पळून गेलेली मुलगी / पळून गेलेली मुलगी

Nov 06,2018 01:07:00 PM IST

स स्टँडच्या बाहेर जाताना तिला असं वाटतं होतं जणू काही कोणी तरी तिचे पाय ओढतंय. डिसेंबरच्या त्या निवांत संध्याकाळी चांगलंच गार वारं सुटलं होतं. ती जेवढी ओढणी डोक्यावर ठेवायचा प्रयत्न करत होती, तेवढी ओढणी घसरून खाली पडत होती.

संध्याकाळ उतरणीला लागली होती. तिने परत एकदा वळून बसस्टँडकडे पाहिलं. सकाळपासून वाटणारी भीती, वैताग, पश्चात्ताप सगळं काही एका कोपऱ्यात ढकलून ठेवून तिला एक मोकळा श्वास घ्यायचा होता. पण त्या बसस्टँडवरती त्या क्षणी तिला फक्त भीषण शांतताच ऐकू येत होती.

सोळा-सतरा वर्षांची मुलगी ती. चेहऱ्यावरच्या धुळीचा राप, आणि डोळ्यातली काळजी सोडली तर तिला नक्कीच सुंदर म्हणता आलं असतं. फिकट पिवळ्या रंगाचा सलवार कमीज घालून ती सावकाश चालत होती. आज सकाळपर्यंत तिचं नाव शैली होतं, बाजारच्या जवळच्या गल्लीत तिचं घर होतं.


‘नुसतीच वाढली आहेस, सारखी उंडारत असतेस. शैली, मी सांगून ठेवते, उद्यापासून तू शाळा सुटल्यावर सरळ घरी आली नाहीस तर तंगडी तोडून ठेवेन.’ दर दोन दिवसांनी आई तिला धमकी द्यायची. पाय मोडले नसले तरी शैलीला मार काही चुकला नव्हता, पण मार खाऊन रडून झाल्यावर ती परत आईच्या कुशीतच शिरायची, जणू काही झालंच नव्हतं.

‘असंच परत होईल का? आई आज पण तशीच वागेल का?’ विचार करता करता शैलीच्या डोळ्यात पाणी आलं.


जर शक्य असतं तर तिने ज्या क्षणी घरातून पळून जायचा विचार केला तोच क्षण बदलून टाकला असता. आता तिला इथून पळून जाऊन घरी जायचं होतं.

गाव अगदी छोटंसं होतं, आठदहा दुकानं, एक शाळा, देवीचं एक मंदिर, इकडची तिकडची वस्ती मिळून संपूनही जात होतं.


शैली अगदी पक्की डोंगरखोऱ्यातून वाहणाऱ्या नदीसारखी होती, अवखळ, प्रवाही, जिद्दी पण स्वतःच्या क्षमता ओळखून असणारी. शैलीचे वडील जगदीशचंद्र जोशी देवीच्या देवळातले पुजारी होते आणि त्यामुळेच त्यांना गावात मानही होता. पण ती मानाची जबाबदारी शैलीला काही झेपत नव्हती. शांत बसणं तिला माहीत नव्हतं, तिला कधी सौम्य हसता यायचं नाही, ती कायम वादविवादांमध्ये भाग घ्यायची. सामान्यतः मुली वागतात तसं वागणंच नव्हतं तिचं. एखाददुसरी गोष्ट खपवता आली असती पण हिच्या सगळ्याच गोष्टी उफराट्या. तिला बदलवण्याचे आईचे सगळे प्रयत्न फसले होते, पण तिने हार मानली नव्हती.

