आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्रिधारा’चं पुढचं पाऊल...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंजिरी काळवीट

स्त्रियांच्या वैवाहिक स्थितीवरून त्यांचं समाजातलं स्थान ठरू नये. मात्र दुर्दैवानं परिस्थिती याउलट आहे. विवाहित स्त्रियांना मानसन्मान दिला जातो. पण विधवा, एकल, घटस्फोटित, ट्रान्सजेंडर महिला टीकेच्या धनी असतात. महाराष्ट्रात अलीकडे विधवांनाही सन्मानानं जगता यावं यासाठी समारंभ आयोजिले जाताहेत. मात्र हे प्रमाण अत्यल्प आहे. अशा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकणाऱ्या कोलकात्याच्या ‘त्रिधारा संमेलिनी’च्या या अभिनव उपक्रमाबद्दल....
 
अवघ्या पंचविशीची दीपश्री. नातेवाइकांनी केलेली फसवणूक आणि घरच्या गरिबीमुळे ती वेश्याव्यवसायात ढकलली गेली. परतीचे सर्व मार्ग बंद झाले हे तिनं स्वीकारलं होतं. मात्र सण-उत्सवाच्या काळात इतर स्त्रियांकडे पाहून ती नाराज होई. वेश्येच्या ज्या अंगणातली माती घेऊन दुर्गादेवीची मूर्ती साकारली जाते त्या दुर्गेच्या सभामंडपात मात्र दीपश्रीला यायला मनाई होती. शिवाय इतर उत्सवांतही सहभागी होण्यासाठी कधी कुणी बोलावलं नव्हतं. मात्र २०१६-१७ ला ‘त्रिधारा संमेलिनी’च्या गार्गी मुखर्जी, देबाशिष कुमार यांनी पाठवलेली ‘सिंदूर खेला’ आमंत्रणाची पत्रिका पाहून दीपश्रीचे डोळे पाणावले. दुर्गेच्यासभामंडपात “त्रिधारानं’ ज्या सन्मानाची वागणूक देत दीपश्रीला ‘सिंदूर खेला ’ मध्ये सहभागी करून घेतलं तो आनंद शब्दातीत असल्याचं दीपश्रीनं फोनवरून बोलताना सांगितलं.

कोलकात्यामधल्या ‘त्रिधारा संमेलिनी’  स्वयंसेवी संस्थेचा असा अनुभव केवळ दीपश्रीनंच घेतला असं नाही. वेश्याव्यवसायात ढकलल्या गेलेल्या तिच्यासारख्या अनेक महिला, विधवा, ट्रान्सजेंडर आणि एकल महिलांचाही असाच अनुभव आहे. बंगाली समाजबांधवांमध्ये विशेष महत्त्व असणाऱ्या ‘सिंदूर खेला’ उत्सवात या सगळ्या जणींना मानानं बोलावलं जातं. विवाहित स्त्रियांना दिली जाणारी वागणूक, मानसन्मान या वर्गातल्या महिलांनाही दिला जातो. १९४७ पासून सामाजिक कार्यात सक्रिय ‘त्रिधारा संमेलिनी’नं सुरू केलेल्या या अभिनव उपक्रमाचं हे चौथं वर्ष आहे. ही संस्था दरवर्षी विविध संकल्पना घेऊन दुर्गोत्सव साजरा करते. या वर्षीची त्रिधाराची संकल्पना होती, दृष्टिकोन. याबद्दल बोलताना संस्थेचे सरचिटणीस देबाशिष कुमार म्हणतात, हम कहते हंै कि अखबार में अच्छी खबरे नहीं छपती. लेकिन मैं ये मानता हूँ कि इसके हम सब जिम्मेदार हैं. अगर नारी का सन्मान किया जाता तो शायद अखबार अच्छी खबरों से भरा होता. हम लोग अपने अंदर झाँककर देखते ही नहीं. हर नारी मंे दुर्गा होती है. सवाल सिर्फ नजरिए का है’ हे सांगतानाच ही अनोखी संकल्पना हे टीमवर्क असल्याचं नमूद करायला ते विसरत नाहीत. संस्थेच्या माध्यम प्रमुख गार्गी मुखर्जी यांच्याशीही या निमित्तानं बोलण्याची संधी मिळाली. या आगळ्यावेगळ्या सिंदूर खेलाबद्दल त्या म्हणतात, ‘पहले साल का अनुभव मंै भूल नही सकती. दीपश्री, ट्रान्सजेंडर विद्या, सिंगल मदर शेफाली ऐसी अनेक सहेलियों के चेहरे की खुशी उस दिन देखते बन रही थी. ६५ साल की विधवा अरुणाजी ने सिंदूर खेलने के बाद मुझे गले लगाया था. मेरे सिर पर हाथ रख कर मुझे आशीर्वाद दिया था. भगवान अगर अपने बच्चो में फर्क नहीं करती तो हम क्यंू करे? और हम महिलाएं ही महिलाओं मे अंतर रखने लगे तो कैसे चलेगा?’ म्हणत समस्त स्त्री वर्गाला त्यांनी विचारलेला प्रश्न विचार करायला लावतो.  

महाराष्ट्रातही सांगलीच्या आवळाईमधील लता बोराडेंनी विधवा महिलांसाठी हळदी-कुंकवाचं आयोजन केलं होतं. गेल्या दीड-दोन वर्षात राज्यात अनेक ठिकाणी असे प्रयोग होताना दिसतात. मात्र हे प्रमाण अगदीच नगण्य आहे. ज्या सामाजिक बदलाच्या उद्देशानं हे पाऊल उचललं जातंय त्याचं सार्वत्रिकीकरण झालं तरच प्रयोग यशस्वी झाला, असं म्हणता येईल. के‌वळ कायदे करून समाजात बदल घडून येत नसतात. लोकांची मानसिकता, सुधारणांचा स्वीकार करण्याची तयारी, त्याला अनुसरून कृती हे घटक त्यासाठी कारणीभूत असतात. सतीसारख्या कुप्रथेविरोधात मानहानी, अवहेलना सोसूनही सुधारणेसाठी ठाम उभे राहिलेल्या राजा राममोहन रॉय यांच्या वारसदारांनी त्या दिशेनं पाऊल पुढे टाकलंय. प्रामाणिकता, स्वातंत्र्य,  आणि पारदर्शितेसारख्या तत्त्वांना बांधील राहून काम करणाऱ्या अशा असंख्य ‘त्रिधारा संमेलिनीं’ची आज आवश्यकता आहे...

लेखिकेचा संपर्क : ८४२१२१७८६६

बातम्या आणखी आहेत...