आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निर्भया खंबीर, समाजाची साथ हवी!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना नुकत्याच उघडकीस आल्या. घरगुती अथवा सार्वजनिक ठिकाणी हिंसाचाराविरोधात जागोजागी मुली/महिला आवाज उठवू लागल्यात. पण कायदेशीर पातळीवर, राजकीय दबावाशी लढताना ‘समाज’ म्हणवल्या जाणाऱ्या यंत्रणेकडून त्यांना भक्कम पाठिंब्याची गरज आहे.


वडिलांचा मृत्यू आणि भोळसर आई बेपत्ता झाल्याने अनाथ झालेली पोर. आजीने एका निवासी शाळेत शिकायला ठेवले. तिसरी-चौथीतली पोर उन्हाळ्याच्या सुटीत मावशीच्या गावाला जाते. मावशीचा नवरा त्या निरागस पोरीवर बलात्कार करतो. या आघातातून कशीबशी सावरत, पोर घडला प्रकार मावशीला सांगते. मावशीचा प्रचंड मनस्ताप होतो. नवऱ्याविरुद्ध बोलावं तर संसार उघड्यावर पडणार. इकडे लेकीवरील अत्याचाराने मन पिळवटून जाते. शेवटी आईला सांगते, पोरीला पुन्हा माझ्या घरी पाठवू नको. काही दिवस कुटुंबियांच्या प्रेमाखातर गेलेली पोर पुन्हा शाळेत दाखल होते. पण काही दिवसांनी शाळेतील वासनांध शिक्षकच तिच्यावर हात टाकतो. याची कुणकुण लागल्यावर दुसरा शिक्षकही मुलीवर अत्याचार करतो. जाब विचारणारे कुणीही नाही पाहून शाळेतला शिपाई, सुरक्षा रक्षक, शेतात काम करणारे मजूर असे एकानंतर एक तब्बल पाच-सहा जण मुलीवर अत्याचार करून अक्षरश: तिच्या शरीराची चाळणी करून टाकतात. घडल्या प्रकाराने प्रचंड भेदरेलेली पोर सर्व प्रकार अखेर आजीजवळ सांगते. आजी शाळेत तक्रार करते, तेव्हा हे असे प्रकार शाळेत सर्रास घडतात, हे सत्य उजेडात येते. तक्रारीनंतर यातील पाच जणांना अटक होते. जानेवारीत उघडकीस आल्यानंतर अजूनही चौकशी, अहवालांच्या फेऱ्यात अडकलेला हा अत्यंत संतापदायक प्रकार. उज्ज्वल भविष्याकरिता ज्या ‘ज्ञानमंदिरात’ मुला-मुलींना शिकवण्यासाठी पाठवले जाते, त्याच शाळा व्यवस्थापनातील ही वासनांध पुरुषी विकृती. आजीच्या तक्रारीने या अत्याचाराला वाचा फुटली,पण इतर किती कोवळ्या लेकींनी हा अत्याचार मूकपणे सहन केलाय याची मोजदादच नाही. उस्मनाबाद जिल्ह्यातील एका गावातील ही घटना.

 

अन्य एका घटनेत जिल्हा परिषद शाळेतील सहावी,सातवी आणि आठवीच्या २०-२१ जणींचा ग्रुप. शाळेतील पहिलीच्या वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षिकेला एकत्र येऊन घेरतात. मॅडम, आम्हाला काहीतरी सांगायचंय. फक्त तुम्हीच ते समजू शकता, असं म्हणून शिक्षिकेला बाजूला नेतात. मॅडम, ‘मुख्याध्यापक सर आमच्या अंगाला कुठेही हात लावतात, मागे मानेवरून हात फिरवतात, तोंडाजवळ तोंड आणून बोलतात, शिव्या तर इतक्या घाण देतात की, पुन्हा त्यांच्या तोंडाकडे पाहण्याची इच्छाच होत नाही. तू किती सुंदर दिसतेस, आता तू लग्नाची झालीस असे म्हणतात, खांद्यावरची ओढणी काही कारणाने ओढून घेतात, त्यांचा तास नसतानाही काहीतरी कारण काढून वर्गावर येतात आणि खेटून खेटून बोलतात, आम्हाला हे शिक्षक शाळेत नकोत मॅडम, तुम्ही काहीतरी करा...’ जून महिन्यात शाळा सुरू झाल्यापासून हे असंख्य प्रकार झेलणाऱ्या मुली तब्बल नऊ महिने त्रास सहन केल्यावर एकत्र आल्या. मुलींनी सांगितलेले आणि इथे उल्लेखही करता येणार नाही, असे प्रसंग ऐकून शिक्षिका अस्वस्थ झाल्या. आपण काहीतरी नक्की करू, असा दिलासा मुलींना दिला आणि वर्गाकडे चालू लागल्या. पण शिक्षिकेला गेल्या नऊ महिन्यातील त्यांना खटकलेले असे अनेक दृश्य, प्रसंग आठवू लागले. शाळेत दोनच शिक्षिका, पण अनेकदा मोठ्या मुलींच्या वर्गाकडे त्यांना फिरकू दिले जात नाही, याची कारणेही उलगडू लागली. मुलींनी आज एकत्र येत आपल्यासमोर बोलण्याची हिंमत दाखवली, हे धाडस कदाचित आपल्यालाही जमले नसते, असे वाटून गेले. पण मुलींनी एकत्र येत दाखवलेल्या हिंमतीपायी विकृत मनोवृत्तीच्या मुख्याध्यापकाचे चाळे उघड झाले. औरंगाबाद जिल्ह्यातील नुकतीच उघडकीस आलेली ही घटना.

 

मुली खंबीर होतायत, त्यांचं म्हणणं मांडायलाही पुढे येत आहेत. पण समाज मात्र तोच आहे. बुरसटलेल्या विचारांचा. अन्यायाला वाचा फोडल्यावर सध्या फक्त सत्य उजेडात येतं. अनेक प्रकरणांमध्ये इथवरच ही प्रक्रिया खुंटते. राजकीय ताकदीमुळे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न होतात, अनेकदा कोणी नंतर त्यावर बोलतही नाही. ये रे माझ्या मागल्या अशी परिस्थिती तयार होते. अशा वेळी ठिकठिकाणच्या निर्भयांच्या पाठीशी पालकांनी, समाजाने भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे.

 

या विषयावर वर्तमानतत्रं, सोशल मीडिया, दूरचित्रवाणी आदींवर होत असणाऱ्या चर्चेमुळे हिंमत येऊन मुली बोलू लागल्या आहेत, हे चांगलं चिन्ह आहे. आता आपण पालक/शिक्षक/कुटुंबीयांनी त्यांचं ऐकायला हवं. आणि एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून न देता त्यांच्यात हा विश्वास निर्माण करायला हवा की, आपण त्यांच्यासोबत आहोत. त्यांची तक्रार कोणाविरुद्धही असेल, ती व्यक्ती कितीही मोठ्या अधिकाराचा/वयाचा/नात्यातला असेल त्याला जाब विचारणं, आपलं पहिलं कर्तव्य आहे. तक्रार करणाऱ्या मुलीवर विश्वास ठेवणं, तिच्यासोबत जे घडलंय ते चूक आहे पण त्यात तिची काही चूक नाही हे मान्य करणं, महत्त्वाचं आहे. मुली खंबीर होऊ लागल्या आहेत, फक्त समाजाची साथ हवी आहे!

 

बातम्या आणखी आहेत...