आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैदानावरील सुवर्णकन्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंजिरी काळवीट   

सरत्या वर्षात भारतीय खेळाडूंची मैदानावरील कामगिरी पाहता, पुरूषांच्या तुलनेत महिला खेळाडूंनीच बाजी मारली. विशेष म्हणजे खेळाप्रति निष्ठावान राहतानाच काही खेळाडूंनी परंपरेच्या चौकटी मोडत, असमानतेवर हल्ला करत समाजभान राखले. त्यामुळे माणूसपणाच्या विकासप्रक्रियेत त्यांचा उल्लेख सर्वात आधी करावा लागेल. मैदानावरील या सुवर्णकन्यकांनी केलेल्या कामगिरीचा हा संक्षिप्त आढावा…
लैंगिक भावनांशी प्रामाणिक असणं, त्या मान्य करणं आणि जगासमोर मोठ्या दिलानं त्या जाहीर करणं... हे धाडस भल्याभल्यांना करता येत नाही. त्यात जर संबंधित व्यक्तीचं नाव गाजलेलं असेल, तिच्या नावाला एक प्रकारचं यशाचं, कीर्तीचं वलय असेल तर वैयक्तिक गोष्टी शक्यतोवर उजेडात न आणण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक शर्यतींमध्ये विक्रम नोंदवणाऱ्या धावपटू द्युती चंदने आपल्या लैंगिकतेबाबत केलेला खुलासा हा २०१९ या वर्षात महिला क्रीडा विश्वात सर्वाधिक गाजलेला मुद्दा! शरीरातील ठराविक हार्मोन्समुळे चारेक वर्षांपूर्वी ‘पुरुषी’ असल्याचा आरोप होऊन स्पर्धेतूनच बाद ठरवल्या गेलेल्या द्युती चंदने लढलेली न्यायालयीन लढाई सर्वश्रुत आहेच. आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर पात्रतेची ही लढाई जिंकणाऱ्या द्युती चंदने सप्टेंबर २०१९ मध्ये आपण समलैंगिक असल्याचे जाहीरपणे सांगितले. अशा प्रकारे समलैंगिक संबंध मान्य करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली.ओडिशातील जाजपूर जिल्ह्यातील चाका गोपालपूर गावात एका विणकराच्या घरी जन्मलेल्या द्युतीसाठी जागतिक पातळीवरील धावपटू होण्याचा प्रवास अत्यंत रोमहर्षक आहेच. पण स्वत:च्या भावनांशी एकनिष्ठ राहत, भविष्यात उद्भवणाऱ्या कौटुंबिक, सामाजिक परिणामांची पर्वा न करता लैंगिकतेबाबत अधिक स्पष्टता आणण्यापर्यंतचा प्रवासही तितकाच कठीण असेल, हे लक्षात घ्यायला हवे. द्युती चंदने केलेलं हे वक्तव्य एलजीबीटी समूहांच्या चळवळींना आश्वस्त करणारं ठरलं. त्यामुळेच व्होग इंडियानं तिला २०१९ मधील ‘स्पोर्ट‌्स वुमन ऑफ इंडिया’ चा किताब दिला. तसेच ‘बीकन ऑफ होप’ म्हणून तिचा गौरव करत व्होगच्या मुखपृष्ठावर तिचं छायाचित्रही प्रकाशित झालं. अवघ्या २३ वर्षाच्या द्युतीने इटलीत झालेल्या जागतिक युनिव्हर्सिटी गेम्समध्ये १०० मीटर शर्यतीचे सुवर्णपदक स्वत:च्या नावावर केले. ११.३२ सेकंदाच्या वेळेत ही कामगिरी करत तिने स्वत:चाच विक्रम मोडीत काढला. या जागतिक स्पर्धेत १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक मिळवणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली.अकस्मात झालेल्या अपघातानंतरही बॅडमिंटनमध्येच करिअर करण्याचं स्वप्न उराशी बाळगून जगासाठी प्रेरणादायी ठरलेल्या अहमदाबादच्या मानसी जोशीनेही २०१९ मध्ये उत्तुंग कामगिरी केली. स्वित्झर्लंड येथे ऑगस्ट महिन्यात झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पॅरा बॅडमिंटनमध्ये तिने सुवर्णपदक पटकावले. विशेष म्हणजे या क्षेत्रात ती ज्या खेळाडूला आदर्श मानत होती, त्याच पारुल परमार हिचा सामना तिला या स्पर्धेत करावा लागला. हा सामना अत्यंत रोमांचक ठरला. सामान्य खेळाडूंना ज्याप्रमाणे प्रोत्साहन आणि आर्थिक पाठबळ दिलं जातं, तसे प्रयत्न दिव्यांग क्रीडापटूंसाठीही व्हावे, अशी अपेक्षा मानसीने माध्यमांसमोर व्यक्त केली. जर्मनीतील म्युनिच येथे मे महिन्यात झालेल्या विश्वचषकात कोल्हापूरच्या नेमबाज राही सरनोबत हिने सुवर्णपदकाची कमाई करत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. पुढील वर्षात टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरलेली एकमेव कुस्तीपटू विनेश फोगट हिनेही सरत्या वर्षात उत्तम कामगिरी केली. पोलंड तसेच आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत तिने सुवर्णपदकं पटकावली. नेमबाजीत जगज्जेतेपदापर्यंत पोहोचलेल्या कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंतसाठी २०१९ हे वर्ष एका मोठ्या संधीचं द्वार उघडणारं ठरलं. आशियाई नेमबाजी स्पर्धेतून ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात तिने अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेत तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले असले तरी पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिचा भारताच्या संघात समावेश होईल. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर कितीही पदकं मिळवली तरी सर्वाधिक कस लागणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वस्व आजमावून पाहण्याचं स्वप्न प्रत्येक खेळाडूचं असतं. नवीन वर्षात तेजस्विनीला ही संधी मिळेल. तसेच आयएसएसएफ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक मिळवणाऱ्या मनू भाकरची कामगिरीही कौतुकास्पद ठरली. अशा प्रकारे क्रीडा क्षेत्र म्हणजे क्रिकेट या समीकरणाला फाटा देत विविध स्पर्धांचं स्थान नव्याने अधोरेखित करण्यात भारतीय महिला खेळाडू यशस्वी ठरल्या. पण याच वेळेला क्रिकेट म्हणजे केवळ सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली हे पुरुषी चित्र पालटण्यासही अनेक महिला क्रिकेटपटूंनी योगदान दिलं. यात प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल ते मिताली राज, हरप्रीत कौर, स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉडरिक्सचे. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम स्वत:च्या नावे नोंदवणारी, पद्मश्री व अर्जून पुरस्कारविजेती भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कफ्तान मिताली राज फेब्रुवारी २०१९ मध्ये २०० एकदिवसीय सामने खेळणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. क्रिकेटमध्ये एकानंतर एक विक्रम मोडीत काढणाऱ्या मिताली राजच्या कामगिरीत मात्र या वर्षी थोडेसे नकारात्मक वळण मिळाले. मितालीने अचानकपणे टी-२० सामन्यांतून निवृत्ती घेतली. पण यामुळे एकदिवसीय सामान्यांमध्ये अधिक लक्ष केंद्रित करता येईल, अशी आशा केली जातेय. संपूर्ण देश जेव्हा पुरुषांच्या क्रिकेटकडे लक्ष लावून बसला होता, तेव्हा अत्यंत एकनिष्ठतेने क्रिकेटचा सराव करणाऱ्या ऑलराउंडर हरप्रीत कौरची कामगिरीही महिला क्रिकेटसाठी उल्लेखनीय ठरते. टी-२० मध्ये पहिले शतक पूर्ण केल्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. तसेच २०१९ मध्ये सर्वाधिक २०० टी-२० सामने खेळल्याचा मानही तिला मिळालाय.ढिंग एक्स्प्रेस...


