आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नापू्र्वीची गोष्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्न ठरल्यापासून ते प्रत्यक्ष होईपर्यंतचा काळ हा प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ. प्रेमविवाह आणि नियोजित विवाह करणाऱ्यांच्या भावना वेगळ्या असू शकतात. पण हे दिवस पुन्हा कधीही अनुभवता न येण्यासारखेच.हे क्षण आणखी खास करण्यासाठी आता फोटोग्राफीतील एक नवा प्रवाह तरुणांना भुरळ घालतोय, तो म्हणजे प्री-वेडिंग फोटोग्राफी.लग्नापूर्वीची ही गोष्ट अनेक जण आपापल्या पद्धतीने आता रंगवू लागलेत. त्याविषयी... 

 

वेळ सकाळी साडेपाच. निसर्गरम्य ठिकाण. दोन उत्तम छायाचित्रकार, एक दिग्दर्शक, दोन सहायक आणि ज्यांची छायाचित्रं काढायची आहेत, ते अर्जुन आणि निशी (नावं बदललेली) उत्तम मेकअप करून तयार. निशीने यापूर्वी कधीही वनपीस घातलेले नव्हते. त्यात थंडी. ती थोडी अवघडलेलीच होती. दिग्दर्शक या दोघांना नेमकी कशी पोज द्यायची हे समजावून सांगत होता. सूर्यकिरणे येईपर्यंत दोघांना सराव करायचा होता. निशी हळूहळू मोकळी होऊन पोज देण्याचा प्रयत्न करत होती. अखेर सर्वांना हवी तशी सोनेरी किरणे झाडांच्या फांद्यांमधून येऊ लागली. निशी-अर्जुनने त्यांना हवी तशी पोज दिली... काही वेळाने या कोवळ्या प्रकाशात दुसऱ्या एका पोजमध्ये छायाचित्रकाराने ड्रोनच्या मदतीने काही दृश्यं आणि छायाचित्रं टिपली.

तासाभरात ठिकाण बदलले. बीबी का मकबरा. आग्रा येथील ताजमहालाची प्रतिकृती असलेल्या या मकबऱ्याच्या भव्य वास्तूसमोर स्लो मोशनमध्ये दृश्य चित्रित करायचे होते. टीमने पटापट पॅकअप केले. निशी आणि अर्जुनने दोन-तीन दिवसांपासून यू ट्यूबवरील व्हिज्युअल्स पाहून स्लो-मोशन दृश्यासाठी कसे धावत यायचे याचा उत्तम अभ्यास केला होता... मकबऱ्यासमोरील या शूटसाठीचे कपडे पारंपरिकच असल्याने निशी आरामात होती. अर्जुननेही थोडा सराव केला आणि दोघांचा हा सीनही शूट झाला. त्यानंतर शहरातील आणखी एक-दोन ठिकाणी शूट झाले. दोघांनाही मजा आली. दोघेही मध्यमवर्गातील असल्याने विवाहपूर्व (प्री-वेडिंग) शूट करायचे की नाही, यावर निर्णय होत नव्हता. लग्नासाठी असाही पाचेक लाख खर्च येणार आहे, मग वीसेक हजारांच्या शूटसाठी कशाला मागे-पुढे पाहायचे, असा विचार झाला आणि असे शूट करायचे ठरले.
निशी आणि अर्जुनसारखे अनेक लग्न ठरलेले जोडीदार आता प्री-वेडिंग शूटला चांगलेच महत्त्व देऊ लागले आहेत. उच्चभ्रू तरुण-तरुणींमध्ये हा ट्रेंड येऊन पाचेक वर्षं झाली असली तरी हळूहळू महाराष्ट्रातील लहान-मोठ्या गाव-शहरांमध्येही हा ट्रेंड रुजतोय. विशेषत: मागील दीड-दोन वर्षांत लग्न ठरलेल्या अनेक जोडप्यांनी अशी प्री-वेडिंग शूट करून घेतली आहे. 

 

कुणी मित्र-मैत्रिणींचे पाहिलेले असते, कुणी सोशल मीडियावरील फोटोवरून आपल्याही जोडीदारासोबत असे फोटो काढण्याचे स्वप्न रंगवलेले असते. तर लग्नाचे फोटो काढण्यासाठी छायाचित्रकार ठरवला जातो, तेव्हा हाच कलाकार त्यांना तुम्हीही उत्तम प्री-वेडिंग फोटोशूट करून घेऊ शकता, असे सांगत याबद्दल माहिती देतो.


