आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याची अंगठी घेऊन दिले पितळेचे बिस्कीट; अंबाजोगाईमध्ये सेवानिवृत्त शिक्षकाला गंडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - नातेवाईक आजारी असून माझ्याकडे चार सोन्याची बिस्किटे आहेत, मात्र पावती नाही. त्यामुळे चार बिस्किटांच्या बदल्यात तुमची अंगठी मला द्या, असे म्हणून दोन व्यक्तींनी अंबाजोगाईतील सेवानिवृत्त शिक्षकाला गंडा घातल्याची घटना समोर आली. या प्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात अज्ञात दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. 


ज्ञानोबा कांबळे हे अंबाजोगाईतील रहिवासी असून सेवानिवृत्त शिक्षक आहेत. शुक्रवारी ते शहरातील एका हॉटेलसमोर असताना त्यांना दोन जण भेटले. त्यांनी आमचे नातेवाईक रुग्णालयात अॅडमिट असून तातडीने पैशाची आवश्यकता आहे असे सांगितले. आमच्याकडे चार तोळे सोन्याची चार बिस्किटे आहेत, मात्र आमच्याकडे पावती नसल्याने ही बिस्किटे आम्ही विकू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. कांबळे यांच्या हातात एक तोळ्याची सोन्याची अंगठी होती. चार बिस्किटांच्या बदल्यात आम्हाला तुमची अंगठी द्या, अंगठी विकून आम्ही पैसे घेऊ, असे म्हणत त्यांनी कांबळे यांना या व्यवहारासाठी राजी केले. कांबळेंनीही एक तोळा सोन्यात चार तोळे सोने मिळत असल्याने हा व्यवहार केला. 


मात्र घरी गेल्यानंतर बिस्किटे सोनाराकडून पडताळून घेतली असता ती पितळेची निघाली. यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अंबाजोगाई शहर ठाण्यात धाव घेत त्यांनी याबाबत तक्रार दिली.