आईला तिला स्वतःसारखीच उत्तम गृहिणी बनवायचं होतं, तर तिच्या वडिलांनी तिच्यासाठी खूप स्वप्नं पाहिली होती. दरवर्षीच्या मार्कांप्रमाणे, डॉक्टर, इंजिनिअर, वकील जज असं कायम बदलत राहायचं. सध्या तिने प्रशासकीय अधिकारी बनावं हे त्यांचं स्वप्न होतं. पण आपल्याबाबत इतरांनी काही निर्णय घ्यावा हीच गोष्ट मुळी शैलीला आवडत नव्हती. तिला जे वाटेल तेच ती करायची. पण अनेकदा तिला काय वाटतंय हे तिचं तिलाच कळत नसे.
‘आता तू मोठी झालीस असं सारखं बाहेर बोलत फिरू नये, लोक काय म्हणतील?’ आई असं म्हणायची तेव्हा तिला कळत नसे, हे कोण लोक असतात जे सारखे बोलतात. एकदा भेटले तर त्यांनाही मी सरळ करीन, जसं चपलेनं मारून त्या लाल बाजारातल्या मुन्नाला केलं होतं. परत कधी कोणत्याही मुलीला जानू म्हणणार नाही तो.

बारावीच्या त्यांच्या वर्गात शैलीला तिच्याकडे रोखून पाहणारे दोन डोळे दिसले. आजपर्यंत कोणाचीच तिच्याकडे असं बघायची हिंमत झाली नव्हती. एक तर पुजाऱ्याची मुलगी आणि त्याहीपेक्षा तिचा तोरा बघून सगळे शेपूट घालायचे. पण तो पोरगा भलताच धीट होता, तिने रागाने पाहिलं तरी तिच्याकडेच टक लावून बघत होता. कुरळ्या केसांच्या, भुऱ्या डोळ्यांच्या त्या पोरावरून तिलाही नजर हटवावीशी वाटली नाही. शाळेत नवीनच आलेला तो विजय नावाचा मुलगा होता. देखणा, स्मार्ट, हसरा विजय सगळ्यांचा आवडता झाला नसता तरच नवल होतं, पण विजयला मात्र आवडली होती बिनधास्त शैली.


त्याच्या नजरेमुळे शैली चक्क बदलली होती. तो जेव्हा तिला बघायचा तेव्हा तिला आतमध्ये काही तरी हलतंय असं वाटायचं, आपण कोणाला तरी आवडतो या भावनेने तिला सुख मिळत होतं. आजवर तिच्याकडे तशा नजरेने अनेकांनी बघितलं होतं, पण तिने डोळे मोठे केल्यावर त्या नजरा खाली गेल्या होत्या.

शैली बदलत होती आणि ते बदल आईच्या नजरेतून लपले नव्हते. आरशात बघून ती हसायला लागली होती, हळूच कधी तरी काजळ लावायला शिकली होती.
‘माझं लक्ष आहे तुझ्यावर,’ आईने एवढंच सांगितलं आणि आईने न सांगितलेलंसुद्धा तिला कळलं. त्यानंतर तिने प्रयत्न केला, पण विजय काही डोळ्यासमोरून जात नव्हता. नेत्रपल्लवीतून सुरू झालेला मामला महिन्याभरात विजयने १४३ म्हणजे ‘आय लव्ह यू’ लिहिलेला कागद आणून देण्यापर्यंत गेला होता.

विजयबरोबर बोललेल्या साध्या गोष्टीसुद्धा तिला खास वाटायला लागल्या होत्या. तू पण बाकीच्या मुलींसारखीच आहेस म्हणल्यावर तिने पैज लावली आणि विजयसोबत पाताळदेवीच्या यात्रेत फिरून आली होती. वर्गातल्या वर्गात दिल्या-घेतलेल्या चिठ्ठ्या तिने तिच्या कपाटात ठेवल्या होत्या. एक दिवस कपाट आवरता आवरता त्या चिठ्ठ्या आईच्या हातात आल्या, त्यावरसुद्धा आरडाओरडा न करता आईने एवढंच सांगितलं की, शैलू, तुला तुझं चांगलं-वाईट कळतं. मी बाकी काही सांगणार नाही. आई ओरडली असती, रागावली असती तर शैलूला बरं वाटलं असतं, आता तिला कोणाच्या विरुद्ध वागावं हेच कळत नव्हतं. आईचं म्हणणं पटत होतं. त्यामुळे ती विजयपासून थोडं अंतर ठेवून वागत होती. सगळं ठीक चाललं होतं, फक्त घरी ते घडेपर्यंत!त्या दिवशी शाळेतून घरी येऊन शैली बघते तर काय, घर पूर्ण सजलं होतं, वेगवेगळे खाण्याचे पदार्थ केले होते, कोणाच्या तरी स्वागताची तयारी चाललीय हे समजत होतं.

