Home | Magazine | Madhurima | Manjiri Kalvit writes about When there is rain in a thirsty country!

तहानलेल्या देशात पाऊस येतो तेव्हा!

मंजिरी काळवीट, | Update - Jun 11, 2019, 12:20 AM IST

दैवानं दुष्काळ नशिबात लिहिला, पण भाग्य बदलण्यासाठी चेतनारूपी लक्ष्मीला माणदेशात पाठवले

 • Manjiri Kalvit writes about When there is rain in a thirsty country!

  दैवानं दुष्काळ नशिबात लिहिला, पण भाग्य बदलण्यासाठी चेतनारूपी लक्ष्मीला माणदेशात पाठवले. रुक्षतेतही उभी राहण्याची ताकद प्रत्येक महिलेत होती. तिला आर्थिक, नैतिक पाठबळ देत स्वावलंबी बनवण्याचं शिवधनुष्य पेललं माणदेशी फाउंडेशनच्या चेतना सिन्हा यांनी. गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या उद्योग व अर्थ साक्षरता चळवळीचा हा विशेष वृत्तांत...

  काही लोक आयुष्यात भेटतात, पण काही लोक भेटल्यामुळे आयुष्य भेटतं, ही म्हण तंतोतंत खरी ठरते, जेव्हा सातारा जिल्ह्यातील चेतना सिन्हा यांनी उभारलेलं उद्योगिनींचं आगळं-वेगळं अर्थविश्व उलगडतं. साताऱ्यातील माण तालुका हा कायम दुष्काळानं ग्रासलेला, आयुष्य होरपळलेला भाग. पण आज माण परिसरातील म्हसवड, दहिवडी, आटपाडी आदी जवळपासच्या गावांमधील लघुउद्योग करणारी महिला उत्तमोत्तम कॉलेजमध्ये उद्योग व्यवस्थापनाचे धडे घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श ठरते. येथील असंख्य उद्योजिकांना मुंबई, पुणे, बंगळुरू, दिल्ली, एवढंच नाही तर लंडन येथूनही यशस्वी उद्योगाचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडण्यासाठी बोलावले जाते. इथली दहावी पास रूपाली शिंदे पदवीधर महिला-मुलींना डिजिटल लिटरसीचं ट्रेनिंग देते, ग्रामीण भागातील निरक्षर महिलांनाही ऑनलाइन व्यवहार करायला शिकवते. नववी नापास वंदना पिसे बचत गटाच्या माध्यमातून एक महिलांचं एक भलं मोठं नेटवर्क उभं करतात अन् यातील प्रत्येकीला स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन देतात. उद्योगिनींच्या वाटेत आलेली संकटं स्वत:वर ओढवून घेत, याही परिस्थितीला धैर्यानं सामोऱ्या जातात. चौथी पास, नऊवार नेसलेल्या केराबाई कम्युनिटी रेडिओद्वारे महिलांना स्वावलंबन, शिक्षण, आरोग्य, कुटुंब व्यवस्थापन, बचत, आर्थिक नियोजन या विषयांवर जगजागृती करतात. कुणी गावातला लहानसा भज्यांचा गाडा चालवत हळूहळू तो वाढवतेय, पुढच्या वर्षी मोठं हॉटेल टाकण्याचं स्वप्न पाहतेय, तर कुणी ढोल-डमरू तयार करण्याच्या उद्योगाला देश-विदेशात पोहोचवण्याचा विचार करतेय. शिवणकाम, ब्यूटी पार्लर, हस्तकलेच्या वस्तू बनवणाऱ्यांच्या हातातही खुळखुळणाऱ्या पैशानं त्यांचा आत्मविश्वास उंचावलाय. माणदेशातील या महिलांच्या आयुष्याला परिसस्पर्श लाभला तो चेतना सिन्हा यांचा. माणदेशी महिला बँक व माणदेशी फाउंडेशनने केलेल्या अफाट कामामुळे या दुष्काळी भागातील प्रत्येक महिला उद्योजकतेची स्वतंत्र यशोगाथाच ठरते.

  चेतनारूपी लक्ष्मीने उजळली गावं
  साधारण २३ वर्षांपूर्वी माणमधील म्हसवड येथील विजय सिन्हा यांच्या घरात पत्नी म्हणून प्रवेश झाला अन् तालुक्याला चेतनारूपी लक्ष्मीचा वरदहस्त जणू लाभला. हंडाभर पाण्यासाठी मैलोन् मैल पायी फरपट करणारी, घरी आल्यानंतरही संसारासाठी मोलमजुरी करत पै-पै जमवणारी इथली निरक्षर महिला पाहिली अन् मुंबईत फायनान्समध्ये पदव्युत्तर झालेल्या चेतना यांनी बचतीची इच्छा असलेल्या महिलांसाठी त्यांच्या मदतीने माणदेशी महिला सहकारी बँकेची स्थापना केली.

  अंगठाबहाद्दरणी ते बँक बोर्डाच्या सदस्या
  माणदेशी महिला सहकारी बँक स्थापन करण्याची कथाही मोठी रंजक आहे. चेतना सिन्हा आरबीआयच्या नियमांनुसार म्हसवडमधील महिलांना हाताशी घेत सहकारी बँक स्थापन करण्याची फाइल तयार केली. बँकेच्या बोर्ड सदस्यांचे अंगठ्यांचे ठसे पाहून आरबीआयने चेतना यांना माघारी पाठवले. ज्या बँकेच्या सदस्यांना धड स्वाक्षरीही करता येत नाही, अशा सदस्यांच्या मदतीने बँक कशी स्थापन होणार, असा सवाल करण्यात आला. हे भले मोठे प्रश्नचिन्ह घेऊन चेतना भाभी म्हसवडला परतल्या. पण एवढ्याशा अडथळ्यासमोर हार मानतील, त्या माणदेशी महिला कसल्या? ‘अगं पुढच्या सहा महिन्यंात आम्ही पूर्ण साक्षर होऊ, तू काळजी करू नकोस,’ असा धीर चेतना भाभींना दिला.

  माणदेशी महिलांची ही जिद्द सहा महिन्यांतच फळास आली. शिकलेल्या सदस्यांची ही पलटण थेट दिल्लीत आरबीआयच्या कार्यालयात धडकली. ‘एखाद्या रकमेवरील व्याज, चक्रवाढ व्याज आदी हिशेब तुमच्या अधिकाऱ्यांनी आमच्या बरोबरीने कॅल्क्युलेटरविना करावा,’ असे चॅलेंज देण्यात आले. दोन-अडीच तासांच्या परीक्षेनंतर बँकेला परवानगी मिळाली. निरक्षर महिलांची ही जिद्द चेतना यांनाही हजार हत्तींचे बळ देणारी ठरली.

Trending