आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हल: ऋजुता दिवेकर, अवधूत गुप्तेंसह अनेक मान्यवरांचा सहभाग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कला, साहित्य, संस्कृती म्हणजे सुसंस्कृत समाजाचे आभूषण असते. ही बाब लक्षात घेऊन दिव्य मराठीतर्फे २३ ते २५ नोव्हेंबर कालावधीत सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या परिसरात दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसांच्या या अनोख्या उत्सवात शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती, अवधूत गुप्ते, साबरी ब्रदर्स, जितेंद्र जोशी, ऋजुता दिवेकर यांच्यासह अनेक मान्यवरांचा सहभाग राहणार आहे. 


यापूर्वी हा महोत्सव नाशिकमध्ये होत होता. खास औरंगाबादकर आणि मराठवाड्यातील रसिकांची मागणी लक्षात घेऊन यंदा तो औरंगाबादेत होत आहे. त्यासाठी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या परिसरातील पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ साहित्यनगरी तयार करण्यात आली आहे. या नगरीतील पु. ल. देशपांडे सभागृह, डॉ. गंगाधर पानतावणे सभागृह आणि बशर नवाज सभागृहांत सादरीकरण होणार आहे. त्यातील २३, २४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमांचा

 

सभागृहनिहाय तपशील: 

> २३ नोव्हेंबर : पु. ल. देशपांडे सभागृह : सकाळी ११ वाजता वेद आणि विज्ञान या विषयावर स्वामी निश्चलानंद सरस्वती यांच्या व्याख्यानाने उत्सवास प्रारंभ होईल. दुपारी २ ते ३ या वेळेत तंत्र उत्तम कथा आणि पटकथा लिहिण्याचे या विषयावर होणाऱ्या चर्चासत्रात प्रख्यात लेखक अमोल उदगीरकर, महेशकुमार मुंजाळे सहभागी होतील. त्यांच्याशी प्रख्यात नाट्यदिग्दर्शक पद्मनाभ पाठक संवाद साधतील. दुपारी ३.३० वाजता प्रख्यात इंग्रजी लेखिका डॉ. मंजिरी प्रभू यांच्याशी कॉफी विथ देसी अगाथा ख्रिस्ती या विषयावर विकास सिंग संवाद साधणार आहेत. सायंकाळी ५.३० वाजता मराठी वाङ्मयाचा  गाळीव इतिहास या पु. ल. देशपांडे लिखित आणि मुकेश माचकर यांनी नाट्य रूपांतरित, मंगेश सातपुते दिग्दर्शित प्रयोगाचे सादरीकरण पार्थ थिएटर्सतर्फे होईल. 

 

डॉ. गंगाधर पानतावणे सभागृह : दुपारी २ वाजता प्रा. शेषराव मोरे यांचे १८५७ चा उठाव या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारी ३.३० ते ४.३० वेळेत अनुवादाची कला या विषयावर चर्चासत्र होईल. त्यात प्रख्यात लेखिका, अनुवादक डॉ. उमा विरूपाक्ष कुलकर्णी, प्रा. डॉ. छाया महाजन यांच्याशी मिलिंद कुलकर्णी संवाद साधणार आहेत. सायंकाळी ५.३० वाजता मुशायरा होईल. त्यात चंद्रशेखर सानेकर, डॉ. इक्बाल मिन्ने, वैभव देशमुख, केतन पटवर्धन, कमर एजाज, गणेश घुले यांचा सहभाग असेल. संचालन महेश अचिंतलवार करतील. 

 

बशर नवाज सभागृह : दुपारी २ वाजता 'ग्रामीण साहित्य वास्तवापासून दूर आहे का?' या विषयावर चर्चासत्र होईल. त्यात प्रख्यात साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे, आसाराम लोमटे यांचे सहभाग असेल. डॉ. रामचंद्र काळुंखे त्यांची मते जाणून घेणार आहेत. दुपारी ३.३० वाजता वेब मॅगझिन : अ केस फॉर द क्युरिअस रीडर्स या विषयावर प्रख्यात लेखक देवांशी जैन, निर्भय कनोरिया यांच्याशी प्रा. डॉ. मुस्तजीब खान संवाद साधतील. हेच मान्यवर लेखक संवादानंतर रायटिंग अँड पिचिंग फॉर मॅगझिन या विषयावरही मते मांडतील. सायंकाळी ५.३० वाजता दलित साहित्याचे भविष्य या विषयावर प्रख्यात साहित्यिक प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रा. डॉ. प्रकाश कुंभार बोलणार आहेत. त्याचे सूत्रसंचालन कैलास अंभुरे करणार आहेत. 


