Home | Magazine | Rasik | Manoj Bhoyar Write Article About Kerala Flood

व्यथा वेदनांचा महापूर

मनोज भोयर | Update - Aug 26, 2018, 12:30 AM IST

देवभूमी असा सार्थ लौकिक असलेल्या निसर्गसंपन्न केरळात पुराने हाहाकार माजवला. जवळपास अडीचशे नागरिक मृत झाले.

 • Manoj Bhoyar Write Article About Kerala Flood

  देवभूमी असा सार्थ लौकिक असलेल्या निसर्गसंपन्न केरळात पुराने हाहाकार माजवला. जवळपास अडीचशे नागरिक मृत झाले. हजारो-लाखोंवर बेघर होण्याची वेळ ओढ‌वली. पूर ओसरला तशी राजकीय पक्ष-संघटनांनी मानवी शोकांतिकेचे भांडवल करत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू केली. कट्टर धर्माभिमानी हिंदू महंताने गोमांस खाणाऱ्यांमुळे हा प्रकोप घडून आल्याची शापवाणी उच्चारली. शाबरीमाला इथल्या अय्यप्पा देवाचा हा कोप असल्याचा शोध एका भाजप नेत्याने लावला. आपत्ती हीच इष्टापत्ती मानून प्रतिमासंवर्धन आणि प्रतिमाभंजनाचे खेळ मीडिया-सोशल मीडियात खेळले जात असताना, पूरग्रस्तांच्या व्यथा-वेदनांची तसेच बचावकार्यात योगदान देणाऱ्या संस्था-संघटनांनी पेललेल्या आव्हानांची दखल घेणारे हे लेख...


  अलपी (अलपुझा) जिल्ह्यातलं चेंगलूर हे पुराने वेढलेलं गाव. वेळ रात्रीची. नुकताच पाऊस पडून गेल्याने वातावरण ओलेगर्द हाेते. रस्त्यारस्त्यांवर भयाण शांतता दबा धरून हाेती. रस्त्याच्या एका कडेला आम्ही गाडी उभी केली. मदतीसाठी स्थानिकांचा शाेध घेऊ लागलो. रात्री दीडच्या सुमारास एक बसस्टाॅप दिसला. बाहेरच्या गावावरून एक बस येताना दिसली. बस कुठून अाली? जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण भाषेच्या अडचणीमुळे संवाद साधणे अवघड बनले. पुढे चाैकात काही माणसे जमा झालेली दिसली. खाद्यपदार्थ, बिस्किटे घेऊन अालेली ती माणसे चेंगलूर इंजिनिअरिंग काॅलेजमधल्या रेस्क्यू कॅम्पमध्ये जात असल्याचे समजले. एका गाडीवाल्याने आम्हा तिघांना त्याच्या पाठीमागे येण्यास सांगितले. पण नंतर ती गाडी काेणत्या तरी वळणार दिसेनाशी झाली.


  आम्ही पुन्हा माणसांच्या शोधात निघालो. एक तालुका कार्यालय दिसले. या कार्यालयात पुरात अडकलेल्यांसाठी काेरडे खाद्यपदार्थ साठवलेले हाेते. तेथील अधिकाऱ्यांशी बाेलण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा भाषा अाडवी अाली. मात्र, त्यांच्या मदतीने माेबाइल, पाॅवर बँक चार्ज केले. तालुका अधिकाऱ्याने पुरामुळे काेणत्या गावात काय परिस्थिती अाहे, याची मोडक्यातोडक्या इंग्रजीत नेमकी कल्पना दिली. तेथूनच पुढे जाण्याची नेमकी दिशाही मिळाली.


  चेंगलूरच्या अासपासच्या गावातली गरीब, मध्यमवर्गीय पूरग्रस्त कुटुंबे तेथे आश्रयाला आली हाेती. सगळ्यांच्या नजरा विनमस्क आणि चेहरे भकास दिसत होते. महापुराने माजवलेले तांडव त्यांच्या त्या भकास चेहऱ्यांवर सहज वाचता येत होते. एकीकडे अतिवृष्टी आणि धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्याने महापूर, तर दुसऱ्या बाजूला पूरग्रस्तांच्या वेदनांचा महापूर दिसत हाेता. पण तनाेज नावाचा एक धडाडीचा कार्यकर्ता आशेचं बेट होऊन या सर्वांना मदत करताना दिसला.


