Home | Magazine | Madhurima | Manasi Patil writes about Savitribai Phule

विरोधाभासाचा त्रिकोण

मानसी पाटील | Update - Aug 07, 2018, 07:23 AM IST

नवीन शहर. ओळखी भरपूर. पण तरीही शहर अनोळखीच. गर्दी भरपूर पण चित्रपटातल्या जलदगती दृश्यांप्रमाणे आपल्याला सतत एकटं ठेवून ध

 • Manasi Patil writes about Savitribai Phule

  नवीन शहर. ओळखी भरपूर. पण तरीही शहर अनोळखीच. गर्दी भरपूर पण चित्रपटातल्या जलदगती दृश्यांप्रमाणे आपल्याला सतत एकटं ठेवून धावणारी. विद्येचा आणि पराक्रमाचा इतिहास मिरवणारी पुण्यनगरी. गर्दीतल्या सैरभैर झालेल्या ‘मी’ला धक्का देऊन जात, पण कटाक्षाने एकटंच ठेवून जाणारी. परवा आईच म्हणाली, “अगं नवीन शहर, काही बघितलंस की नाही एेतिहासिक, पौराणिक, वगैरे?”

  आस्तिक पण वस्तुनिष्ठ सहृदयी आईला, कालच पाहिलेल्या विरोधाभासाची भव्यता दाखवणारा, ओंगळ काटा उभा करणारा तीन बिंदूंचा लख्ख त्रिकोण सांगण्याची हिंमत नाहीच जमवू शकले.
  परवा अंगारकी चतुर्थीच्या पूर्वसंध्येला पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मखरावर होत असलेली भव्य सजावट बाजूच्या फूटपाथवर उभी राहून बघत होते, भारावले होतेच सौंदर्यानुभूतीने. मी आणि माझ्यासकट सर्वच. अगदी जरा पाठ फिरवून सहज मागे वळले तर काय, मी उभी होते साक्षात, ‘माझ्या सुशिक्षित आणि सभ्य अस्तित्वाची ठिणगी जिथे पडली, लढाई झाली, विजय मिळाला’ त्या मंदिराच्या प्रांगणात. मी माझ्या ‘सावित्रीमायेच्या’ कर्मभूमीतील पहिलं पदस्थान असणाऱ्या रोषणाईरहित, भग्नावस्थेतील, मोडकळीस आलेल्या जिन्यासहित, अवदास्यात असलेल्या भिडेवाड्यासमोर उभी होते. गणपती आणि सावित्रीमाय यांची क्षणिक नजरानजर झाली आणि गणपतीची त्यानंतर झुकलेली नजरच मी पाहिली. मखरावरचा साज आणि नजर मात्र झुकलेली!
  आतापर्यंत इतिहासात वाचलेली वास्तू, माझ्या जडणघडणीचं बीज पेरणारे ते ‘मायबाप’, त्यांची भग्नावस्था हे एका बिंदूवर आणि समोरचा श्रीमंत दगडूशेठ दुसऱ्या बिंदूवर; विरोधाभासाचा रेषाखंड पूर्ण झाला होता.


  अध्यात्माची ‘श्रीमंती’ आणि शिक्षण, इतिहास व प्रशासनाचं ‘दारिद्र्य’ यातील विरोधाभासाने मलाच आरसा दाखवला. ‘श्रद्घा (दगडूशेठ)’ आणि स्त्री उत्थापनेची बीजे रोवणारा ‘भिडेवाडा’ यांना जोडणाऱ्या रेषाखंडावरून पुढे दहाच पावले चालत जाऊन थबकले, शहारले. ‘लालबत्ती.’ बुधवारपेठ. माणुसकीच्या दृष्टीने हीन म्हणावं असं स्त्रीत्वाचं ओंगळ रूप दाखवणारा ‘तिसरा बिंदू’ नजरेत आला आणि ओकारी आल्यासारखं झालं. पोटात खड्डा पडला. तिसरा बिंदू. विरोधाभासाचा ‘त्रिकोण’ पूर्ण झाला होता. मागे वळून पाहिलं आता सावित्रीमायची नजरही खाली झुकली होती. मी मात्र नजरहीन झाले होते.
  रात्री अंथरुणावर पडताना उशाशी हजार प्रश्न माझ्याआधीच जाऊन भिडले होते. नवीन शहर अनुभवून बघ, म्हणणाऱ्या आईला हे प्रश्न विचारू शकत नव्हते. जिच्या मंदिराची झालेली अडगळ झाकायला तिचाच फोटो आम्ही आडवा करून वापरला तिच्यासमोर उभी राहण्याची हिंमत मला नव्हती. तिच्याच लेकी असलेल्या ‘त्या’ हातात ‘लालबत्ती’ घेऊन माझ्या सुशिक्षित आणि सभ्यपणावर नग्न शरीरांनी धावून येत होत्या.
  म्हणून हा हजार प्रश्नांचा पट तुमच्यापुढे आणून ठेवलाय. बघा उत्तर सापडतंय का एका प्रश्नाचं तरी. वाट बघेन.
  (माफ करा तिसरा फोटो काढायची लाज वाटली.)


  - मानसी पाटील, जळगाव
  manasipatil11@gmail.com

Trending