तो पाहुणा म्हणजे दुसरातिसरा कोणी नसून शैलीला बघायला येणारा मुलगा आहे हे न समजण्याएवढी शैली बुद्दू नव्हती. आर्मीतल्या या कॅप्टन मुलाला लग्नात फक्त मुलगी आणि नारळ हवा होता, बाकी काही अपेक्षा नव्हती. आईच्या वागण्याबोलण्यातून कौतुक ओसंडून वाहत होतं. ते सगळं बघून शैलीचा तिळपापड होत होता. महिन्याभरापूर्वी आई म्हणत होती, हे शिकायचं वय आहे आणि आता तीच लग्नाचं बघतेय. विजयला भेटणं चूक होतं तर मग लग्न कसं काय बरोबर, असे प्रश्न तिला पडले होते. कोणत्या क्षणी तिने घरून पळून जायचं ठरवलं माहीत नाही, पण ‘घर की विजय?’ या अवघड प्रश्नात तिने विजयची निवड केली. दोघांनी मिळून बिनचूक प्लॅन केला होता. ते दोघेही रुद्रपूरच्या बसस्टँडवर भेटणार होते. मग ते त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार होते.


बारा वाजता ती रुद्रपूरला पोहोचली आणि अचानक तिला जाणीव झाली, आपण काय काय मागे सोडून आलो याची, पुढे काय काय करावे लागेल याची. तिने त्यांच्या संसाराची चित्रंसुद्धा रंगवली होती. बारा वाजता तो तिला घ्यायला येणार होता, पण दोन वाजले तरी त्याचा पत्ता नव्हता. काय झालं असेल? त्याला तर काही झालं नसेल ना? की तो घाबरून गेला असेल? तो येणार नाही अशी हळूहळू तिची खात्री पटत चालली होती. ती आता स्वत:लाच विचारत होती, तिला खरंच विजय आवडत होता का? तिचं त्याच्यावर प्रेम होतं का? तिलाच उमजणाऱ्या उत्तरामुळे तिला हसायला येत होतं.


सहा तास झाले होते, विजय आलाच नव्हता, आता तिला घराची ओढ जास्त वाटत होती. आईबाबा आधी घाबरले असतील, मग चिडले असतील. आजूबाजूचे लोक त्यांनाच बोलतील. बसल्या बसल्या ती विचार करत होती. दिवसभर तिला एकटीला काही वाटलं नाही, पण आता तिच्याभोवती घिरट्या घालणाऱ्या लोकांमुळे ती जास्तच सावध झाली. आता इथे बसणं योग्य नाही हे तिला कळलं. पण पर्समध्ये २००० रुपये आणि एक सोन्याची चेन घेऊन अजून कुठे जाणार होती ती? जगायला हे नक्कीच पुरेसं नव्हतं. आजच्या दिवसाने तिला ‘पळून गेलेली मुलगी’ बनवलं होतं. पण कोणी तिला काही म्हणावं हेच तर तिला पसंत नव्हतं. त्यामुळे आजही ती दुसऱ्या कोणाला तिला काही म्हणण्याची संधी देणार नव्हती. आजही ती तिला जसं वाटेल तसंच जगणार होती. आता तिला वाटत होतं घरी जावं. त्यामुळे ती घरीच जाणार होती. घरी गेल्यावर काय होईल, फार तर फार आई दोन थोबाडीत लगावेल, बाबा काही दिवस बोलणार नाहीत, शेजारपाजारचे थोडे दिवस येता-जाता ऐकवतील, पण आपली चूक मान्य करण्याची हिंमत किती जणांमध्ये असते? शैलीमध्ये ती होती. तिच्या घरी जाणारी शेवटची बस निघत होती. शैली पटकन त्यात बसली, खिडकीत बसून ती चेहऱ्यावरचे केस सावरत होती, चेहरा दमलेला दिसत होता, पण डोळ्यात मात्र चमक होती, मनस्वीपणाची!

- मानसी होळेहोन्नुर, बंगळुरू

X