  चेंगलूरची व्यथा मनात साठवत पुढचा प्रवास सुरू झाला. येथून चार किलाेमीटरवर अंतरावर असलेल्या वेणमणी गावात आम्ही पाेहोचलाे. गावात सगळीकडे कंबरभर पाणी साचलेले हाेते. मी अाणि माझा कॅमेरामन महेश चाैघुले मागचा पुढचा विचार न करता त्या गुडघाभर पाण्यात चालत राहिलो. तब्बल चार ते पाच तास. सगळीकडे खचलेल्या घरांतल्या चीजवस्तू आणि अनेकांची स्वप्नं जणू वाहून जात होती. गावात पाेहोचल्यानंतर अाम्हाला बघून गावातली माणसे गाेळा झाली. स्थानिक भाषेतच त्यांची दु:खे सांगू लागली. अापली घरे पाण्यात बुडाल्यानंतर अाणि घरांतल्या सामानाची पूर्णत: नासधूस झाल्यानंतर उद््भवलेल्या स्थितीतील त्यांच्या चेहऱ्यावरचे भयभीत भाव बघून मनाचा थरकाप उडाला. या गावातील एक महिला मला येऊन म्हणाली, माझी मुले, नातवंडे, सुन, मुलगा सुरक्षितपणे दुसऱ्या गावातील नातेवाईकांकडे गेले अाहेत. पण मला मात्र येथून हलायचे नाही. पूर अाेसरला, तर ठीक अन्यथा माझा मृत्यू इथे झाला, तरी त्याची मला पर्वा नाही. माझ्यासमाेरून माणसे भाताच्या गाेणी, खाद्यपदार्थ घेऊन जात अाहेत. पण मला मिळत नाही. ते पण माणसे अाहेत, मी पण माणूस अाहे. त्यांना भूक लागते, मला लागत नाही का? हा तिचा सवाल होता. घरातले अन्नधान्य संंपलेले, बाजार बंद, वीज नाही, पिण्याचे पाणी नाही. अशा पिरस्थितीत अाम्हाला किमान शिजवण्यासाठी तांदूूळ तरी द्या, अशी तिची आर्त मागणी हाेती. केरळमधील घरे काेकणातल्या घरांसारखी जाणवली. पण काेकणच्या तुलनेत ही घरे काैलारू अाणि टुमदार हाेती. पण पुराने त्यांचा टुमदारपणाच हिरावून घेतला हाेता.


  साेनिया नावाची एक महिला आम्हाला तिच्या पडझड झालेल्या घराजवळ घेऊन गेली. म्हणाली, शंभर मीटर अंतरावर घर दिसते ते माझे अाहे. मला दाेन मुले अाहेत. नवरा साैदी अरेबियात काम करताे अाहे. माझ्या घराचे हाेत्याचे नव्हते झाले आहे. मग तिने एक कागद हातात ठेवला. त्यावर घरातल्या गमावलेल्या चीजवस्तूंची यादी हाेती. पुढे मागे सरकारने मदत केली तर या वस्तू मिळतील, अशी भाबडी अाशा आम्हाला तिच्या डोळ्यांत दिसली.


