आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रथमेश पाटील
editor@thebunkmag.com
आज आपण माध्यमांच्या इतक्या सान्निध्यात राहतो, की वास्तव जग आणि आपली समज यांच्यामध्ये माध्यमांची कुबडी घेतल्याशिवाय कशाचाही अर्थ लागतच नाही. म्हणजे समजा, तुमच्या शहरात एखादा मोर्चा निघाला. कदाचित तुमच्यापासून काही मिनिटांच्या अंतरावर. तुम्ही एक नागरिक म्हणून सहसा त्याबाबत काहीच दखल घेणार नाही. पण, थोड्याच वेळात टीव्हीवर तो तुमच्याच शहरातला मोर्चा 'ब्रेकिंग न्यूज' म्हणून दाखवला गेला, तर तुम्ही जेवता-जेवता आपल्या घरातल्यांशी, फोनवर मित्रांशी किंवा सोशल मीडियावर इतरांशी त्याची चर्चा करू लागता. म्हणजे जी घटना तुमच्या जवळ घडत होती, त्याबाबत तुम्हाला फरक तेव्हाच पडला, जेव्हा माध्यमांनी तुम्हाला दखल घेण्याबद्दल सूचित केलं!
नोमचॉम्स्की आणि एडवर्ड हर्मन हे प्रसिद्ध अमेरिकी भाषा व माध्यम तज्ज्ञ यालाच 'मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट' अर्थात 'निर्मित संमती' म्हणतात. नोमचॉम्स्की हे विख्यात भाषा शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाच्या थिअरी व भाषाशास्त्रीय मॉडेल विकसित केले. एडवर्ड एस. हर्मन माध्यम विश्लेषक आहेत. या दोघांनी १९८८ मध्ये एकत्र येऊन माध्यमांना समजून घेण्याचं, त्यांच्या कामाचं स्वरूप आणि त्यांचा परिणाम समजून घेण्यासाठी 'प्रोपागंडा मॉडेल' मांडलं आणि त्याबाबत लिहिलेलं त्यांचं पुस्तक म्हणजे 'मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट'.
लोकशाहीमध्ये किंवा लोकाभिमुख व्यवस्थेमध्ये सरकार काय असतं? तर ही एक यंत्रणा असते, ज्यात सामान्य माणूस किंवा नागरिक, त्याच्या वतीनं कारभार सांभाळायची शक्ती एका व्यवस्थेला प्रदान करतो. हे सरकार म्हणजे जनतेचं प्रतिनिधित्व करणारी कारकुनी व्यवस्था. पण, या व्यवस्थेचा वापर करून समाजातील विशिष्ट वर्ग सामान्य जनतेकडून हा अधिकार आणि संपत्ती गडप करू पाहत असतो. हा वर्ग धनिक, उद्योजक, राजकीय वर्चस्व असलेले नेते अशा 'उच्च' व्यक्तींनी बनलेला असतो. ते सार्वजनिक संपत्तीची जी लूट करत आहेत, त्यावर जनतेचं नियंत्रण असावं, हे त्यांना आवडत नसतं.
अशा व्यवस्थेवर जनतेच्या बाजूनं वाचक ठेवावा म्हणून माध्यमं निर्माण झाली. या वरच्या वर्गातल्यांचे भ्रष्टाचार पकडणं, त्यांचा खोटेपणा उघडकीस आणणं, त्यांना जनतेच्या प्रश्नांना आणि जनहितासाठी जबाबदार धरणं, हे माध्यमांचं काम. म्हणजे माध्यमं ही इमारतीच्या चौकस चौकीदाराप्रमाणे असावीत. मात्र, या वरच्या वर्गाला अशा माध्यमांना नियंत्रित करणे आणि त्यांना उलट स्वरुपात वरच्या वर्गाच्या हितासाठी, जनतेच्या विरोधात होणं शिकवता आलं. हे या वर्गाला कसं जमलं, याची चर्चा आणि सखोल उलगडा म्हणजे हे पुस्तक.
या पुस्तकात माध्यमं सत्ताधारी वर्गाच्या बाजूने कशी काम करतात, याचा विस्ताराने उलगडा केला आहे. सरकार जर लोकशाही असेल, तर त्याला प्रत्येक निर्णयासाठी जनतेची 'कन्सेंट' अर्थात संमती घेणं भाग आहे. अशावेळी, सरकार माध्यमांचा वापर करतं आणि जनतेच्या मनात असे विषय पेरतं, ज्यामुळे जनतेला सरकारचा निर्णय किंवा धोरण मान्यच करावं लागतं. म्हणजे सत्ताधारी वर्गाचा एखाद्या गोष्टीत फायदा असेल, उदा. एखाद्या युद्धात शस्त्रास्त्र विकणाऱ्या कंपनीचा नफा असेल, तर सरकार त्या युद्धासाठी जनतेचा पाठिंबा मिळावा अशा पद्धतीने माहिती पेरत जाते आणि माध्यमांनी केलेल्या जादूने, जनता या युद्धाला समर्थन द्यायला संमत होते, अशी ही एकूण मांडणी आहे. हे कसं शक्य केलं जातं, ते नोमचॉम्स्की आणि हर्मन आपल्याला सांगतात. या पुस्तकात ते पाच फिल्टर्सची मांडणी करतात. फिल्टर म्हणजे चाळणी. या चाळण्यांमधून माहिती आरपार गेली की तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत सत्ताधाऱ्यांना सोयीची झालेली असते.
म्हणजे बघा, जी व्यवस्था तुमच्या बाजूनं लढण्यासाठी होती, तीच तुमच्या बुद्धीचा ताबा घेऊन तुमच्या नकळत तुमची संमती मिळवण्यासाठी वापरली जाऊ शकते. या पुस्तकात लेखकांनी संदर्भ आणि अनेक बातम्यांचं सखोल विश्लेषण करत आपला दावा सिद्ध केला आहे. आज देशात अनेक ठिकाणी आंदोलने होत आहेत. त्यांची माहिती, तुमच्या शेजारी घडत असली, तरी तुम्हाला मिळत आहे, तीमाध्यमातूनच. आज आपल्याही देशाला एक सत्ताधारी वर्ग आहे. या वर्गाचेही हितसंबंध आहेत. ते का आणि कसे आहेत, हे या पुस्तकात दिलेल्या पाच चाळण्यांमधून तुम्हालाही ओळखता येतील.
माध्यम नावाची जी व्यवस्था तुमच्या बाजूनं लढण्यासाठी होती, तीच नकळत तुमची संमती मिळवण्यासाठी वापरली जाऊ शकते. आज आपल्या देशातही एक सत्ताधारी वर्ग आहे. त्याचे हितसंबंध का आणि कसे आहेत, हे या पुस्तकात दिलेल्या पाच चाळण्यांमधून तुम्हालाही ओळखता येतील.
पुस्तक : मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट
लेखक : नोमचॉम्स्की आणि एडवर्ड हर्मन
प्रकाशक : व्हिंटेज बुक्स
किंमत : ४१९ रुपये
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.