आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप-सेनेत ‘थाली’पीट! शिवसेनेची १० तर, भाजपची ५ रुपयांतच थाळी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी भाजपशी युती केली असली तरी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी आपल्या पक्षाचा स्वतंत्र वचननामा प्रकाशित केला. शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह समाजातील सर्वच घटकांसाठी घोषणांची तरतूद यात करण्यात आली आहे. गरीबांना १० रुपयांत जेवणाची थाळी, एक रुपयात २०० आराेग्य चाचण्यांची साेय, आर्थिक दुर्बल शेतकऱ्यांना वार्षिक १० हजार रुपयांची मदत, आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींना माेफत महाविद्यालयीन शिक्षण आदी वचनांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप ५ रुपयांत जेवण देण्याची घाेषणा करण्याची शक्यता आहे.
 
शिवसेनेचा या वेळचा वचननामा तयार करण्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची ठरली. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘शिवसेना आश्वासने देत नाही, तर वचन देते व ते पूर्ण करते. ‘वचननाम्यात आरेचा उल्लेख नाही?’ यावर उद्धव  म्हणाले, आरे हा मुद्दा मुंबईच्या वचननाम्यात असेल. आरेवर सर्वच राजकीय पक्षांनी आधी आपापली भूमिका जाहीर करावी.’युती असताना वेगळा वचननामा का?’ या प्रश्नावर ते म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांशी माझी वचननाम्याबाबत वेळोवेळी चर्चा झालेली आहे. परंतु त्यांच्या मुद्द्यांपेक्षा आमचे काही वेगळे मुद्दे असू शकतात, ते जनतेसमोर यावेत म्हणून आम्ही वेगळा वचननामा प्रकाशित करत आहोत.’ राज ठाकरे यांनी विरोधी पक्षनेतेपद मिळावे म्हणून मतदारांकडे साकडे घालण्यास सुरुवात केली आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी, ‘पुढच्या वेळेपर्यंत ते फक्त पेपर वाचण्यापुरते राहावेत.’
 

भाजपची पाच रुपयांत थाळी; शिवसेनेला शह
शिवसेनेने १० रुपयांत थाळीची लाेकप्रिय घोषणा करताच त्यांना भाजपकडून शह देण्यासाठी नवी याेजना जाहीर करण्यात आली. पाच- सहा महिन्यांपासून बांधकाम कामगारांसाठी सुरू असलेली ‘महाराष्ट्र अटल आहार याेजने’ची व्याप्ती वाढवून ती राज्यभरात वाढवण्याची तयारी भाजपने केली आहे. या योजनेत गरिबांना फक्त ५ रुपयांत जेवण मिळू शकेल. भाजपच्या जाहीरनाम्यात त्याची घोषणा हाेऊ शकते.
 

ठाकरेंचे उत्तर : तर मग फुकटातच जेवण देऊ
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘गरिबांसाठी आम्ही १० रुपयांत जेवण देणार आहाेत. मात्र, यातही स्पर्धा हाेत आहे. भाजप तीच थाळी ५ रुपयांना देणार आहे. असे असेल तर ही थाळी आम्ही फुकटात देता येते का, याचा विचार करायला सांगू. केवळ स्पर्धा करण्यापेक्षा जनतेचे भले करायचे, हा यामागील उद्देश असेल.
 

वचननाम्यातील महत्त्वाचे मुद्दे

प्रथम ‘ती’ : आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामूल्य.

विद्यार्थी एक्स्प्रेस : तालुकास्तरावर गाव ते शाळा/महाविद्यालयामधील सर्व विद्यार्थ्यांसाठी २५०० विशेष बसची सेवा सुरू करणार.

वीज दरकपात : ३०० युनिटपर्यंत वीजवापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीज दर ३०% कमी करणार.

आरोग्यसेवा : सर्व जिल्ह्यांत मेडिकल कॉलेजसह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, १ रुपयात आराेग्य चाचणी

सन्मान निराधारांचा : निराधार पेन्शन योजनेअंतर्गत देण्यात येणार मानधन दुप्पट करणार.

युवा सरकार फेलो : १५ लाख पदवीधरांना शिष्यवृत्तीची संधी देणार.

शेतकऱ्यांचे हित : शेतीखालील क्षेत्रवाढीसाठी अल्पभूधारक आणि आर्थिक दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट १० हजार रुपये प्रतिवर्षी जमा करणार.
 

बातम्या आणखी आहेत...