Maharashtra Crime / दांपत्याच्या वादात एका महिन्याच्या चिमुकलीला गमवावा लागला जीव, पत्नीच्या रागात भाच्चीला धारदार शस्त्राने भोसकले

पत्नी आपल्यासोबत नांदायला तयार नाही म्हणून केले कृत्य

दिव्य मराठी वेब

Aug 20,2019 05:44:51 PM IST

नागपूर- नागपूरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच आहे. अशातच एका महिन्याच्या चिमुकल्याचा भोसकून खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दांपत्यामधला वाद महिलेच्या भाचीच्या जीवावर उठला. पत्नीसोबत असलेल्या वादातून आरोपीने आपल्या मेहुणीच्या एक महिन्याच्या बाळाची हत्या केली आहे.


नागपुरातील पारशिवणी पोलिस स्टेशन अंतर्गत बाखरी-पिपळा गावात हा धक्कादायक प्रकार घडला. आरोपीने एक महिन्याच्या बाळाची धारधार शस्त्राने भोसकून हत्या केली. रुपाली जितेंद्र पांडे यांच्या चिमुरडीचे नाव ठेवण्याआधीच तिला जगाचा निरोप घ्यावा लागला. आरोपी गणेश गोविंद बोरकर हा कुही गावातील रहिवासी आहे. गणेश आणि त्याच्या पत्नीचे काही कारणामुळे खटके उडत होते. त्यामुळे पत्नी बाखरीमध्ये असलेल्या आपल्या माहेरी निघून आली होती.


पत्नी आपल्यासोबत नांदायला तयार नाही, या रागातून गणेश सोमवार(19 ऑगस्ट) दुपारी तिच्या माहेरी आला. सासरच्या मंडळींसोबत त्याचा वाद झाला. पत्नीसह सासरच्या मंडळींना त्याने शिवीगाळ केली. वादावादी सुरू असतानाच गणेशने धारदार शस्त्र काढले आणि शेजारीच पाळण्यात झोपलेल्या एक महिन्याच्या रुपालीवर सपासप वार केले. हे वार इतके भीषण होते की, बाळाच्या पोटातील आतडे बाहेर आले.


चिमुरडीला गंभीर जखमी अवस्थेत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, पण प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला नागपूरच्या मेये रुग्णालयात पाठवले. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. दरम्यान पोलिसांनी 41 वर्षीय आरोपी गणेश गोविंद बोरकरला बेड्या ठोकल्या आहेत.

X
COMMENT