> २४ नोव्हेंबर : पु. ल. देशपांडे सभागृह : सकाळी ११ वाजता सांगीतिक अभ्यासक्रमाच्या शास्त्रशुद्ध बांधणीचे स्वरूप आणि आवश्यकता या विषयावर चर्चासत्र होईल. त्यात प्रख्यात गायक अवधूत गुप्ते, गीतकार गुरू ठाकूर, अभिनेते जितेंद्र जोशी, कौशल इनामदार, डॉ. शीतल मोरे सहभागी होतील. सूत्रसंचालन स्वप्निल बांदोडकर, डॉ. गौतमी दिघे करतील. १२.३० वाजता साहित्य संमेलनाचे बदलते स्वरूप या विषयावर होणाऱ्या चर्चासत्रात मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, कौतिकराव ठाले पाटील सहभागी होतील. दिव्य मराठीचे निवासी संपादक दीपक पटवे सूत्रसंचालन करणार आहेत. २ वाजता शिल्पकला, चित्रकला : साहित्य भावाविष्कार या विषयावर होणाऱ्या चर्चासत्रात प्रख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे, चित्रकार मिलिंद जोशी यांचा सहभाग असेल. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी करणार आहेत. ३.३० वाजता द वेट लॉस तमाशा या विषयावर प्रख्यात लेखिका ऋजुता दिवेकर यांच्याशी राकेश दवाणी बोलणार आहेत. ४.३० वाजता कला कथाकथनाची या विषयावर प्रख्यात कथाकथनकार ख्रिस्तोफर सी डॉवेल यांच्याशी विकास सिंग संवाद साधतील. ५.३० वाजता प्रख्यात लेखक, पत्रकार हुसेन झैदी यांच्याशी अभिजित कुलकर्णी 'डोंगरी ते दुबई' या पुस्तकाविषयी बोलतील. 
डॉ. गंगाधर पानतावणे सभागृह : सकाळी ११ वाजता गुरु-शिष्य परंपरा : काल, आज आणि उद्या या विषयावर पं. नाथराव नेरळकर, डॉ. पार्वती दत्ता भूमिका मांडतील. सूत्रसंचालन प्रेषित रुद्रवार करणार आहेत. १२.३० वाजता मराठी चित्रपटांचे भवितव्य या विषयावर होणाऱ्या चर्चासत्रात अवधूत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर यांचा सहभाग असेल. 


संचालन अजय कुलकर्णी करणार आहेत. दुपारी २ वाजता प्रख्यात अभिनेते जितेंद्र जोशी यांना मंत्र ऑनलाइन कंटेंटच्या यशाचा या विषयावर दीप्ती राऊत बोलते करतील. दुपारी ३.३० वाजता संगीत देवबाभळी या नाटकातील कलावंत प्रसाद कांबळी, प्राजक्ता देशमुख, प्रफुल्ल दीक्षित, शुभांगी सदावर्ते, मानसी जोशी, आनंद ओक यांच्याशी पीयूष नाशिककर संवाद साधतील. ४.३० वाजता प्रख्यात लेखक अरविंद जगताप 'ताकद एका पत्राची' या विषयावर बोलतील. दिव्य मराठी अकोला आवृत्तीचे कार्यकारी संपादक सचिन काटे सूत्रसंचालन करतील. ५.३० वाजता ऑडिओ बुक काळाची गरज या विषयावर चर्चासत्र होईल. मनोज तुळपुळे यांचे सूत्रसंचालन असलेल्या या चर्चासत्रात साकेत भांड, प्रसाद मिरासदार, संकीर्त गुमास्ते यांचा सहभाग असेल. 


बशर नवाज सभागृह : सकाळी ११ वाजता अक्षरातून उलगडले साहित्य या विषयावर अच्युत पालव यांची कार्यशाळा होईल. १२ वाजता संकर्षण कऱ्हाडे कला पुस्तक वाचनाची या विषयावर भूमिका मांडतील . त्यांच्याशी अंजली धानोरकर संवाद साधणार आहेत. दुपारी २ वाजता सिनेमा आणि टीव्ही मालिकांच्या तुलनेत मराठी नाटकाचे बदलते स्वरूप या विषयावर होणाऱ्या चर्चासत्रात प्रा. अजित दळवी, प्रा. डॉ. दिलीप घारे आणि राजकुमार तांगडे यांचा सहभाग असेल. सूत्रसंचालन श्रीकांत सराफ करणार आहेत. दुपारी ३.३० वाजता आयुर्वेदातील साहित्य या विषयावर डॉ. विक्रांत जाधव बोलतील. त्यांच्याशी मिलिंद कुलकर्णी संवाद साधणार आहेत. 
४.३० वाजता शब्द-उच्चार, सूर संवाद या विषयावर मिलिंद जोशी बोलणार असून संचालन मिलिंद कुलकर्णी करणार आहेत. सायंकाळी ५.३० वाजता साहित्य, सोशल मीडिया आणि आपण या विषयावर विकास एडके भूमिका मांडतील. 


संचालन महेश अचिंतलवार करणार आहेत. महोत्सवाच्या आयोजनासाठी सरस्वती भुवन शिक्षण संस्था, शेळके समूह, भाग्य विजय, माय एफएम, स्टँडर्ड सिल्क मिल, ड्रीम क्रिएशन्स, मोबीसॉफ्टचे सहकार्य लाभले आहे.

बातम्या आणखी आहेत...