खेळात यश संपादन करण्याचा ध्यास घ्यावा, ध्येयाच्या दिशेने सुसाट धावत सुटावे अन् अफाट मेहनतीनंतर एकाएकी यशरूपी सुवर्णमुद्रांची बरसातच व्हावी, हे क्षण यंदाच्या जुलै महिन्यात अनुभवले, आसामच्या हिमा दासने. गोल्डन गर्ल, ढिंग एक्स्प्रेस नावाने ओळखल्या जाणाऱ्या हिमाने जुलै महिन्यात २० दिवसांच्या कालावधीत एकानंतर एक अशी पाच सुवर्णपदके पटकावली. क्रिकेटच्या भव्यदिव्य झगमगाटातही अॅथलेटिक्समध्ये स्वत:चा एक लख्ख प्रकाश निर्माण केला. पोलंड आणि चेक रिपब्लिक येथे काही दिवसांच्या अंतराने झालेल्या स्पर्धांमध्ये पाच सुवर्णपदकं मिळवूनसुद्धा सप्टेंबरमधील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये हिमाला सहभाग घेण्याची संधी हुकली. पण ज्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले, त्या स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात निम्न स्तरावर समजल्या जातात. त्यामुळे हिमाला आणखी बरीच मेहनत करावी लागणार, हे सत्यही या वर्षातील तिच्या कामगिरीनंतर अधोरेखित झालं. २०१६मध्ये जकार्तामध्ये झालेल्या या स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. त्या वेळी स्पर्धेच्या रौप्यपदकापर्यंत जाणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती.
एकूणच, क्रिकेटपासून कुस्ती, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स, नेमबाजी आणि इतर क्रीडा प्रकारांमध्ये महिला खेळाडूंची कामगिरी दिवसेंदिवस अधिक उल्लेखनीय होत जात आहे. गरज आहे, त्यांच्यातील कौशल्याला अधिक प्रोत्साहन देण्याची. क्रीडा क्षेत्रातही खेळाडूंना मिळणाऱ्या प्रोत्साहनाचा, मानधनाचा, सोयी-सुविधांचा विचार करता इथेही महिला व पुरुष खेळाडूंमध्ये प्रचंड असमानता असल्याचे दिसून येते. साधं क्रिकेटचंच उदाहरण घ्यायचं झालं तर मिताली राज आणि विराट कोहली यांच्या वेतनातील फरक पाहता येईल. क्रिकेटप्रमाणेच प्रत्येक खेळात ही असमानता दिसून येते. यात प्रचंड धोरणात्मक सुधारणा अपेक्षित आहेत. मुळात महिलांनी एखाद्या खेळात करिअर करायचं म्हटल्यावर तिचा लढा कुटुंबीयांना समजावून सांगण्यापासून सुरू होतो. त्यानंतर स्वत:तील कौशल्य विकास, साधन-सुविधा, पूरक आहार, योग्य प्रशिक्षक ही आव्हानं पुढे असतात. या सर्वांवर मात करत भारतीय महिला खेळाडू आगेकूच करत आहेत. सरत्या वर्षाच्या साक्षीने सध्या मैदान गाजवणाऱ्या आणि भविष्यात चमकदार कामगिरीच्या आशेने मैदानावर घाम गाळणाऱ्या भारतीय कन्यांना नववर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!

बातम्या आणखी आहेत...