आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Manmohan Singh Lied About Article 370; Congress Vote Against Article, BJP In charge Bhupendra Yadav Criticized

मनमोहन कलम ३७० प्रकरणी खोटे बोलतात; काँग्रेसचे विरोधात मतदान, भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव यांची टीका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रकांत शिंदे 

मुंबई - ‘कलम ३७० हटवण्याबाबत झालेल्या मतदानात काँग्रेसने समर्थनार्थ मत दिले हाेते, हेे दोन वेळा पंतप्रधानपद भूषवणाऱ्या डाॅ. मनमोहन सिंग यांचे वक्तव्य म्हणजे खोटारडेपणाचा कळस आहे,’ अशी प्रतिक्रिया भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. राज्यात महायुतीचे सरकार दोन तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत मिळवून सत्तेवर येईल, असा दावाही त्यांनी केला.
 

प्रश्न : तुम्ही म्हणता काँग्रेसने ३७० च्या विरोधात मतदान केले, परंतु मनमोहन सिंग म्हणतात, अाम्ही तर बाजूने मतदान केले...
यादव : त्यांनी काय म्हटले ते मी ऐकले नाही, परंतु ते जर असे म्हणत असतील तर ते पूर्णपणे खोटे बोलत आहेत. राज्यसभेत ३७० हटवण्याबाबत बिल मतदानाला आल्यानंतर त्याला ३७० मते मिळाली आणि विरोधात ७० मते होती. काँग्रेसचे लोकसभेत ५२ खासदार आहेत. या बिलाच्या समर्थनार्थ अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टी, बसप, सपा, नागालँड पीपल्स पार्टी, वायएसआर रेड्डी यांच्यासह बहुतेक पक्षांनी मतदान केले होते. जर काँग्रेसनेही बिलाच्या समर्थनार्थ मतदान केले असते तर हा आकडा ४२२ च्या पुढे गेला असता. काँग्रेसच्या काही खासदारांनी समर्थन दिले असेल, परंतु संपूर्ण काँग्रेसने समर्थनार्थ मतदान केले हे दोन वेळा पंतप्रधानपदी राहिलेल्या मनमोहन सिंग यांचे वक्तव्य म्हणजे खोटेपणाचा कळस आहे.

प्रश्न : राज्यातील जागावाटपाचा तिढा कसा सोडवला?
यादव : काही तिढाच नव्हता. लोकसभेच्या वेळेसच जागावाटपाचीही चर्चा झाली होती. फक्त काही जागांची अदलाबदल करण्याचा मुद्दा होता त्यावरच जरा जास्त चर्चा झाली. बाकी जागावाटप अत्यंत सुलभतेने आणि दोन्ही पक्ष नेत्यांच्या मर्जीनेच झाले.  मला फारशी मेहनत घ्यावी लागली नाही.

प्रश्न : राज्यात महायुतीची सत्ता येणारच, असा तुमचा दावा अाहे. मग पंतप्रधानांसह अनेक नेत्यांच्या प्रचार सभा का?
यादव : ही निवडणूक आहे. ती युद्धाप्रमाणे लढायची असते. निवडणुकीत काहीही सोपे नसते. विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला सर्व प्रकारच्या साधनांचा वापर करावा लागतो. भाजप हा आता नव्या पिढीतील पक्ष आहे आणि विजय मिळवण्यासाठीच आम्ही सर्वतो प्रयत्न करतो. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर केंद्रासहित सर्व राज्यातील निवडणुकांसाठी आमची हीच स्ट्रॅटेजी आहे. त्यात नवीन काही नाही.

प्रश्न : राज्यात भाजपला विधानसभा निवडणुकीत किती जागा मिळतील?
यादव : देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात खूप चांगले काम केले अाहे. शेतकरी कर्जमाफी ते पायाभूत सुविधांपर्यंत अनेक चांगली कामे केलेली आहेत. जनताही त्यांच्या कामावर आनंदी असल्याने राज्यात महायुती २१० पेक्षा जास्त जागांवर विजय नक्कीच मिळवेल. त्यात भाजपच्या १४० च्या आसपास जागा असतील.

प्रश्न: बंडखोरांचे कितपत नुकसान होईल?
यादव : बंडखोरी आम्ही जवळजवळ संपुष्टात आणल्याने आता तसे काही नुकसान होणार नाही. उलट भाजपच्या जागांमध्ये वाढ होईल. एक-दोन ठिकाणी शिवसेना आणि भाजपचे उमेदवार एकमेकांसमोर आहेत, मात्र त्याची कारणे वेगळी आहेत. कणकवलीत नितेश राणे यांच्यासमोर शिवसेना आहे, तर माण-खटावमध्ये जयकुमार गोरे आणि शेखर गोरे हे भाऊ समोरासमोर आहेत. जयकुमार यांनी लोकसभेलाच भाजपचे काम केले तेव्हाच आम्ही त्यांना तिकीट देण्याचे आश्वासन दिले होते आणि ही गोष्ट त्यांच्या भावालाही माहीत होती. मात्र त्यांनाही निवडणूक लढवायची असल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली. ठीक आहे. 
असेही होते.
 

प्रश्न : शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देणार का?
यादव : लोकसभा निवडणुकीच्या वेळेसच सर्व काही ठरलेले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उपमुख्यमंंत्रिपद देण्याबाबतचा निर्णय राज्यातच मी आणि देवेंद्र फडणवीस घेतील असे सांगितलेले आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आम्ही सर्व बसून त्यावर निर्णय घेऊ. त्याबाबत आताच काही सांगणे योग्य ठरणार नाही.