आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकारलेला अर्धकुंभ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हाडे गोठवणारी थंडी उत्तर प्रदेशला नवी नाही. पण या कुडकूड थंडीतसुद्धा विलक्षण  सळसळ निर्माण करण्याचा जोरदार प्रयत्न सुरु आहे. त्यास सगळ्यात महत्वाचे कारण दोन दिवसांनी सुरु होणारा प्रयागराज इथला अर्धकुंभ हेच आहे. योगी आदित्यनाथांनी झाडून सारे प्रशासन गेले वर्षभर या कामी जुंपलेले आहे. प्रशासनासोबतच योगी मंत्रिमंडळातल्या तब्बल २४ मंत्र्यांना इतर कामे बाजूला टाकून देशभरातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना, राज्यपालांना, विदेशी राजदूतांना कुंभचे आमंत्रण देण्यासाठी पिटळण्यात आले आहे. हा मेळा केवळ योगींच्या इभ्रतेचाच प्रश्न बनलेला नाही, तर मोदींच्या २०१९ लोकसभा निवडणूक विजयासाठी  प्रचाराचे  महत्वाचे साधनही बनला आहे. 

 

गेल्या दोन वर्षात अलहाबादमधल्या संगमाच्या आसपासच्या गल्ल्यान् गल्या कायापालटाच्या प्रक्रियेतून गेल्या आहेत. शहरातली जुनीपुराणी घरे-इमारती, अलाहाबाद विद्यापीठाच्या भिंती, एअरपोर्ट, बसअड्डे सरकारी खर्चाने सजवले जाताहेत. त्यावरची  मोठमोठी पौराणिक, ऐतिहासिक, समकालीन पुरुषांची, देवदेवतांची म्युरल्स येणाऱ्या-जाणाऱ्यांचे डोळे दिपवून टाकत आहेत. त्यात कृष्णापासून रामापर्यंतच्या पुराणपुरुषांच्या चित्तवेधक चित्रकृती आहेतच, पण लता मंगेशकर, बिसमिल्ला खान, उ. झाकीर हुसेन यासारखे दिग्गज कलावंतही झ‌ळकताहेत. अवकाशयात्री ध्यानधारणेत बसला आहे, असे विज्ञान आणि अध्यात्मामध्ये अद्वैत दर्शवणारी भाष्यकेंद्री भित्तीचित्रसुद्धा लक्ष वेधून घेत आहेत. स्थानिक तसेच देशातल्या आणि विदेशातल्या शेकडो चित्रकार, शिल्पकार, नियोजनकारांच्या कलेचे जणू खुले प्रदर्शन भरल्याचा हा माहोल आहे. त्यांच्या कलाकृतीच लार्जर दॅन लाइफ नाहीत, तर सबंध अलाहाबाद शहराला लार्जर दॅन लाइफ स्वरुप प्राप्त झाले आहे. हा परिणाम एका पातळीवर मंत्रमुग्ध करणारा असला तरीही, संगमावर भरणाऱ्या कुंभमेळ्याची बहुसांस्कृतिक, बहुधर्मीय परंपरा खंडित झाल्याचेही जागोजागी पाहायला मिळत आहे. अर्थात,तयार करण्यात आलेला माहोल  सत्ताधारी पक्षाच्या ब्रँडिंगला पोषक ठरणारा आहे. यंदाचे बोधचिन्ह उघडउघड हिंदूकेंद्री बनवण्यात आल्याचे अनेकांचा आक्षेप आहे. त्यात प्रसिद्ध चित्रकार अशोक भौमिक यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करताना म्हटले आहे की," कुम्भ में भारत के कोने-कोने से लाखों आम श्रद्धालु आते हैं , जिसके चलते यह इस देश के विभिन्न प्रांतों की जनता का मेल-मिलाप का मेला है । कुम्भ मेले के लोगो या प्रतीक चिन्ह में मंदिर का चित्रण अर्थहीन सा लगता है,क्योंकि कुम्भ का मूल आकर्षण स्नान है न कि कोई मंदिर दर्शन'। खरे तर कुंभ हा आपल्या बहुधर्मीय संस्कृतीच्या एकोप्याचे ठळक प्रतीक राहिला आहे.  

 

अलाहाबादच्या कुंभचे महत्व तर भारतीयत्वाचा विचार करता खूप मोठे राहिले आहे. गंगा-जमुना या दोन नद्यांचे येथे होणारे मिलन हिंदू-मुस्लिम संस्कृतीचे मिलन मानले गेले आहे. एवढेच कशाला,भारतात मकर संक्रातीपासून जिथे कुठे नद्यांचा संगम आहे, तिथे मेळा भरत आला आहे. उत्तर प्रदेशात कुशीनगर-देवरिया भागात त्रिमोहानी मेळा गेली कित्येक दशके भरतो आहे. उ.प्रदेश, बिहार आणि नेपाळ या त्रिकोणात जिथे नद्यांचे मिलन होते, तेथे  मेळा भरण्याची जुनीच परंपरा आहे. माझ्या लहानपणी आम्ही कुटुंबातले सगळे जण बैलगाडीतून या स्थानिक कुंभमेळ्यांना गेल्याचे माझ्या स्मरणात आहे. यात अर्थातच अलाहाबादचा कुंभ खास आहे, कारण दोआब असलेल्या जागी तो भरत आला आहे. गंगा-जमुना या दोन नद्यांचा संगम हेआपल्या सांस्कृतीचे  प्रतीकरुप आहे .  मात्र, गंगा-जमुनी संस्कृतीवर घाव घालण्याचे  प्रयत्न  अलीकडच्या काळात सत्ताधाऱ्यांकडून वारंवार होत आले आहेत. 