औरंगाबादचे छायाचित्रकार विवेक शाक्य म्हणतात, “पुण्यामुंबईतील जोडप्यांसाठी प्री-वेडिंग शूट सहज असले तरी विदर्भ-मराठवाड्यात अजून यासाठी लोक तितके सराईत झाले नाहीत. पण या निमित्ताने नवरा मुलगा आणि मुलगी यांना परस्परांना जाणून घेण्याची एक संधी मिळते. जोडप्यांचा वेळ, हाताशी असलेला पैसा आणि हे करण्यातली सहजता यानुसार एक, दोन किंवा तीन दिवसांचे स्थानिक किंवा बाहेरगावचे शूट नियोजित केले जाते. प्रेमविवाहांमधील जोडपी एकमेकांना पुरेशी ओळखत असतात, पण ठरवलेल्या लग्नांमधील जोडप्यांना या निमित्ताने एकमेकांना ओळखण्याची ही उत्तम संधी असते. ही छायाचित्रं काढताना आम्ही पार्श्वभूमी किंवा कपड्यांना जास्त महत्त्व न देता भावनांना जास्त महत्त्व देतो. जोडप्यांना कधीकधी मोकळे करण्यासाठी आम्ही ‘विनोदी संकल्पना’ ठेवतो. कधी कधी वधूची तेवढी तयारी नसते आणि नवरा मुलगाही तितका मोकळा नसतो. त्यामुळे दोघांना सहज करण्याचे काम छायाचित्रकाराचे असते. प्री-वेडिंग शूट झाल्यावर मुख्य लग्न समारंभाचे फोटो काढतानाही जोडपं छायाचित्रकारासमोर अगदी सहजतेने वावरतं. त्यामुळे आयुष्यातील या महत्त्वाच्या क्षणांच्या आठवणीही तितक्याच सहज-सुंदरतेने टिपता येतात.”


लातूरचे शिरीष कुलकर्णी सांगतात, सध्या तरुण पिढीकडे वेळ खूप कमी आहे. त्यामुळे एक-दोन दिवसांच्या लग्नसमारंभात हवे तसे फोटो काढता येत नाहीत. त्यामुळे प्री-वेडिंग शूट हा उत्तम पर्याय आहे. जोडप्यांच्या वेळेनुसार, मोकळ्या जागी, नाशिक, पुण्यातील लवासा, लोणावळा, गोवा, अलिबागमध्ये शूटसाठी जातो. अशा फोटोसाठी ड्रोनचा वापरही आता सामान्य झाला आहे.
औरंगाबादच्या नेहाने २०१६मध्ये प्री-वेडिंग शूट केले होते. कपिल आणि नेहाच्या प्रेम-विवाहाची कहाणी सांगणारा हा व्हिडिओ यू ट्यूबवर हजार लोकांनी पाहिला आहे. अजूनही या दोघांना ‘तुमची प्रेमकथा खूपच रोमँटिक आहे’, अशा प्रतिक्रिया देणारे फोन येतात. स्मार्टफोनने प्रत्येकाच्या हाती टिकलीएवढा कॅमेरा आणून दिल्यामुळे आता छायाचित्रकारांचे दिवस गेले, अशी भीती काही वर्षांपूर्वी व्यक्त केली जात होती. पण छायाचित्रणाच्या क्षेत्रातही तितक्याच कलात्मकतेचे, प्रतिभेचे प्रयोग होऊ लागले आहेत. शिवाय अत्याधुनिक सुविधायुक्त कॅमेरे, ड्रोनसारख्या सुविधांमुळे मंगलप्रसंगी, आयुष्यातील काही खास क्षणांना फोटो आणि व्हिडिओग्राफीची क्रेझ आता आणखी वाढत जाईल, असेच चित्र आहे. नवरा-नवरी उच्चशिक्षित, कमावते असतील तर लाखो रुपये खर्चून, विदेशात हव्या त्या ठिकाणी, हव्या त्या रिझॉर्टमध्ये फोटोशूट करण्याची तयारीही अनेकांची असते. सध्या तरी १५ हजार रुपयांपासून हे प्री-वेडिंग शूट करून दिले जाते. त्यानंतर हौशी लोकांच्या मागणीनुसार, विदेशातही शूट करायचे असल्यास तीन ते चार लाखांपर्यंत शूटचे बजेट जाऊ शकते. काही वर्षांपूर्वी लग्नाआधी मुला-मुलीच्या भेटण्यावरही बंधनं होती. हळूहळू ती कमी होत गेली. ठरवलेल्या लग्नांमध्येही आता दोन्ही घरांतील कुटुंबीय मुला-मुलीला बोलण्यासाठी, परस्परांना समजून घेण्यासाठी वेळ देतात. हल्ली लग्न ठरल्यावर साखरपुडा आणि लग्नातही तीनपेक्षा जास्त महिन्यांचे अंतर ठेवले जाते, जेणेकरून दोघांना एकमेकांचे स्वभाव कळतील. अनेक घरांतून आता प्री-वेडिंग शूटलाही मान्यता मिळत आहे. त्यामुळे प्री-वेडिंगकडे आपल्या जोडीदाराला समजून घेण्याची एक संधी म्हणून पाहण्यास हरकत नाही.

 

छायाचित्रकार निवडताना...
लग्नापूर्वीचे आयुष्यातील महत्त्वाचे क्षण खास करण्याची इच्छा अनेकांची असते. त्यासाठी पैसेही खर्च करण्याची तयारी असते. पण हे क्षण टिपण्याकरिता आपण जो छायाचित्रकार निवडतो आहोत, त्याचे काम नीट पारखून घेणे आवश्यक आहे. त्याने यापूर्वी केलेले फोटोशूट पाहावे. फार तर आधी पाच-दहा फोटोचे पॅकेज करून पाहावे. नंतरच छायाचित्रकार निश्चित करावा. एकदा काम आवडल्यास प्री-वेडिंग, वेडिंग आणि हवे असल्यास पोस्ट वेडिंगचे फोटोही एकाच छायाचित्रकारकडे देऊ शकतो.

 

बातम्या आणखी आहेत...