान यांच्यावर तीन तासांचे डायलिसीस पूर्ण करण्यात आले होते. दुसरे डायलिसीस सुरू असताना त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर उपचार करत वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यात यश आले नाही. रुग्णालयातील खिडक्यांसह बाल्कनीच्या दरवाज्यांवर जाळ्या लावण्याचा प्रस्ताव दिलेला असून काही ठिकाणी जाळ्या लावल्याही आहेत. -डॉ. व्ही. नामपल्ली, विशेष कार्य अधिकारी, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय

Trending