 

म्हणूनच भौमिक यांनी केलेली तक्रार एका पातळीवर रास्तच आहे, २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुका नजरेपुढे ठेवून कुंभच्या बोधचिन्हापासून ते भाविक, परदेशी पर्यटक, विविध कंपन्या, संस्था यांच्या सरबराईसाठी योगी सरकारने जवळपास ४२०० कोटी रुपये (हे बजेट २०१३च्या महाकुंभसाठी खर्च केलेल्या १२१४ कोटींपेक्षा जवळपास अडीचपट अधिक आहे.)  खर्च केले आहेत. ब्रँडिंग वर्क्स आणि डिजिटल मीडिया प्लानिंगसाठीसुद्धा निविदा मागवल्या गेल्या आहेत. "दिव्य कुंभ, भव्य कुंभ' हे योगी सरकारने निश्चित केलेले घोषवाक्य आहे. रस्ते निर्माण हा कंुभसाठीचा योगी सरकारने हाती घेतलेला मोठा कार्यक्रम आहे. परंतु, तो धडाक्याने राबवताना शेरशाह सूरीनिर्मित खुशरोबाग सारख्या ऐतिहासिक स्थळांवरही संक्रांत आली आहे. अकबर किल्ल्यात अक्षयवट आणि सरस्वती कूप बघायला लोक यापूर्वी जात होतेच, पण जणू काही आम्हीच ते खुले केलेय, अशा थाटात त्याचाही जाहिरात केली जातेय. प्रत्येक चौक, बसस्टॅण्ड, पुलाचे खांब भगव्या रंगात रंगवले गेले आहेत. म्हणजे एका बाजूला भव्यदिव्य सुशोभिकरण झाले आहे, तर दुसऱ्या बाजूला पडझड झालेला, अन्याय होत असलेला अलाबाहादचा चेहरेही  समोर येत आहेत . त्यातला एक चेहरा साधनसुविधांविना राबणाऱ्या  जवळपास १२ हजार सफाई कर्मचाऱ्यांचा आहे. यातले काही मध्य प्रदेशातले तर काही उ. प्रदेशातले आहेत. त्यातल्या काहींचा कडाक्याच्या थंडीने मृत्युदेखील ओढवला आहे. दहाबारा कर्मचाऱ्यांची एकाच तंबूत राहण्याची सोय आहे. त्यातल्या एका तंबूत हरिलाल या कामगाराच्या वडिलांना जागा मिळाली नाही, म्हणून ते थंडीत बाहेर झोपले आणि त्यातच ते मरण पावले आहेत. 

 

के.के. पांडे प्रयागराजमधले वरिष्ठ पत्रकार आहेत. ते म्हणतात, इथला कुंभमेळा नाथपंथी, कबीरपंथी, हिंदू, मुस्लिम सगळ्यांना सामावून घेणारा राहिला आहे. यात स्थानिक उर्दू शायरांनी कार्यक्रम सादर केले आहेत. ऐंशीच्या दशकात आम्ही विद्यार्थीदशेत असताना "दस्ता'नामक नाट्यसमूह स्थापन करून कुंभमेळ्यात नुक्कड नाटके सादर केली आहेत. हिंदू-मुस्लिम अशा दोन्ही धर्मातल्या कलावंतांनी त्यात आवर्जून भाग घेतलेला आहे. शहराच्या पश्चिमेला मुख्यत: मेळ्याशी संबंधित घडामोडी घडतात, इथे वस्तीला असलेल्या मुस्लिम आणि शीख धर्मीयांनी जवळपास प्रत्येक कुंभमेळ्याप्रसंगी भाविक-पर्यटकांसाठी चहा-पाणी-औषधांची सेवा पुरवली आहे. मात्र, नव्वदच्या दशकात या मेळ्याचे पहिल्यांदा बाजारीकरण झाले. आता पहिल्यांदाच  मोठ्या प्रमाणात हिंदुत्वकेंद्री ब्रँडिंग होत आहे. याच्या मागे अर्थातच सत्ताधाऱ्यांचे राजकीय हिशेब आहेत. याचा परिणाम हिंदू आणि मुस्लिम धर्मातील सौहार्दभाव कमी होत जावून संशय, भय आणि अविश्वास वाढीस लागण्यात होणार आहे. 

 

अशा प्रसंगी, हा केवळ धार्मिक मेळा आहे, असे जर कोणी म्हणत असेल तर ती सरळसरळ दिशाभूल आहे. कारण, पंतप्रधान मोदींनी अलाहाबाद येथे गंगा आरती करून आधीच त्याला राजकीय रंग च‌ढवला आहे. सरसंघचालक मोहन भागवत या महिन्याच्या अखेरीस चार दिवस या अर्धकुंभमध्ये सहभागी होणार आहेत. त्यात ते विहिंपसोबत धर्मसंसदेत भाग घेतील. या धर्मसंसदेत संत-महंत राममंदिर प्रश्नावर आपला निर्णय जाहीर करतील. याप्रसंगी, योगी आदित्यनाथांपासून, अमित शहापर्यंतचे राजकीय नेते आणि बाबा रामदेवांपासून श्रीश्री रविशंकरांपासूनचे अध्यात्मिक गुुरु सहभागी होणार असल्याचे संकेत आहेत. आम्ही सारेच श्रद्धेच्या भावनेने आलेलो आहोत, असे म्हणण्याची सूट सारेच घेणार हेही उघड आहे. पण त्यामुळे विद्यमान सत्तेचा राजकीय अजेंडा लपून राहणारा नाही, हेही तितकेच खरे आहे. 

 

(लेखक गोरखपूरस्थित ज्येष्ठ पत्रकार आहेत. )

 

बातम्या आणखी आहेत...