आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मी टू\' प्रकरणांत तपासासाठी कायदेतज्ज्ञांची समिती : मनेका, तर नाना पाटेकरांना \'हाऊसफुल-4\' मधून बाहेर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मी टू मोहिमेत सातत्याने होत असलेले लैंगिक शोषणाचे सर्व आरोप आता चौकशीच्या कक्षेत येतील. या चौकशीसाठी महिला-बालकल्याण मंत्रालय कायदेतज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा विचार करत आहे. ही माहिती महिला-बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी दिली. हे आरोप करणाऱ्या प्रत्येक महिलेच्या दु:खावर आणि वेदनांवर आपला विश्वास असल्याचे मनेका म्हणाल्या. मात्र, मोदी सरकारमध्ये त्यांचे सहकारी मंत्री असलेले माजी संपादक एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांबाबत मनेका यांनी मौन बाळगले. 


जास्तीत जास्त महिलांनी समोर येऊन लैंगिक शोषण करणाऱ्यांची नावे जाहीर करावीत, असे आवाहनही मनेकांनी केले. या महिलांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी कायदेतज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली. यासंबंधीच्या उपाययोजनांबाबत ही समिती शिफारशी करेल, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, प्रत्येक पुरुषाने महिलांशी मर्यादशील वागण्याची खरी वेळ आली असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

 

आता नेदरलँडची रिपोर्टर, अकबर यांच्यावर १०वा आरोप 
केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलांची संख्या आता १० झाली आहे. नेदरलँडच्या एका महिला रिपोर्टरने अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले. २००७ मध्ये वयाच्या १८व्या वर्षी एका वृत्तपत्रात काम करत असताना आपल्या पित्याचे मित्र असलेले अकबर यांनी आपले लैंगिक शोषण केले असल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. 


अकबर यांच्या राजीनाम्याबाबत भाजपत एकमत नाही 
विदेश दौऱ्यावर असलेले राज्यमंत्री एम. जे. अकबर शुक्रवारी नायजेरियाहून तातडीने येणार होते. मात्र, ते गिनीला रवाना झाले. आता रविवारी ते परततील. दौरा अर्धवट सोडून परत यावे असे निर्देश अकबर यांना दिल्लीतून गेल्याच्या बातम्या होत्या. दरम्यान, सखोल चौकशीविना अकबर यांना मंत्रिपदावरून काढणे योग्य नाही, असा एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे. त्यामुळे राजीनाम्यावर एकमत होऊ शकलेले नाही. 

 

न्यायपालिकेलाही लिंगभेदाने ग्रासले : हायकोर्ट जज 

मुंबई | हायकोर्टाचे जज गौतम पटेल यांनी मी-टू मोहिमेचे समर्थन केले. अमेरिकी अभिनेता व विनोदी कलाकार बिल कोस्बी यास १४ वर्षांपूर्वीच्या अशा प्रकरणात शिक्षा झाली. भारतात असाच कायदा असला पाहिजे, असे ते म्हणाले. न्यायपालिकेलाही लिंगभेदाने ग्रासले असल्याचे ते म्हणाले. 

 

'हाऊसफुल-४' मधून नाना पाटेकरला डच्चू! 
'हाऊसफुल-४' या चित्रपटातून नाना पाटेकर यांना डच्चू देण्यात आल्याचे वृत्त आहे. तर, आपल्यावरील आरोपांनंतर सोबत काम करणाऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून नानांनी चित्रपट सोडल्याचे सांगितले जाते. 

 

साजिदने चित्रपट सोडला, अक्षय नाराज 
'हाऊसफुल-४'चा दिग्दर्शक साजिद खानवर सलोनी चोप्रासह एका पत्रकार महिलेने केलेल्या आरोपांनंतर साजिदने हा चित्रपट सोडला. तर, अक्षयकुमारने या प्रकारावर नाराजी व्यक्त करत शूटिंग रद्द केले आहे.

 

- महिलांनी केलेले अारोप गंभीर आहेत. यात तथ्य असेल तर अकबर यांनी राजीनामा द्यायला हवा, असे रामदास आठवले यांनी म्हटले. मात्र, यात अकबर यांची बाजू ऐकून घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...