Home | Maharashtra | Mumbai | Maneka Gandhi's duties only to the tigers, but I also care about the bribe

अवनी ठार प्रकरण..मनेका गांधींना फक्त वाघांची, मला मात्र लाेकांचीही काळजी-सुधीर मुनगंटीवार

विशेष प्रतिनिधी | Update - Nov 06, 2018, 12:20 PM IST

नरभक्षक वाघिणीला ठार केल्यानंतर ‘प्राणिप्रेमी’ भाजप नेत्या मनेका गांधी यांनी मुनगंटीवार यांच्यावर कठाेर शब्दांत टीका

 • Maneka Gandhi's duties only to the tigers, but I also care about the bribe

  मुंबई - ‘केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना केवळ वाघाची काळजी आहे, मला मात्र वाघांबरोबरच नागरिकांचीसुद्धा काळजी आहे,’ असा टाेला राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी साेमवारी अापल्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या व केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांना लगावला. यवतमाळ जिल्ह्यातील कथित नरभक्षक वाघिणीला ठार केल्यानंतर ‘प्राणिप्रेमी’ भाजप नेत्या मनेका गांधी यांनी मुनगंटीवार यांच्यावर कठाेर शब्दांत टीका केली हाेती. त्यावर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले.


  ते म्हणाले की, ‘नरभक्षक वाघिणीला ठार करण्याचा निर्णय मंत्री किंवा सचिव घेत नाहीत. राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या (एनटीसीए) मार्गदर्शिकेनुसार निर्णय घेतला जातो. पण याची मनेका यांना माहिती नाही. त्यांनी टि्वट करण्यापेक्षा पन्नास पैसे खर्चून मला एक फोन केला असता तर मी ही सर्व माहिती मोफत दिली असती. मनेका गांधी यांचे वन्यप्राण्यांवर प्रेम आहे. माझे वाघावर तर प्रेम आहेच, वाघिणीच्या बच्च्यावरसुद्धा आहे. मनेका या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आहेत. वाघिणीच्या हल्ल्यात मृत महिला आणि बालकांचाही विचार मला करावा लागतो,’ अशा शब्दांत त्यांनी मनेका गांधी यांच्या ‘प्राणिप्रेमा’ची खिल्ली उडवली. मनेका यांच्या टीकेमुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची झाल्याचा दावाही मुनंगटीवार यांनी केला.

  मनेका यांना नरभक्षक वाघ ठार मारणे चुकीचे वाटते तर त्यांनी वन संरक्षणाचा केंद्रीय कायदा बदलण्यात पुढाकार घेतला पाहिजे.नरभक्षक टी १ (अवनी) वाघिणीला ठार मारण्यासंदर्भात सर्व प्रक्रिया कायदेशीर करण्यात आलेल्या होत्या, याचा पुनरुच्चार मुनगंटीवर यांनी केला.
  मी वन विभागाचा कारभार हाती घेतल्यावर राज्यात २५ वाघ वाढले आहेत. मी अशा राज्याचा वनमंत्री आहे, ज्या राज्यात देशात सर्वाधिक वाघ (२२६) अाहेत. तसेच व्याघ्र संरक्षणासाठी देशात सर्वाधिक रक्कम माझ्या राज्यात खर्च केली जात असल्याचा दावा मुनगंटीवर यांनी केला.

  1.. टी-1 (अवनी) वाघिणीला ठार करण्यासाठी नबाब शफाअत अली खान यांची नियुक्ती करण्यात आली होती. हिमाचल, आंध्र, तेलगंण, यूपी, बिहारमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  २. मनेकांच्या पिलीभीत मतदारसंघात तीन वाघांना मारण्यासाठीही हैदराबादचे शूटर नबाब शफाअत अली खान यांचीच नियुक्ती केली होती. मनेकांनी शफाअत यांची पाठ थोपटली हाेती.
  3. नामांकित शूटर नबाब शफाअत अली खान बिहारमध्ये गेले असल्याने त्यांचा मुलगा असगर अली खान याने ही कारवाई केली. असगर याची नियुक्ती पूर्णपणे कायदेशीरच आहे.

  अवनीला मारण्याच्या प्रक्रियेची चौकशी
  मनेका गांधी वन्यप्रेमी असून त्यांची कठोर टीका आम्ही समजू शकतो. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. वाघ स्वतःहून हल्ला करत नाही. त्याच्या कार्यक्षेत्रात गेल्यावरच तो हल्ला करतो. पण अवनी नरभक्षक झाल्यामुळेच तिला ठार मारण्याचा निर्णय घेण्यात आला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  यावरच देशाचे श्रेष्ठत्व : राहुलचे ट्विट
  याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही देशाचे श्रेष्ठत्व प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवरून ठरत असते, असे त्यांनी म्हटले आहे. यावर केंद्रीय पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांनी तत्काळ प्रत्युत्तर देत ‘अाम्हाला राहुल गांधी यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही’, असे म्हटले आहे.

Trending