आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न जमलेले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनीषा खालकर 

दिवाळीतल्या फराळात एखादा तरी पदार्थ असा असतोच, ज्याला पाहून कुणाच्या तरी सुगरण हातांची आठवण होते. तो पदार्थ त्या पद्धतीनेच बनवावा, त्याला तशीच सुगरण चव यावी अशी करणाऱ्याची  इच्छा असते. मात्र प्रत्येकालाच हे साधत नाही...
दुराफे काकू दरवर्षी न चुकता दीपावलीत डबा भरून अनारसे पाठवायच्या. माझ्या वडलांची नोकरी बदलीची. त्याच ठिकाणी दुराफे काकाही बदली करून घ्यायचे. एकमेकांचा जिव्हाळा इतका अतूट होता की, रिटायर्ड झाले तरी आमच्यातला स्नेह अनारसेरूपात टिकून राहिला. काकूसारखे अनारसे आमच्या काॅलनीत कुणालाही कधी जमलेच नाही. काका रिटायर्ड झाले तर त्याचे बिऱ्हाड पुण्याला गावी गेले. आम्ही अहमदनगरच्या गावी आलो. मुलींचे लग्न, शेतीचा व्याप यात सर्वच गुरफटून गेलो. शिवाय एवढ्या लांब अनारसे येणे जवळपास अशक्यच होते. गेल्या वर्षीच्या दिवाळीत पुन्हा अनारशांवरून त्यांची आठवण आली. फोन करून सर्व रेसिपी लिहून घेतली. ठरवलं की आपण करायचेच. आईला फक्त सूचना दे म्हटलं. तीन दिवस तांदूळ भिजवून, सावलीत वाळवून मिक्सरमध्ये वाटून घेतले. आता गूळ टाकून ते पीठ भिजवण्याच्या आईनं सांगितलेल्या प्रमाणानुसार पीठ भिजवले. घरच्या पाणी पिण्याच्या ग्लासने वरवर गूळ न टाकता किसलेला गूळ दाबून दाबून भरला नि ग्लासाच्या पिठीत ओतून मळून घेतला. पीठ डब्यात भरले नि गरजेनुसार अनारसे तळायचे ठरवले. झालं, लक्ष्मीपूजनाची वेळ म्हणून दोन-तीन नैवेद्यांसाठी अगदी छोटे, छोटे अनारसे तव्यावरच तळले तेव्हा काहीच झाले नव्हते. जुजबी जमले. पण नंतर माहेराहून बहिणी आल्या आणि अनारसे एकदम दुराफे काकूसारखे बनवते म्हणून मी बनवायला घेतले. पांढऱ्या दाणेदार खसखसवर तासभर मान/पाठ दुखेपर्यंत पोळपाटावर थापून कढईत तेल कडकडीत गरम करायला ठेवले. उकळी आल्यानंतर एक-एक करून चार-पाच अनारसे सोडले. मात्र  अनारसा फुगायचा सोडून त्याला फोड येऊन सर्व तेल त्याच्यातून वर यायला लागले. अनारसे विरघळायला लागले. मनात आले, चार-पाच अनारसे टाकले, झाले असले पाहिजेत म्हणून एकच टाकून पाहिला. तोही तसाच झाला. हाॅलमध्ये सर्व अनारशांची वाट बघत बसले होते. पण आता सगळा कडक तळलेला गोळा घेऊन ताटात दाखवायला गेले तर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.

मधली बहीण म्हणाली,“असे कसे मिश्रण बनवले गं?” 
मी आपली बाजू मांडत बोलले,“माझी चूक नाही. जसे आईनेे सांगितले तसे केले.’ 
“अगं हो, पण मिश्रण सांग कसे घातले?” 
मी घाईघाईतच उत्तर दिले, “एक किलोला  पाव किलो गूळ.” 
“बरोबर आहे, मग चुकले कसे? गूळ जास्त झाला तो म्हणून विरघळतात.” बहिणीने अचूक निदान केलं. 
“हो, मी खूप दाबून दाबून भरला होता गूळ मापाच्या ग्लासात.’ मी आठवून  खरी चूक सांगितली. 
“मग बरोबर. विरघळतील नाहीतर काय? तो गूळ पिठीच्या वरच होईल ना... मोठीच सुगरणबाई गं तू!’ मिश्कीलपणे हसत बहीण बोलली.

“आता या पिठाचं काय करायचं?” असा प्रश्न मला पडला. कारण गूळ किती जास्त झाला हे पीठ जास्तीचं टाकूनही उमगायचा मार्ग नव्हता. आणि प्रयत्न केला असता तर मापाइतके न होऊन पुन्हा बिघडले गेले असते. 

शेवटी उत्साहभरातल्या आणि थोड्य अर्धवट ज्ञानाने पुरा विचका झाला. शेवटी ते पीठ गाईला चारून आईने  पुन्हा अनारसे करून दुराफे काकूंची आठवण आणून दिली होती. पण मला कधीच दुराफे काकूंसारखी सुगरण होता आले नाही आणि अनारशाला हात लावण्याची पुन्हा हिंमतही केली नाही. 

लेखिकेचा संपर्क - ८८८८३७९२३८ 
 
 
 

बातम्या आणखी आहेत...