आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंदसोर- मध्य प्रदेशातील मंदसोर येथे सात वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना मंगळवारी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. गाजलेल्या या खटल्याच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष हाेते. पॉक्सो कायद्यानुसार शिक्षा सुनावताना विशेष न्यायाधीश निशा गुप्ता यांनी म्हटले, शाळेतून घरी जाण्यासाठी निघालेल्या मुलीस नराधमांनी दाखवलेल्या लालचीस विरोध करू शकत नाही. तिच्यावर अत्याचार ही दुर्मिळात दुर्मिळ घटना आहे. याला फाशीची शिक्षा देणे योग्य आहे. महिला न्यायाधीशांनी दोन्ही नराधमांना वेगवेगळ्या कलमाखाली सात वर्षे, दहा वर्षे आणि आजन्म कारावास व फाशीची शिक्षा ठोठावली.
२६ जून रोजी सरस्वती शिशू मंदिरातील मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी पालकांची वाट पाहत उभी होती. तिला एका नराधमाने मिठाईची लालूच दाखवली होती. आजी शाळेत पोहोचली तेव्हा मुलगी तेथे आढळली नाही. आजी व मुलीच्या पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर २७ जून रोजी ही मुलगी लक्ष्मण दरवाजाजवळ गंभीर जखमी अवस्थेत सापडली होती.
५६ दिवसांत दिला निकाल
आरोपपत्र दाखल झाल्यानंतर अवघ्या ५६ दिवसांत या खटल्याचा निकाल लागला आहे. १८ जुलै रोजी दोन्ही आरोपीविरुद्ध अारोपपत्र दाखल झाले. २० जुलैपासून सुनावणी सुरू झाली. ३० जुलै ते ८ ऑगस्टपर्यंत सरकारी पक्षाने आरोपीविरोधात ३७ साक्षीदार हजर केले. १४ जुलै रोजी दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला. सादर करण्यात आलेल्या पुराव्याशी सहमती दर्शवत न्यायालयाने दोन्ही नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावली.
४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; ६ तासांत अाराेपपत्र दाखल
मध्य प्रदेशात चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या एका १४ वर्षांच्या मुलास बाल न्याय बोर्डाने सहा तासांत शिक्षा सुनावली. त्याच्यावर सकाळी ११ वाजता न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. सायंकाळी ५ वाजता खटल्याचा निर्णय देण्यात आला. सोमवारी न्याय बोर्डाने १४ वर्षांच्या मुलास सिवनी येथील बाल निरीक्षण गृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्कार प्रकरणात इतक्या लवकर निर्णय येण्याचे देशातील पहिले प्रकरण असावे. अत्याचाराची घटना सहा दिवसांपूर्वी घडली होती. उज्जैन जिल्ह्यात घट्टियाजवळील जलवा गावात राहणाऱ्या चार वर्षांच्या मुलीस १५ ऑगस्ट रोजी त्या मुलाने घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केले होते. या प्रकरणात न्यायमूर्ती तृप्ती पांडे यांनी तत्काळ सुनावणी सुरू केली. साक्षीदार, अन्य पुरावे आणि वैद्यकीय तसेच डीएनए अहवालानुसार बोर्डाने मुलास सायंकाळी दोषी ठरवले.
तत्पर तपास अन् वेगवान निकाल
मंदसौरमध्ये 26 जून रोजी 7 वर्षीय चिमुरडीवर बलात्काराची घटना घडली होती. याप्रकरणी आरोपी आसिफ आणि इरफान खानला कोर्टाने दोषी ठरवले व मृत्युदंड ठोठावला. या पूर्ण प्रकरणात सरकारने एसआयटीची स्थापना करून प्रकरणाचा तपास डीएसपी राकेश मोहन शुक्ला यांना सोपवला होता. त्यांनी तत्पर तपास करत आरोपींना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवले.
शिक्षेच्या भीतीने कमी जेवले नराधम
निकालाच्या एका दिवसापूर्वी सोमवारी रात्री दोन्ही नराधमांच्या चेहऱ्यावर शिक्षेच भय स्पष्ट दिसून आले. तुरुंगातील सूत्रांनुसार, सोमवारी सकाळपासूनच दोन्ही आरोपींच्या चेहऱ्यावर शिक्षेवरून बेचैनी दिसत होती. संध्याकाळी साडेसहा वाजेपासून 7 वाजेदरम्यान दोन्ही आरोपींना जेवण देण्यात आले. परंतु शिक्षेच्या भीतीने आरोपींनी जेवण कमी केले. यानंतर आपल्या बराकीत कधी बसायचे, तर कधी छताकडे टक लावून पाहत होते. रात्री उशिरापर्यंत आरोपी बराकीत येरझाऱ्या घालताना दिसून आले.
चिमुरडीच्या आरोग्याचा आणि शिक्षणाचा खर्च उचलणार सरकार
शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारने पीडित कुटुंबाच्या आर्थिक मदतीसाठी हात पुढे केला होता. परंतु पीडितेच्या वडिलांनी भरपाईचा प्रस्ताव ठोकरला होता. मध्य प्रदेशच्या महिला बाल विकास मंत्री अर्चना चिटणीस म्हणाल्या की, सीएम शिवराजसिंह चौहान यांच्याकडून पीडित मुलीच्या वडिलांच्या बँक खात्यात 5 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. ते म्हणाले की, मुलीच्या आरोग्याचा आणि शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.