आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुळजापूर : भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका सुरू आहेत. राज्यातील सत्तेतून अनपेक्षितपणे पायउतार झाल्यानंतर होत असलेल्या या निवडणुकीकडे कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. तुळजापूर तालुक्यातील आमदार राणाजगजितसिंह पाटील, रोहन देशमुख, देवानंद रोचकरी आदींच्या समर्थक गटाने या बैठकीकडे पाठ फिरविली असून इच्छुकांची संख्याही कमालीची रोडावली आहे. दरम्यान, गेेल्या ३ वर्षांपासून रिक्त असलेल्या तुळजापूर शहराध्यक्ष पदाला यंंदातरी वाली मिळणार का, असा प्रश्न कार्यकर्त्यांतून विचारण्यात येत आहे.
जगातील सर्वाधिक सदस्य संख्या आणि केंद्रासह राज्यातील सत्तेमुळे गेल्या काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षात जोरदार इनकमिंग झाले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत अपेक्षित संख्याबळ मिळवूनही राजकीय मुत्सद्देगिरीत कमी पडल्याने भाजपला राज्यातील सत्ता गमवावी लागल्याने कार्यकर्त्यांत नाराजी आहे. परिणामी भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी संघटनात्मक निवडणुकीकडे पाठ फिरवली आहे. अनेकांनी पक्षाची कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास विनम्रपणे नकार दिल्याने जिल्हा नेतृत्वाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
तुळजापूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आणि निवडणूक निर्णय अधिकारी नितीन काळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड. अनिल काळे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. बैठकीला विद्यमान तालुकाध्यक्ष सत्यवान सुरवसे, जिल्हा चिटणीस गुलचंद व्यवहारे, प्राधिकरण सदस्य नागेश नाईक आदींची उपस्थिती होती.
दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक
विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे नेते राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून तुळजापूर येथून विजयही साकारला. परंतु तुळजापूर येथे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झालेल्या संघटनात्मक निवडणुकांच्या तयारीसंदर्भातील बैठकीकडे आमदार पाटील, रोहन देशमुख, देवानंद रोचकरी या प्रमुख नेत्यांच्या समर्थकांनी पाठ फिरविल्याने चर्चा होत आहे.
तालुका अध्यक्ष पदासाठी इच्छुक
तुळजापूर तालुकाध्यक्ष पदासाठी माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे, नागेश नाईक, नारायण नन्नवरे, गुरूनाथ बडुरे आदींनी इच्छा व्यक्त केली असली तरी इतिहास पाहता अनपेक्षितपणे वेगळेच नाव पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गत ३ वर्षांपासून शहर कार्यकारिणीच नाही
भाजपच्या संघटनात्मक निवडणुका दर ३ वर्षांनी घेण्याची पध्दत आहे. मात्र, मागच्या वेळी गटबाजीमुळे शहर कार्यकारिणी निवडीला बगल देण्यात आली. दरम्यान, आगामी १५ डिसेंबरपर्यंत तालुकाध्यक्ष निवड करण्यात येणार असल्याने तत्पूर्वी बूथ प्रमुख, गट प्रमुखांच्या बैठका घेऊन अंदाज घेण्याचे जिल्हा नेतृत्वासमोर आव्हान असणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.