आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविस्मरणीय ‘दिवाळी पहाट’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगेश बरई

गेल्या काही वर्षांत दिवाळी आणि पाडवा पहाट कार्यक्रमांनी दिवाळीची प्रसन्न सुरुवात  करण्याची प्रथा पडली आहे. मात्र दिवाळीच्या ऐन धामधुमीत घरी झालेल्या लक्ष्मीच्या गोड आगमनानं सुखावलेल्या बाबाची ही गोड दिवाळी आठवण...
 

माझ्या लग्नानंतरची पहिली दिवाळी ही इतर दिवाळसणापेक्षा अगदीच साधेपणाने गेली. मात्र एक अमूल्य भेट देऊन गेली. त्यामुळे ‘ती’ दिवाळी माझ्या कायमस्वरूपी लक्षात राहील. माझे लग्न व्हायच्या आधी माझ्या तीन बहिणी, मी आणि आई असे आमचे पाच जणांचे कुटुंब होते. माझे वडील हयातीत असतानाच माझ्या तीन बहिणीचे लग्न झाले होतेे. माझे लग्न २००२ मध्ये नाशिकला झाले. माझी सासुरवाडी विदर्भातील अमरावतीकडची. माझ्या सासरकडची मंडळी अगदी साधी. बायकोही अगदी साधी. कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेणारी. माझे लग्न झाले तेव्हा आमच्या घरात मोजून आम्ही दोन डोकी. मी आणि माझी आई.

माझ्या पहिल्या दिवाळीच्या आधी कोजागरी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी माझ्या घरी नव्या पाहुणीचे आगमन झाले. ऐन दीपावलीच्या दिवसांत माझ्या घरी सोनपावलानं लक्ष्मी अर्थात माझ्या कन्येचं आगमन झालं. आई, मी आणि माझी पत्नी आम्ही सारेच खुश झालो. मला बाप होण्याच्या आनंदाबरोबरच नव्या जबाबदारीची जाणीव त्यावेळेस झाली. पण आमची म्हणजे आईची आणि माझी खरी कामाची तारांबळ पुढेच झाली.

माझ्या मुलीला पाहायला घरात पाहुण्यांची वर्दळ सुरू झाली. त्याचबरोबर माझी आणि माझ्या आईची घरकामाची “मॅरेथॉन” शर्यत सुरू झाली. एकीकडे दिवाळीच्या कामाची लगबग आणि दुसरीकडे पाहुण्यांची सरबराई यातच आमचा दिवस संपायचा. दिवाळीचा फराळही आम्ही त्या वेळेस आयता आणला. आम्ही माय-लेकांनीच दिवाळीची पूजा धामधुमीत नाही, पण साधेपणाने केली. कदाचित लक्ष्मीनेही त्या वेळेस आमची पूजा गोड मानून घेतली असेल. आमच्या माय-लेकराची धावपळ देवीमातेला जाणवली असेल. तिनं आमचा प्रसाद त्या वेळेस गोड मानून घेतला. आमचा दिवाळी पाडवाही असाच गडबडीतच निघून गेला. ना आईला व्यवस्थित साडी घेता आली, ना बायकोला, ना मला कपडे. मुलीचेच भरपूर लाड त्या वेळेस करावेसे वाटले. सारं विश्वच तिच्यासमोर आणून उभं करावंसं वाटलं. कारण ती आमच्या घरातली खऱ्या अर्थानं अविस्मरणीय ‘दिवाळी पहाट’ होती...

लेखकाचा संपर्क :  ९२७१५३९२१६

बातम्या आणखी आहेत...