  वेणमणी गावातल्या लाेकांच्या व्यथा एेकल्यानंतर आम्ही इडनाड गावात पाेहोचलो. येथील बहुतांश घरांच्या भिंती, संरक्षक भिंंती पाण्याच्या जाेरामुळे तुटून पडल्याचे होत्या. सुखवस्तू कुटुंबांची घरेही महापुरात अक्षरश: रस्त्यावर अाली हाेती. गावातील लाेक कपडे, खाद्यपदार्थ मिळवण्यासाठी वेड्यासारखे धाव घेत होते. आम्ही तिथे असताना एक ट्रक खाद्यपदार्थ, कपडे घेऊनअाला हाेता. ही माणसे सूखवस्तू, मध्यमवर्गातील हाेती, पण मूलभूत गाेष्टी मिळवण्यासाठी त्यांची चाललेली धडपड नजरेतून सुटत नव्हती. यानंतर संध्याकाळी चेंगलूर- काेट्टायम असा ९० किलाेमीटरचा प्रवास करून आम्ही चिंगलाम अाणि तेथून दहा किलाेमीटरवर असलेल्या कुट्टनाड गावात पाेहोचलाे. या गावातही पाण्याने वेढलेली घरे आणि सैरभैर माणसे दिसली. पुरात अडकलेल्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी स्पीडबाेटीच्या मदतीने सहा किलाेमीटर अातमध्ये गेलाे. जाेखमीचा हा प्रवास हाेता, पण पुराची तीव्रता जाणून घेण्याची तीव्र इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. इथेसुद्धा समुद्र- तलाव- बॅक वाॅटर सगळेच एकत्र झालेले हाेते, काहीच फरक दिसत नव्हता. त्यातच एका महिलेने बाेटीत प्लास्टिकचे अच्छादन टाकून संसार मांडलेला हाेता, थाेडे पुढे गेल्यावर अशाच एका घरात भात शिजवण्यासाठी चूल पेटवली हाेती. पण लाकडे अाेली असल्यामुळे ती पेटत नव्हती. अामच्याबराेबर असलेल्या महेश नावाच्या स्थानक रहिवाशाचे घरही या पुराच्या पाण्यात बुडाले हाेते. त्याच्याकडे तीन रिक्षा हाेत्या. याचा अर्थ हे गाव रस्त्याने जाेडले हाेते. पण जलप्रलयात ताे रस्ता नाहीसा झाला हाेता. आता हा महेश या गावात येऊन अापल्या काेंबड्या आणि बदकांना खायला घालण्याचे काम बाेटीने येऊन करत हाेता. मुक्या जिवांबाबतची त्याची ही काळजी मनात घर करणारी होती.


  कुट्टनाड गावातून बाहेर पडून रात्री काेट्टायामला परतलाे. काेचीच्या या राजधानीतल्या एका हाॅटेलमध्ये अालाे, पण तेथे हाॅटेल कर्मचाऱ्यांचा तुटवडा हाेता. पिण्याच्या पाण्याचा तुटवडा हाेता. दुसऱ्या दिवशी काेचीचा बंद असलेला विमानतळ दृष्टीस पडला. तेथून अलवा या गावात गेल्यावर नॅशनल डिझास्टर रिस्पाॅन्स पथकाशी बातचित झाली. अहमदनगर, चंद्रपूर, साेलापूर येथून अालेल्या या चमूतील मराठी तरुणांनी मदतकार्याच्या थरारक अाठवणी कथन केल्या. अलाेव्हे येथील हाॅस्पिटलला भेट दिल्यावर तेथील परिस्थिती भयाण असल्याचे दिसले. पुराच्या पाण्यामुळ‌े हॉस्पिटलमधल्या यंत्रसामग्रीचे मोठे नुकसान झाले हाेते. तशातही लाेक उपचार घेत हाेते,पण उपचारापेक्षाही याक्षणी नागरिकांना मानसिक आधाराची अधिक गरज असल्याचे तेथील डाॅक्टरांच्या बोलण्यातून आम्हाला जाणवले होते.


  दौऱ्यातले सगळेच अनुभव नि:शब्द करणारे होते. कारण, केरळ नावाचे एक स्वर्गीय चित्र एकाएकी विस्कटून गेल्याची कितीतरी दृश्ये आम्ही बघितली होती. देवाचे वरदान लाभलेल्या भूमीवरची हजारो माणसं अगतिक झाल्याचे अप्रिय क्षण आम्ही नोंदले होते...
  शब्दांकन - संतोष काळे

  लेखकाचा संपर्क : ९८२०००८७३०


  - मनोज भोयर
  manojbhoyar@yahoo.com

 • Manoj Bhoyar Write Article About Kerala Flood
 • Manoj Bhoyar Write Article About Kerala Flood
 • Manoj Bhoyar Write Article About Kerala Flood
 • Manoj Bhoyar Write Article About Kerala Flood

Trending