Marathi Big Boss / Marath Big Boss : ‘शिव’ने विकले गणपती, दूध, फटाके; मेहनतीने झाला मराठी ‘बिग बॉस’, सात वर्षांपासून प्रयत्न

शिवच्या यशामुळे अमरावतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
 

अनुप गाडगे

Sep 03,2019 08:44:00 AM IST

अमरावती - मला नृत्यामध्ये लहानपणापासूनच रस होता. ही कला मी जोपासली. कुटुंबीयांच्या आग्रहामुळे अभियंता झालो. मात्र, व्यवसायाने कलाकार झालो. याच वेळी कलेसाठी लागणारा खर्च करता यावा म्हणून गणपती मूर्ती, फटाके, दूध विकले. बिग बॉसचा विजेता होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि हेच ध्येय साध्य करण्यासाठी वाटचाल सुरू केली. अथक परिश्रमांनंतर मी “बिग बॉस’ झालो. या यशामुळे पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले, असे मराठी “बिग बॉस-२’ चा विजेता अमरावतीकर शिव ठाकरे याने “दिव्य मराठी’ शी बोलताना सांगितले.


विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून अमरावतीचा उल्लेख होतो. अलीकडेच शहरातील बालकलाकार श्रीनिवास पोकळे याला सर्वोत्तम बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. त्यापाठोपाठ आता शिवनेही मराठी “बिग बॉस’ होऊन अमरावतीचा गौरव वाढवला आहे. शिव ठाकरे शहरातील नंदनवन कॉलनीत राहताे. वडील मनोहरराव ठाकरे किराणा दुकान व पानटपरी चालवतात, तर आई गृहिणी आहे. शिव सांगतो, पाचव्या वर्गापासूनच मला नृत्याची प्रचंड आवड होती. मात्र, खरे व्यासपीठ दहावीनंतरच मिळाले. मला याच क्षेत्रात करिअर करायचे होते. कुटुंबीय म्हणायचे, यापेक्षा शिक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे छंद जोपासून शिक्षण सुरू ठेवले. पॉलिटेक्निक, अभियांत्रिकीला असताना स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून कला सादरीकरणाची संधी मिळाली. त्यानंतर विविध ठिकाणी कार्यक्रम करायचो. त्यामधून सन्मानचिन्ह मिळायचे, हे पाहून आईबाबांना समाधान वाटायचे. मात्र, अभियांत्रिकी पूर्ण करावेच लागेल हे ते वारंवार सांगत होते. दरम्यान, बहीण मनीषाने वेळोवेळी आपल्याला मोठा आधार दिला. तसेच सुरुवातीच्या काळात गणपती मूर्ती, दूध, फटाकेही विकले. यातून आलेल्या रकमेतून स्वत:चा खर्च भागवला. अमरावतीसारख्या शहरातून मुंबईत जायचे संधी मिळणार हे शक्य नव्हते. त्यासाठी एक बाब ठरवून घेतली, शो किंवा “बिग बॉस’मध्ये जायचे हे निश्चित. त्यासाठी स्वत:ला कधीही वेळेच्या मर्यादेत बांधून घेतले नाही.

रात्रभर झोपलाे नाही, सकाळी सिद्धिविनायकाचे घेतले दर्शन
रविवारी (दि. १) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास मराठी “बिग बॉस-२’ चा विजेता म्हणून माझ्या नावाची घोषणा झाली. त्यानंतर चाहत्यांचा गराडा आजूबाजूला होता. त्यानंतर मुंबईतच एका हॉटेलमध्ये उशिरा रात्री दोन वाजेपर्यंत प्रसारमाध्यमांसोबत बाेललो. त्यानंतर महेश मांजरेकर व इतर मान्यवरांसोबत चर्चा सुरू झाली. ही चर्चा सकाळी साडेपाचपर्यंत सुरू राहिल्याने रात्रभर झाेपलोच नाही. त्यानंतर सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गेल्याचे शिव याने सांगितले आहे.

अपयशाला ‘एन्जॉय’ करा, पण जिद्द सोडू नका
स्वप्ने पूर्ण होेतात, त्यासाठी मेहनत आणि जिद्द असायलाच पाहिजे. त्यामुळे ध्येयपूर्तीसाठी मुदत ठेवू नका. तसेच प्रयत्न करताना अपयश आल्यास त्या अपयशाला एन्जॉय करा.
- शिव ठाकरे, ‘बिग बॉस-२’ विजेता

X
COMMENT