आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मनसाज निंबर्ते माझ्या घरी गच्चीवर रूमच्या बाजूला टिनाचं शेड आहे. या शेडमध्ये कपडे वाळवत घालण्यासाठी तार बांधली आहे. एक दिवस अचानक लक्ष गेलं. चिमणा अन् चिमणी चोचीत एकेक काडी, कापडाची चिंधी, कापूस, गवत आणून आपला आशियाना बांधत आहेत. कॉम्प्युटर टेबलवर बसलं की समाेरच्या तारांलगत घरटे बांधण्याचा त्यांचा उपक्रम, त्यासाठी त्यांची चाललेली तगमग मी तासन्तास बसून पाहत राही. जगापासून दूर चिमणा-चिमणी आपले घरटे बांधण्यामध्ये मग्न होते. काही दिवसांनी त्या घरट्यातून आवाज यायला लागला म्हणून लक्ष दिले तर, लक्षात आले घरट्यात चिमणा-चिमणीच्या बाळराजांचे आगमन झाले आहे. चिमणा घर व पिलांकडे लक्ष देई, तर चिऊताई भुर्रर्र उडत जाऊन दाणा आणी. दोघेही आलटून पालटून आपली ड्यूटी बजावत होते. घरच्यांना मी सक्त ताकीद दिली. ज्या तारांजवळ चिमण्यांनी आपला आशियाना बांधला आहे, त्या तारांवर कुणीही कपडे वाळवत टाकणार नाही. कारण कपडे टाकताना तार हलल्यामुळे त्यांचे घरटे पडण्याचा धोका होता. दरम्यान, महिनाभरासाठी मी बाहेरगावी गेले. तिकडून येऊन पाहते, तर घरट्यात कुणीच नाही. म्हणून मी चौकशी केली. कारण कपडे वाळवताना घरटे पडले तर पिलांच्या जिवाला धोका होता. एक दिवस कपडे वाळवत घालताना चुकून कपडेवाल्या बाईंचा ताराला धक्का लागला. घरटे पडणार तसेच माझा ओरडा खावा लागेल म्हणून त्यांनी कपडे गच्चीवर न टाकता खाली टाकणे सुरू केले. इकडे पिलांना पंख फुटताच आकाशात भरारी घेण्यास ते घरट्यातून बाहेर पडले. याबाबत घरी माहिती नाही. मला वाटले, पिलांचे वाईट झाले. असेच आठ दिवस गेले. एक दिवस अचानक चिवचिवाट दिसला म्हणून मी पुन्हा खिडकीतून डोकावले, तर चिमणा आणि चिमणी परत आलेले दिसले. त्यांना बघून मला हायसे वाटले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.